पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचं महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणवारापुरत. एरव्ही मात्र गुळाचा तितकासा वापर होताना दिसून येत नाही. पण गुळाचा आहारात समावेश असायला हवाच कारण फक्त गोडवा वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीदेखील गूळ फायदेशीर आहे. * गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते. * शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो. * शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो * थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असते, पण तो अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ उष्ण असतो. * मासिक पाळीच्यावेळी तीळ-गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते. * पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. * रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहर्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. * जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. * घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खाल्ल्याने आराम मिळतो. पण गुळाच्या अति खाण्यामुळे मात्र रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याचा धोका असतो., म्हणून ज्यांना त्वचेचे रोग असतील त्यांनी गूळ खाऊ नये.