गृहिणी आणि महागाई

0
43
  • मीरा निशीथ प्रभुवेर्लेकर

गृहिणी आणि महागाई यांचं नातं त्यांच्या-त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर अवलंबून असतं. गृहिणींनी पोकळ बडेजावाचं प्रदर्शन न मांडता आपल्या ऐपतीनुसारच खर्च करून हात आखडता घेतला तरच महागाईचा भस्मासुर जळून खाक होण्यास काही प्रमाणात मदत होईल, याबद्दल दुमत नसावं.

स्त्रीला तिच्या आयुष्यात वाट्याला येणार्‍या तरुणी, रमणी आणि गृहिणी या भूमिका अत्यंत काळजीपूर्वक आणि चातुर्याने पार पाडाव्या लागतात. तरुणी रमणाची रमणी होते तेव्हाच तिला गृहिणीपद चिकटतं. गृहिणी ही एक जबाबदार संस्थाच म्हटल्यास वावगं ठरू नये. संसाराचा जमाखर्च कसा तोलावा याचं प्रशिक्षण न घेताही ती केवळ अनुभवावरून आणि आलेल्या परिस्थितीवरून शिकत जाते. परंतु समाजात उच्चस्तरीय, मध्यमस्तरीय आणि निम्नस्तरीय अशी कुटुंबांची वर्गवारी केली गेली असल्याने त्या-त्या स्तरातील गृहिणींची विचारसरणी, वर्तनही भिन्न-भिन्न असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. उच्चभ्रू कुटुंबातील गृहिणी, मध्यमवर्गातील गृहिणी आणि कष्टकरी गृहिणी वाढत्या महागाईशी आपापल्या परिस्थितीनुसार आणि वृत्तीनुसार सामोरी जाताना दिसतात.
गृहिणी ही गृहिणीच असली तरी काळानुरूप गृहिणी बदलत चालली आहे असे चित्र दिसते. पुरातन काळातील गृहिणी आणि आजची गृहिणी यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. पूर्वी कमवून आणणे आणि सर्व खरेदी करून आणणे ही पुरुषांचीच मक्तेदारी होती. घरात जे काही जिन्नस येऊन पडलेले आहेत, त्यांतून कुटुंबाच्या पोटापाण्याची व्यवस्था लावणे यापलीकडे सामान्य गृहिणींच्या डोक्याला अन्य ताप नसे. त्यामुळे मार्केटमधील वस्तूंचा वाढता दर आणि गृहिणी यांचा दुरान्वयेही संबंध नसे. आज परिस्थिती नेमकी उलट आहे. पुरुषांच्या बरोबरीने चालता-चालता आजची सुशिक्षित गृहिणी संसार, नोकरी, संगोपन, रांधा-वाढा, खरेदी, मुलांचा अभ्यास ही सारी कसरत करत या जबाबदार्‍या समर्थपणे पेलणारी पत्नी, माता, सून या भूमिका निभावत असते. तिचा बाहेरच्या जगाशी संबंध येतो. त्यामुळे ती सजग-सावध असते. महागाईला तेवढ्याच समर्थपणे तोंड देत संसाराचा गाडा रेटत असते. तरीही पुन्हा इथे मला नमूद करावेसे वाटते की गृहिणींच्या वेगवेगळ्या स्वभाववैशिष्ट्यांनुसारच महागाईला हाताळले जाते हे पुढील काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल.

सर्वसामान्यपणे कष्टकरी किंवा निम्नस्तरीय महिला हातचं राखूनच संसाराचा गाडा रेटत असतात. त्या अशिक्षित असल्याने किंवा समाजामध्ये वावरत नसल्याने त्यांच्या राहणीमानाच्या अपेक्षाही किमानच असतात. तसेच वय वाढल्यानंतर कष्ट करण्यास लागणारे शारीरिक बळ मंदावते तेव्हा तर गरम असतानाच भाकरी भाजून घ्यावी हा विवेक त्यांच्यामध्ये असतो. त्यामुळे ती काटकसर करत महागाईशी झुंज देत असते. तिच्या राहणीमानाच्या अपेक्षा उंचावलेल्या नसतात. सुखासीनता, सुखसोयी, हौस पुरवणे, ऐषआराम यांना चार हात लांब ठेवण्यात शहाणपणा मानते. म्हणून ती महागाई तोलू शकते.
उच्चभ्रू वर्गातील गृहिणींना महागाईचं काहीच सोयरसुतक लागत असल्याचं जाणवत नाही. दहा ग्राम सोन्याचा भाव लाखावर पोचला तरी यांच्या खरेदीवर मर्यादा पडत नसतात. अंबानींच्या लेकी-सुनांनी सुवर्णाच्या कलाकुसरीने मढवलेल्या साड्या आणि झगे परिधान केलेले फोटो याची साक्ष देतात. हा ‘श्रीमंत सोस’ महागाईला डोकं वर काढण्यास अशा पद्धतीने हातभार लावत असतो. महागाईला उत्तेजन देणार्‍या या श्रीमंत गृहिणींचं, महागाईत पोळून जाणार्‍या सामान्य गृहिणींकडून कौतुक केलं जातं, हा विरोधाभास कुठंतरी खुपतो मनाला.

