‘गोंधळात गोंधळ’ फेम व्ही. के. नाईक यांचे निधन

0
660
व्ही. के. नाईक यांचा यंदाच्या मराठी चित्रपट महोत्सवात सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला होता. (संग्रहित छायाचित्र)

गोव्याचा प्रथितयश चित्रकर्मी हरपला
‘गोंधळात गोंधळ,’ ‘गुपचूप गुपचूप’ यासारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक, ‘जंगली’, ‘शर्मिली’ अशा हिंदी चित्रपटांचे प्रथितयश संकलक, चित्रपटी व्ही. शांताराम यांचे एकेकाळचे सहकारी, गोव्याचे सुपुत्र वासुदेव कृष्णा तथा व्ही. के. नाईक (८१) यांचे काल अल्प आजाराने खोर्ली (तिसवाडी) येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रविवारी रात्री अडीचच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले होते. काल सकाळी १०.४५ वाजता त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. मुंबईस वास्तव्यास असलेला त्यांचा पुत्र शेखर गोव्यात दाखल झाला असून आज सकाळी ११ वाजता खोर्ली (तिसवाडी) येथे व्ही. के. नाईक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१० सप्टेंबर १९३३ रोजी गोव्यात जन्मलेले वासू तथा व्ही. के. नाईक वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी कलानगरी मुंबईत पोहोचले. तेथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ या चित्रपट निर्मिती संस्थेमध्ये त्यांना संकलन विभागात सहायक म्हणून काम मिळाले. व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘राजकमल’ मध्ये अकरा वर्षे संकलन विभागात काम केले. संकलनातील त्यांची हातोटी पाहून सुबोध मुखर्जी यांनी आपल्या निर्मिती संस्थेत नाईक यांना संकलक म्हणून स्वतंत्रपणे संधी दिली. तेथे त्यांनी तब्बल २३ वर्षे चित्रपट संकलनाची जबाबदारी सांभाळली.
हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया अशा विविध भाषांतील पन्नासच्यावर चित्रपटांचे संकलन श्री. नाईक यांनी त्या काळात केले. यातील ‘जंगली,’ ‘लव्ह मॅरेज’, ‘एप्रिल फूल’, ‘शागीर्द’, ‘दिवानगी’, ‘हमशकल’, ‘छोटीसी मुलाकात’, ‘शर्मिली’ आदी चित्रपटांचा रौप्यमहोत्सव साजरा झाला, तर ‘शागीर्द’व ‘जंगली’ या चित्रपटांनी पुढे सुवर्णमहोत्सवही दिमाखात साजरा केला. उत्कृष्ट संकलक म्हणून नाईक यांना दादासाहेब फाळके आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
‘एकटी’, ‘धाकटी बहीण’, ‘आधार’, ‘अजब तुझे सरकार’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’, ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘आपलेच दात, आपलेच ओठ’, आदी मराठी चित्रपटांचे संकलनही त्यांनी केले.
नाईक पुढे चित्रपट निर्मितीकडे वळले. ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘गोडीगुलाबी’, ‘आपली माणसं’, ‘खिचडी’ अशा काही मराठी चित्रपटांची निर्मितीही श्री. नाईक यांनी केली. यातील ‘गोंधळात गोंधळ’ व ‘गुपचूप गुपचूप’ या चित्रपटांमुळे नाईक यांचे नाव सर्वतोमुखी झाले. ‘गोंधळात गोंधळ’ चित्रपटाला १९८० सालचा महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला, तर अशोक सराफ व रंजना अभिनीत ‘गुपचूप गुपचूप’ ने १९८३ साली सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे फिल्मफेअर व महाराष्ट्र राज्य पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटवली. ‘आपली माणसे,’ ‘गुपचूप गुपचूप’, ‘घाबरायचं नाही’, ‘छक्के पंजे’, ‘गोडीगुलाबी’, ‘सून लाडकी संसाराची’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शनही नाईक यांनी केले होते. त्यांच्या ‘आपली माणसं’ ला उत्कृष्ट कथेचा, तर ‘एकटी’ व ‘अजब तुझे सरकार’ ला उत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार मिळाला होता. याखेरीज दादासाहेब फाळके पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा क्षेत्रकर्मी पुरस्कार, फिल्म एडिटिंग क्राफ्टचा जीवनगौरव पुरस्कार, असोसिएशन ऑफ फिल्म अँड एडिटिंग, मुंबईचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. निवृत्तीनंतर व्ही. के. नाईक आपल्या मायभूमीत – गोव्यात राहायला आले होते. जुने गोवे – खोर्ली येेथे त्यांचे पत्नीसमवेत वास्तव्य होते. मात्र, आयुष्याच्या अंतिम पर्वात या चित्रकर्मीच्या वाट्याला उपेक्षाच आली. ‘नवप्रभे’ ने व्ही. के. नाईक यांच्या कला कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना पुन्हा प्रकाशात आणले होते. ते नवप्रभेचे नियमित वाचकही होते.
व्ही. के. नाईक यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
१९९१ – ‘गोडीगुलाबी’
१९९० – ‘घाबरायचं नाही’
१९८७ – ‘छक्के पंजे’
१९८५ – ‘खिचडी’
१९८३ – ‘गुपचूप गुपचूप’
१९८१ – ‘गोंधळात गोंधळ’
१९७९ – ‘आपली माणसं’
नाईक यांनी संकलित केलेले चित्रपट
१९९२ – हमशकल
१९८२ – तीसरी आँख
१९७९ – लडके बापसे बढके
१९७८ – फंदेबाझ
१९७८ – अंजाने मे
१९७६ – दीवानगी
१९७५ – जग्गू
१९७१ – मेहबूबकी मेहंदी
१९७० – अभिनेत्री
१९६८ – एकटी
१९६७ – शागीर्द
१९६४ – एप्रिल फूल
१९६१ – जंगली