गोपीनाथ गडावरील आत्मकथन की एल्गार?

0
173
  • ल. त्र्यं. जोशी

मुळात रोहिणी खडसे यांचा पराभव इतक्या कमी मतांनी झाला की, त्याला पराभव मानताच येत नाही. पण शेवटी पराभव तो पराभवच असतो. म्हणून त्याला पराभव म्हणायचे. त्याचेही मुख्य कारण म्हणजे विरोधी पक्षाने हाताळलेली नाथाभाऊंच्या विरोधतातील रणनीती हे दिसते.

बारा डिसेंबर रोजी मराठवाड्यातील परळीजवळील गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यातील गोपीनाथकन्या पंकजा मुंडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव ऊर्फ नाथाभाऊ खडसे, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील प्रभृतींच्या भाषणांमुळे महाराष्ट्र भाजपा एका नव्या वळणावर येऊन उभा राहिला आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मुळात हा कार्यक्रम भाजपाचा नव्हताच. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने तो आयोजित करण्यात आला होता. यावर्षीच आयोजित करण्यात आला होता असेही नाही. दरवर्षीच तो आयोजित केला जातो.

गोपीनाथराव असताना तो वाढदिवस म्हणून साजरा केला जात होता. आता ते नसल्याने तो जयंती म्हणून आयोजित केला जातो एवढाच काय तो फरक. एखाद्या नेत्याच्या जयंतीचा असा कार्यक्रम खरे तर ती एक गंभीर औपचारिकता आहे. त्या नेत्यांच्या स्फूर्तीदायक स्मृती जागविणे हाच तिचा हेतू असू शकतो. प्रासंगिक राजकारण चघळण्यासाठी त्याचा वापर करणे हे काही औचित्याला धरुन ठरू शकत नाही. शिवाय गोपीनाथ मुंडे यांचे चाहते केवळ भाजपातच आहेत, असे मानण्याचेही कारण नाही. पक्षाबाहेरही किंबहुना कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेलेही अनेक लोक त्यांचे चाहते आहेत. त्यांना भाजपातील अंतर्गत कुरबुरींशी काय देणेघेणे? पण त्यांनाही या निमित्ताने जणू वेठीसच धरण्यात आले.

या वर्षीच्या कार्यक्रमाला निवडणुकीची व त्यातही पंकजांच्या पराभवाची पार्श्वभूमी असली तरी त्या पराभवाची चिकित्सा करण्याचे जयंती समारंभ हे काही उचित व्यासपीठ असू शकत नाही. तरीही गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचे जीवनच मुळी भाजपामय होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम भाजपाच्या उल्लेखाशिवाय होणे हेही अपेक्षित नाहीच. उल्लेख होणारच, पण तो श्रध्दांजलीच्या स्वरुपात. तसे झाले असते तर कुणाचा त्याला आक्षेपही राहिला नसता. पण तशा प्रकारचे कोणतेही औचित्य न साधता विद्यमान राजकीय परिस्थितीची व विशेषत: पंकजा मुंडे व त्यांच्या जोडीला रोहिणी खडसे यांच्या पराभवाची चिकित्सा करण्यासाठी आणि भाजपाच्या अंतर्गत राजकारणातील कथित विसंगतींशी त्याला जोडण्याचा प्रयत्न करणे याचे कोणतेही औचित्य नाही. ते न साधल्याने प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व गोपीनाथरावांच्या कन्या अशा दोन्ही नात्यांनी पंकजांनी आपले दिवंगत पिताश्री आणि नेते गोपीनाथराव यांच्या आत्म्याला यातना देण्याचेच काम केले आहे असे दुर्दैवानेे म्हणावे लागेल.

पंकजांना किंवा रोहिणी खडसेंना आपल्या पराभवाची चिकित्सा करण्याचा अधिकारच नाही, असे मला दूरान्वयानेही सूचित करायचे नाही. पण त्यासाठी भाजपा हेच योग्य व्यासपीठ आहे व असावे. त्या व्यासपीठावर पंकजा किंवा नाथाभाऊ या दोघांनाच काय, कुणालाही संधी दिली गेली नसेल तर ते चूकच आहे असे म्हणता येईल. पण केवळ पराभवाचीच नव्हे तर निवडणूक निकालांचीच चिकित्सा करण्याची भाजपाची एक पध्दती आहे. जिल्हा किंवा विभाग किंवा राज्यपातळीवर तशी चिकित्सा झाली पाहिजे. त्यात कुठे, काय उणिवा राहिल्या याचे विश्लेषणही होऊ शकते. माझ्या माहितीनुसार असे विश्लेषण निवडणुकीनंतर विभागीय व प्रदेश पातळीवर भाजपामध्ये नक्कीच झाले आहे. त्यात निकालाविषयी साधकबाधक चर्चाही झाली. शिवाय निवडणुकीच्या तिकिटवाटपापासून तर निकालापर्यंतच नव्हे तर त्यानंतर घडलेल्या राजकीय घटनांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध वाहिन्यांवर मुलाखतींच्या माध्यमातून भूमिका स्पष्टही केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी समर्पक उत्तरही दिले आहे व सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांनी ते समजूनही घेतले आहे. पण असे दिसते की, पंकजा, नाथाभाऊ त्याच्याशी सहमत नाहीत. त्याच्याशी असहमत होण्याचा त्यांचा अधिकारही मान्य करता येईल. पण तरीही त्याची चर्चा करण्यासाठी गोपीनाथगडावरचा श्रध्दांजली मेळावा हे व्यासपीठ उचित ठरू शकत नाही. विशेषत: प्रदेश भाजपाचे अध्यक्ष स्वत: चंद्रकांतदादा पाटील तेथे उपस्थित असताना पंकजा आणि नाथाभाऊ यांनी ज्या अविर्भावात तेथे भाषणे केली तो राजकारणाची परीपाठी लक्षात घेता त्यांच्या जबाबदारीला शोभणारा नाही.

