>> आयडीसीचे २७ भूखंड कर्मचार्यांना ः कामत
राज्यात वर्ष २०१४ ते २०१९ या काळात केवळ २२ नवीन उद्योग आले आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) १७९ प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. त्यातील ५८ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांपैकी २८ प्रकल्पांत केवळ विस्तारीत प्रकल्प आणि ६ हॉस्पिटॅलिटी प्रकल्पाचा समावेश आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना काल सांगितले.
राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसून सेझ प्रकल्पातील गुंतवणूकदारांना १२८ कोटी रुपये गरज नसताना व्याज स्वरूपात देण्यात आले आहेत. सेझ गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम द्यायला हवी होती असे कामत यांनी सांगितले.
आयडीसीचे २७ भूखंड कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आले आहेत. आयडीसीतील मोकळ्या जागा भूखंड करून विकल्या आहेत. मोकळ्या जागा ७.५ टक्के केल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे, असे कामत यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल येत्या ३१ डिसेंबर पूर्वी सुरू करावे. ऑपरेशन थिएटरची यंत्रणा विदेशातून आणली जाणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलसाठी निधी त्वरित उपलब्ध करावा, अशी मागणी कामत यांनी केली.
देशातील औद्योगिक स्थिती चांगली नाही. मोठमोठ्या कंपन्या उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेत आहेत. याचा काही वर्षात गोव्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोजगार व उद्योगाकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे, असे कामत यांनी सांगितले.