आता राहता राहिल्या मध्यमवर्गीय गृहिणी. या ना धड वरच्यात, ना खालच्यात. दोघांच्या मध्यात सँडविच झालेल्या अशा परिस्थितीतल्या. त्यांची सढळ हस्ते खर्च करण्याची आर्थिक ताकद नसते आणि निम्नस्तरीय गृहिणीप्रमाणे आपल्या सर्वसाधारण परिस्थितीची कल्पनाही दुसर्‍यांना द्यायची नसते. परंतु समाजात आपली आब राखण्यासाठी म्हणा किंवा प्रतिष्ठितपणाचं सोंग आणण्यासाठी म्हणा, श्रीमंतीचा मुखवटा चढवून समाजात फिरताना दिसतात. त्या सुशिक्षित असल्याने नोकरी करून संसाराला हातभार लावतात. चोवीस तास अव्याहतपणे आर्थिक-शारीरिक-बौद्धिक कसरत करणार्‍या या मध्यमवर्गीय गृहिणींचे नवरे कमवून आणण्यापलीकडे शून्य असतात, हेच चित्र आज स्पष्टपणे दिसते. नोकरी न करणार्‍या काही गृहिणी नवर्‍याच्या मिळकतीतून आपल्या वाट्याला आलेल्या रकमेतून किती आणि कसा योग्य वापर करावा आणि त्यातूनही लपवून-छपवून बचत कशी करावी याचा सुरेख ताळमेळ घालताना दिसतात. महागाईशी अप्रत्यक्षपणे झुंजत असणार्‍या या स्त्रिया महागाईचा बाऊ न करता, जमाखर्चाचा समतोल ढळू न देण्यात आपल्या चातुर्याचा कस कसा लावतात ते पाहणे खरोखर कौतुकास्पद असते.

अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती ही की, मागील काळातील चैनीची वस्तू आज ‘गरज’ बनली आहे. उदा. चारचाकी गाडी. पूर्वी धनिकांच्या बंगल्यांसमोर ती दिसे. आज ‘एक घर एक गाडी’ या जोडीशिवाय घराचं आवार दिसणार नाही. त्याचप्रमाणे आज ज्याला-त्याला आपलं राहणीमान सुधारण्याची हौस किंवा सुप्त इच्छा असते आणि ते स्वाभाविक आहे. मग घरात फ्रिज, एसी, टीव्ही, सोफासेट अशा महागड्या वस्तू हप्त्याने खरीदल्या जातात किंवा कर्जही काढले जाते. कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते, बँकेतले हप्ते, गाड्यांचे हप्ते हे सारे भरताना गृहिणींचा जीव मेटाकुटीस येतो. परंतु या सार्‍या ‘पोकळ बडेजावा’साठी खरेदी केल्या जाणार्‍या वस्तूंसाठी नवर्‍याचा पिच्छा पुरवणारी एक ‘गृहिणी’च असते हे लक्षात घ्यायला हवे. बाई या महागाईशी अशी का खेळत असते हा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.

आमच्या पिढीतल्या वयस्क गृहिणींना ‘आमच्यावेळच्या’ स्वस्ताईचं अप्रूप भारीच. मग आम्ही आजच्या तरुण गृहिणींना ‘आमच्यावेळी’ हे कीर्तन मोठ्या कौतुकाने, चुटपुटीने आवर्जून ऐकवत असतो. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक वाटते की, तेव्हाच्या स्वस्ताईच्या मानाने आजच्या महागाईने उच्चांक गाठलेला असला तरी त्यावेळच्या मिळकतीच्या मानाने आजची मिळकतही कितीतरी पटीने वाढलेली आहे. म्हणूनच तर त्यावेळी दहा पैशांना मिळणार्‍या एक कोथिंबिरीच्या जुडीला आज सामान्य गृहिणी वीस रुपये देऊन खरेदी करू शकते (पण ही महागाईची झळ अत्यंत गरीब महिलेला मात्र प्रकर्षाने जाणवते). आमच्यावेळी मासिक वीस रुपयात धुणी-भांडी करणारी मोलकरीण आज दोन हजार रुपये घेते. म्हणूनच वाढत्या महागाईतही सामान्यातली सामान्य गृहिणी संसारात तग धरून उभी आहे. तर कमाई आणि महागाई यांचं प्रमाण व्यस्त असतं तर… विचारच न केलेला बरा!
महागाईशी हसत-खेळत हातमिळवणी करणार्‍या गृहिणींचा एक बिनधास्त असा वर्ग आहे. त्यांना ना आपल्या ऐपतीचा विचार, ना भविष्याची चिंता. समाजात मिरवण्यासाठी आपल्या परिस्थितीच्या आर्थिक रूपड्याकडे सपशेल दुर्लक्ष करून सढळ हस्ते खरेदी करत सुटतात. मुलांना घरच्या पौष्टिक अन्नाचं महत्त्व न सांगता ‘पिझ्झा-बर्गर-पाश्ता’चा अनारोग्याला आमंत्रण देणारा ‘फास्ट फूड’चा आहार त्यांना देऊन त्यांचे चोचले पुरवतात. आणि हे पुरवताना त्यांना भूषण वाटते. अशा अवास्तव खर्चिकपणाला आवर घालणे आवश्यक असते. कारण, या वृत्तीच्या आयांमुळे वापरातल्या साध्या वस्तूंसाठी मागण्या वाढत जातात. म्हणजे मग मागणीत वाढ- निर्मितीत वाढ- पुरवठ्यात वाढ आणि शेवटी किमतीत वाढ (महागाईचा उच्चांक) असं अर्थशास्त्रीय गणित समजून घेऊन गृहिणींनी महागाईला खाली खेचण्यात हातभार लावला पाहिजे.

शेवटी गृहिणी आणि महागाई यांचं नातं उपरोल्लिखित उदाहरणांवरून त्यांच्या-त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर कसं अवलंबून आहे हे लक्षात येईल. गृहिणींनी पोकळ बडेजावाचं प्रदर्शन न मांडता आपल्या ऐपतीनुसारच खर्च करून हात आखडता घेतला तरच महागाईचा भस्मासुर जळून खाक होण्यास काही प्रमाणात मदत होईल, याबद्दल दुमत नसावं.