गोमांस प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी : कॉंग्रेस

0
202

गोमांस प्रकरणी गोवा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच राज्यात लवकरात लवकर गोमांस उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. गोमांस खाणार्‍यांना तसेच गोमांस विक्रेत्यांना कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यासंबंधी लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणीही नाईक यांनी यावेळी केली. गोमांस प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरकारवर दबाव आहे. आणि म्हणूनच गोमांस प्रकरणी सरकार काहीही निर्णय घेत नसल्याचा आरोप नाईक यांनी यावेळी केला. काही महिन्यांपूर्वी साध्वी सरस्वती ह्या गोव्यात आल्या असता त्यांनी गोमांस खाणार्‍यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केले होते. मात्र, त्यावेळी सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती याची नाईक यांनी आठवण करून दिली. गोव्यात जशे पूर्वी गोमांस उपलब्ध होत असे तसेच ते आताही उपलब्ध होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणीही नाईक यांनी यावेळी केली.

राज्य प्रशासन ठप्प झालेले असून सरकार दरबारी लोकांची कामे वेळेवर होत नसून आवश्यक दाखलेही वेळेवर मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने ‘गोवा राईट टू टाइम बाउंड पब्लिक सर्व्हिस ऍक्ट २०१३’ची अंमलबजावणी सुरूच केली नसल्याचा दावा त्यांनी केला.