पंकजा ह्या मावळत्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. नाथाभाऊ तर विरोधी पक्षनेतेही होते आणि मंत्रीही होते. त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा कुणीही करु शकत नाही. खरे तर मंत्रिपद गेल्यापासून नाथाभाऊ उपलब्ध झालेल्या प्रत्येक संधीचा त्यांच्यावरील अन्यायाचा उल्लेख करीत आहेत. पण भाजपा नेतृत्वाने त्यांना त्यापासून कधीही रोखले नाही. उलट समजवणीचीच भाषा वापरली आहे. शिवाय असे प्रश्न कारवाईने सुटतही नसतात.

पंकजा आणि रोहिणी यांच्या पराभवाची वस्तुनिष्ठ मीमांसाच करायची झाल्यास बरेच काही म्हणता येईल. मुळात रोहिणी खडसे यांचा पराभव इतक्या कमी मतांनी झाला की, त्याला पराभव मानताच येत नाही. पण शेवटी पराभव तो पराभवच असतो. म्हणून त्याला पराभव म्हणायचे. त्याचेही मुख्य कारण म्हणजे विरोधी पक्षाने हाताळलेली नाथाभाऊंच्या विरोधतातील रणनीती हे दिसते. खरे तर रोहिणी ह्या उमेदवार असल्या तरी लोकांच्या दृष्टीने नाथाभाऊच उमेदवार होते आणि विरोधकांना त्यांनाच पाडायचे होते. आघाडीच्या जागावाटपात मुळात ती जागा राष्ट्रवादीकडे होती. भाजपा सेना वाटपात ती शिवसेनेकडे गेलीही नाही. तेथे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नव्हता. पण विरोधकांची रणनीतीच अशी तयार करण्यात आली की, तेथे चंद्रकांत पाटील नामक शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता अपक्ष म्हणून उभा राहिला. राष्ट्रवादीने पक्षाने आपले मुरलेले कार्यकर्ते ऍड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण नाथाभाऊंना पाडणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याने राष्ट्रवादीने त्यांना मागे घेऊन चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला व ते सर्वपक्षीय उमेदवार बनले. शिवाय रोहिणी खडसे ह्या इच्छेविरुध्दच्या उमेदवार होत्या. अशा वातावरणात जर त्यांचा हजार दीड हजार मतांनी पराभव झाला असेल तर तो पराभव ठरत नाही. त्यात गिरीश महाजन यांचा वाटा नसेलच असे म्हणता येणार नाही, कारण त्यांचे काही समर्थकही त्यांनी समजावल्यानंतर स्थानिक परिस्थितीत वेगळा विचार करु शकतात व त्या स्थितीत महाजन काहीही करू शकत नाहीत. पण कुणाला त्यांना दोष द्यायचाच असेल तर त्यावर काही उपायही नाही. तरीही नाथाभाऊंनी दिलेल्या पुराव्यांचा विचार होऊ शकतोच. बरे एकट्या रोहिणीचाच पराभव झाला असे नाही. शेजारच्या रावेर मतदारसंघातून माजी खासदार हरिभाऊ जावळे, अमळनेरमधील उमेदवार शिरीष चौधरी, मलकापूरमधील चैनसुख संचेती यांचाही पराभव झाला. नाथाभाऊ त्याबद्दल चर्चा करीत नाहीत आणि ओबीसी असल्याने रोहिणीचा पराभव करण्यात आला हे कसे काय रास्त ठरु शकते? मुळात रोहिणी आणि पंकजा यांच्या पराभवाची कारणे पूर्णपणे भिन्न आहेत. पण एकट्या रोहिणीच्या पराभवाचाच मुद्दा बनणे शक्य नव्हते. म्हणून नाथाभाऊंनी आपले कौशल्य वापरुन त्याला व्यापक, ओबीसीचा आयाम दिल्याचे स्पष्टपणे दिसते. (उत्तरार्ध पुढील आठवड्यात)