आयसिसची माघार

0
121

आधी मोसूल आणि आता राक्का शहरावरचा आयसिसचा कब्जा उधळून लावण्यात इराक आणि सिरियाच्या फौजांना आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय साथीदारांना यश आलेले असले तरी अवघ्या जगापुढे आव्हान बनून राहिलेल्या या सैतानाचा पुरता खात्मा झाला असे मात्र म्हणता येत नाही. मोसूल हे इराकमधील दुसरे मोठे शहर. तिथल्या अल नुरी मशिदीतूनच आयसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादीने इस्लामी खिलाफतीची घोषणा केली होती. बघता बघता जगभरातून माथेफिरू धर्मवेडे त्याला येऊन मिळाले आणि अवघे जग या नव्या संकटाने चिंतित झाले. इराक आणि सिरियात तर त्यांनी शस्त्रांच्या बळावर आणि प्रतिकारार्थ समोर येणार्‍यांवर अनन्वित अत्याचार करीत फार मोठा प्रदेश पादाक्रांत करून ताबा मिळवला. तेथील तेलविहिरींपासून धरणांपर्यंत त्यांनी ताबा प्रस्थापित केला होता. सुदैवाने एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया या जागतिक महासत्ता या सैतानांना थोपवण्यासाठी पुढे सरसावल्या आणि स्थानिक सैन्यांच्या मदतीला धावल्या. कुर्दिश बंडखोरांची अमेरिकेने साथ दिली, तर सिरियन सैन्याच्या मदतीला रशिया उभी राहिली. जोरदार हवाई हल्ले आणि जोडीला जमिनीवरील कारवाई यांचा असा काही दणका सुरू ठेवण्यात आला की आयसिसला शेवटी हळूहळू माघार घेणे भाग पडले. मोसूल शहराचा जेव्हा पाडाव करण्यात यश आले तेव्हा आयसिसची पीछेहाट सुरू झाली आहे यावर जणू शिक्कामोर्तब झाले. नुकतेच राक्का शहरही मुक्त झाले आहे. आयसिसकडे धाव घेणार्‍या जगभरातील माथेफिरुंचा ओघही अलीकडे कमी झाला आहे. इराक आणि सिरियामध्ये प्रत्यक्ष जमिनीवर आयसिसला वठणीवर आणण्यासाठी जोरदार मोहिमा सातत्याने सुरू आहेत. परिणामी हा सैतान मोजक्या प्रदेशांत कोंडला गेला आहे आणि त्याची पीछेहाट चालली आहे. परंतु आयसिसच्या कथित खिलाफतीचा सगळा प्रदेश जरी पुन्हा ताब्यात मिळवता आला, तरी देखील हे संकट मिटले असे घडणे शक्य नाही. याची अनेक कारणे आहेत. सर्वांत प्रमुख कारण आहे ते म्हणजे पुन्हा प्राप्त केल्या जाणार्‍या भूभागावर वर्चस्व कोणी ठेवायचे याविषयी लढणार्‍यांमध्ये एकवाक्यता नाही. सध्या आयसिसविरोधात अरब, कुर्दिश, सिरियन, इराकी असे वेगवेगळे घटक अमेरिकेची वा रशियेची मदत घेऊन लढत आहेत खरे, परंतु जेव्हा आयसिसचा पाडाव होईल तेव्हा या घटकांमध्ये सलोखा आणि एकजूट राहण्याची तीळमात्र शक्यता नाही. नुकतेच पुन्हा ताबा मिळवलेल्या काही प्रदेशांत अरबांनी लावलेले झेंडे कुर्दीशांनी उतरवले. म्हणजे अंतर्गत सुंदोपसुंदी आता डोके वर काढू लागली आहे. आयसिसच्या कब्जातून शहरे गेली आणि त्यांचे अनेक बंडखोर मारले गेले म्हणजे ती संघटना संपली असेही नव्हे. खुद्द अबु बकर अल बगदादी खरोखरच मारला गेला का याची खात्री कोणीही देऊ शकलेले नाही. त्याचे ऑडिओ संदेश अधूनमधून प्रकाशित होत असतात. त्यातून तो धर्मवेड्यांना चिथावणी देतच असतो. तो युफ्रेटिसच्या खोर्‍यात कुठे तरी दडून बसलेला असावा असा कयास आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आयसिसच्या ताब्यातून परत मिळवलेल्या प्रदेशांमध्ये आयसिस समर्थकांचीही कमी नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या तीन वर्षांत तेथे निर्माण केलेले जाळे काही या लष्करी कारवायांतून उद्ध्वस्त होणार नाही. सध्या आयसिसने माघार घेतलेली असली तरी ती तात्पुरती माघार असू शकते. नुकतेच अल इरायतन शहराला फौजांनी मुक्त केले होते, परंतु एकाएकी कोठून तरी अडीचशे आयसिस अतिरेकी अचानक अवतरले आणि त्यांनी प्रचंड हत्याकांड घडवले. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणे अशक्य नाही. त्यामुळे अमेरिका, रशियासारख्या आंतरराष्ट्रीय शक्ती किती काळ इराक आणि सिरियामध्ये लढणार हाही प्रश्न आहे. अफगाणिस्तानमधून माघार घेण्याची अमेरिकेवर अखेर जशी वेळ आली, तसेच येथेही होईल. मग काय हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. आयसिस सध्या गनिमी नीती अवलंबताना दिसते आहे. आपल्या कब्जातील शहरांमधून जरी त्यांना माघार घेणे भाग पडत असले, तरीही बहुतेक बंडखोर दडून बसलेले आहेत आणि ते कधीही कोठेही डोके वर काढू शकतात. ज्यांना ‘लोन वूल्फ’ म्हटले जाते असे एकांडी दहशतवादी जगभरात अधूनमधून घातपात घडवीत असतात. यापुढेही अशा प्रकारच्या धोक्यांचा सामना जगाला करायचा आहे. अशा वेळी आयसिसच्या हाती एखाद्या प्रदेशाची सत्ता प्रत्यक्षात राहणे म्हणजे जगाच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहेच, परंतु त्यांच्या हातून प्रदेश हिसकावून घेण्यात यश आले, तरी ती दहशतवादाची विषवल्ली जोवर तळाशी टिकून असेल तोवर तिला नवे धुमारे फुटण्याची भीती राहीलच!