गोमेकॉतील नववे मूत्रपिंड रोपण यशस्वी

0
108

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपरस्पेशालिटी विभागात आता मूत्रपिंड रोपण नियमितपणे सुरू झाले असून गेल्या शनिवारी एका महिलेने आपल्या मुलाला जीवदान देण्यासाठी त्याला आपले मुत्रपिंड दान केल्याने या विभागातील नववे मूत्रपिंड रोपण यशस्वी झाल्याचे या महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी सांगितले.
इस्पितळात मूत्रपिंड विकार जडलेले अनेक रुग्ण दाखल होत असतात. मूत्रपिंड रोपणासाठी दात्याची गरज असते. दात्याने दान केलेले मुत्रपिंड जुळणेही तेवढेच महत्त्वाचे असते. त्यामुळे वरील शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी असते. मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया सुविधा गेल्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेसाठी शनिवार हा आठवड्यातील एक दिवस निश्‍चित केलेला आहे. हृदयविकार झालेल्या रुग्णांवर उपचार आता अत्यंत यशस्वीपणे केला जात असून वरील विभाग सुरू झाल्यापासून ३०० रुग्णांना हाताळण्यात आले. त्यात सुमारे ९४ रुग्णांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’ केल्याची माहिती डॉ. नाईक यांनी दिली. यापूर्वी वरील उपचारांसाठी रुग्णांना गोव्याबाहेर जावे लागत होते. बांबोळी येथे वरील उपचार सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांची व त्याच्या नातेवाईकांचीही चांगली सोय झाली आहे.