
>> किंग्स इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर १५ धावांनी विजय
किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव करत यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदविला. हैदराबादने सलग तीन सामन्यांत विजय नोंदवून धमाकेदार सुरूवात केली होती. परंतु, कालच्या पराभवामुळे त्यांच्या घोडदौडीला ब्रेक लागला आहे.
ख्रिस गेल याने ठोकलेल्या तडाखेबंद शतकामुळे पंजाबला विजय मिळविणे शक्य झाले. पंजाबने विजयासाठी ठेवलेल्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सने ४ गडी गमावून १७८ धावांपर्यंतच पोहोतचा आले. त्यांच्याकडून केन विल्यमसनने ४१ चेंडूंत ५४ व मनीष पांडेने ४२ चेंडूंत नाबाद ५७ धावा केल्या. पण, आवश्यक धावगती राखणे सनरायझर्सला जमले नाही व त्यांचा पराभव झाला.
तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना यंदाचा ट्रेंड मोडला. नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याची मालिका मोडीत काढताना अश्विनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेलने आपल्या कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरविला. गेलने या आयपीएलमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादसमोर १९४ धावांचे आव्हान ठेवले. मोहालीच्या मैदानात गेलने ११ षटकारांचा पाऊस पाडत ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रविवारच्या लढतीमध्ये अर्धशतक झळकवल्याने गेलचा आत्मविश्वास वाढला होता. सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजी ही या स्पर्धेतील सर्वोत्तम मानली जाते. मात्र गेलवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने आयपीएलच्या या हंगामातील पहिले आणि आयपीएलमधील सहावे शतक ५८ चेंडूत झळकावले. ख्रिस गेलला करुण नायरने ३१ धावा काढत चांगली साथ दिली. तर के.एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी प्रत्येकी १८ धावा काढल्या.
धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल पायचीत गो. राशिद खान १८, ख्रिस गेल नाबाद १०४ (६३ चेंडू, १ चौकार, ११ षटकार), मयंक अगरवाल झे. हुडा गो. कौल १८, करुण नायर झे. धवन गो. कुमार ३१ (२१ चेंडू, ३ चौकार, १ षटकार), ऍरोन फिंच नाबाद १४, अवांतर ८, एकूण २० षटकांत ३ बाद १९३
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ४-०-२५-१, ख्रिस जॉर्डन ४-०-३१-०, राशिद खान ४-०-५५-१, सिद्धार्थ कौल ४-०-३३-१, दीपक हुडा २-०-१६-०, शाकिब अल हसन २-०-२८-०
सनरायझर्स हैदराबाद ः वृध्दिमान साहा त्रि. गो. शर्मा ६, शिखर धवन जखमी निवृत्त ०, केन विल्यमसन झे. फिंच गो. टाय ५४, युसूफ पठाण त्रि. गो. शर्मा १९, मनीष पांडे नाबाद ५७, दीपक हुडा झे. मनोज तिवारी गो. टाय ५, शाकिब अल हसन नाबाद २४, अवांतर १३, एकूण २० षटकांत ४ बाद १७८
गोलंदाजी ः बरिंदर सरन ४-०-२२-०, मोहित शर्मा ४-०-५१-२, अँडी टाय ४-०-२३-२, रविचंद्रन अश्विन ४-०-५३-०, मुजीब उर रहमान ४-०-२७-०
आजचा सामना
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
स्थळ ः पुणे, वेळ ः रात्री ८.००
धवनने मैदान सोडले
सनरायझर्सची फलंदाजीतील पहिलेच षटक सुरू असताना बरिंदर सरनने टाकलेल्या चेंडूवर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनला जायबंदी होऊन मैदान सोडाने लागले. सरनने टाकलेला पाचवा व स्वतः खेळत असलेला पहिलाच चेंडू कट् करण्याच्या प्रयत्नात असताना चेंडूने अचानक दिशा बदलली व चेंडू त्याच्या डाव्या कोपरावर आदळला. फिजियोला मैदानावर बोलवल्यानंतर धवनने पुढे फलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला.