पणजीतील पत्रकार परिषदेत मांडला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा
11 वर्षांपूर्वी म्हणजेच मे 2014 ला जेव्हा केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून देशात ‘अच्छे दिन’ आल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सत्ता आली, तेव्हापासून देशात ‘अच्छे दिन’ आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ते बोलत होते.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने लोकांना त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास देशात ‘अच्छे दिन’ येतील, असे आश्वासन दिले होते. आणि नंतर ते खरे झाल्याचे सांगून आता देशात ‘अच्छे दिन’ आले आहेत. मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आता सत्तेवर आलेले हे तिसरे सरकार असून, आताचा काळ हा ‘अमृतकाळ’ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
स्वच्छ भारत ते तंदुरूस्त भारत 2014 नंतर पहावयास मिळाला. आणि त्याचे सगळे श्रेय हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेवर आलेल्या केंद्रातील भाजप सरकारला द्यावे लागेल. सत्ता हाती आल्या आल्या मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम हाती घेतली. देशात स्वच्छता मोहीम राबवताना त्यांनी स्वत:ही झाडू हातात घेतला. ही स्वच्छता करतानाच भ्रष्टाचार दूर करण्याची स्वच्छताही करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आणि म्हणूनच गेल्या 11 वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेवर येण्यापूर्वी देशात 140 कोटी लोकांना जी स्वप्ने दाखवली होती, ती त्यांनी पूर्ण केल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
केंद्राच्या 33 योजनांची अंमलबजावणी
केंद्र सरकारच्या कित्येक योजनांमधील 33 योजनांची गोव्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नवे कायदे आणले
काही क्रांतिकारक बदल घडवून आणताता भाजप सरकारने 75 वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेला आयपीसी रद्द करुन भारतीय न्याय संहिता हा नवा कायदा आणल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पायाभूत साधनसुविधा वेगाने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक तसेच खासगी भागीदारीने प्रकल्प उभारले. याच काळात सरकारने डिजिटल इंडिया अभियानही सुरू केले.
‘आयुष्मान भारत’ योजना
देशातील गरीब जनतेच्या वैद्यकीय खर्चासाठी ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरू केल्याने गरिबांना वैद्यकीय खर्चासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होऊ लागला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी
गेल्या 11 वर्षांच्या काळात भारताची दहाव्या स्थानी असलेली अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी पोचली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देशाच्या सुरक्षेशी तडजोड नाही
भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने देशाच्या सुरक्षेबाबत कधीही तडजोड केली नाही व देशात अतिरेकी हल्ले झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘ऑपरेशन सिंदूर’ यासारख्या प्रतिहल्ल्यांद्वारे शत्रूला ‘सळो की पळो’ करून सोडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण
गेल्या 48 वर्षांपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल झाला नव्हता. भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणले.
विकसित भारत
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एआयआयएमएस) या महत्त्वाच्या संस्थांची संख्या वाढवून दुप्पट केली.
चार राज्यांतील नक्षलवाद नष्ट
छत्तीसगढ, झारखंड व महाराष्ट्रासह चार राज्यांतील नक्षलवाद नाहीसा करण्यात सरकारला यश आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच 2027 पर्यंत देशातील नक्षलवाद पूर्णपणे नाहीसा करण्यास सरकार यशस्वी ठरणार असल्याचे ते म्हणाले.
‘गोवा व्हिजन डॉक्युमेंट’चे काम सुरू
गोव्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जात आहे. गोवा मुक्ती दिनापूर्वी म्हणजेच येत्या 19 डिसेंबरपयत ते पूर्ण होणार आहे. 2037 पर्यंत गोव्याचा विकास करण्यासाठी ‘गोवा व्हिजन डॉक्युमेंट 2037′ तयार केले जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विकसित भारत 2047 च्या धर्तीवर हे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. गोव्याने सर्व बाबतीत प्रगती साधलेली असून, येथील दरडोई उत्पन्नही सर्वाधिक आहे. त्यामुळे 2037 पर्यंत गोवा सर्व दृष्टिने विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.