गोमेकॉतील नोकरभरती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

0
37

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरभरती विरोधातील जनहित याचिका काल उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. १३७१ पदे भरण्यासाठीची सगळी प्रक्रिया सरकारने पूर्ण केली होती. शैलेंद्र वेलिंगकर यांनी या भरती विरोधात जनहित याचिका उच्च न्यायालयात केली होती. ती काल उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली.

ही नोकरभरती करताना आरोग्य संचालनालयाने सगळे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला असून ही नोकरभरती प्रक्रिया रद्द केली जावी, अशी विनंती आपल्या जनहित याचिकेद्वारे त्यांनी केली आहे.
या भरतीच्या वेळी ज्या १३७१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतेकजण हे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या सत्तरी तालुक्यातील असल्याची बाबही वेलिंगकर यांनी आपल्या याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या नजरेत आणून दिली आहे.

गोमेकॉमध्ये ३० मल्टिटास्किंग कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसाठी काल शुक्रवारी जो आदेश काढण्यात आला. त्यालाही वेलिंगकर यांनी आपल्या याचिकेतून हरकत घेतली आहे. ह्या ३० कर्मचार्‍यांना भरती आदेशपत्रे देताना सर्व भरती नियम व कायद्यांचा भंग करण्यात आला असून या ३० जणांपैकीही बहुतेकजण हे सत्तरी तालुक्यातीलच असल्याचे त्यानी उच्च न्यायालयाच्या नजरेत आणून दिले आहे.