>> जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने मंजुरी देणार
गोवा सरकारच्या गृह आधार योजनेसाठीच्या पडून असलेल्या नव्या २२ हजार अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यापासून दर महिन्यांत टप्प्याटप्प्याने ५ हजार अर्ज मंजूर केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. एप्रिल महिन्यांपर्यंत या २२ हजार अर्जांपैकी जेवढे अर्ज योजनेसाठी पात्र ठरतील ते सर्व टप्प्याटप्प्याने मंजूर केले जातील, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
गृह आधार योजनेचा आपण नुकताच फेरआढावा घेतल्याचे सावंत यांनी माहिती देताना सांगितले. उत्पन्न मर्यादा वाढल्याने तसेच अन्य काही कारणांमुळे सुमारे १७ हजार जुने लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरल्याने त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली.
नव्या वर्षापासून नवे अर्ज हातावेगळे करण्यात येणार असल्याने त्यानंतरच नव्या अर्जधारकांना योजनेचा लाभ मिळू शकणार असल्याचे ते म्हणाले.
दिवगंत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कमी उत्पन्न गटातील बेरोजगार महिलांसाठी ही कल्याणकारी योजना सुरू केली होती. महागाईचा फटका बसलेल्या कमी उत्पन्न गटातील महिलांना दिलासा मिळावा यासाठी पर्रीकर यांनी ही योजना सुरू केली होती.