‘गुलाबी’ कसोटीवर भारताची पकड

0
145

>> बांगलादेशचा १०६ धावांत खुर्दा; इशांतचे पाच बळी

गुलाबी चेंडूने खेळविण्यात येत असलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने मजबूत स्थिती गाठली आहे. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांत संपवून टीम इंडियाने दिवसअखेर ३ बाद १७४ धावा करत ६८ धावांची आघाडी घेतली आहे. भारताचे अजून सात गडी शिल्लक असून किमान २५० धावांच्या आघाडीचे विराटसेनेचे लक्ष्य असेल.

विराट पाच हजारी कर्णधार
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांत कर्णधार म्हणून पाच हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने काल आपल्या नावावर केला. कोहलीने केवळ ८६ डावांत हा टप्पा ओलांडला तर यासाठी रिकी पॉंटिंगला ९७ डाव लागले होते. क्लाईव लॉईड (१०६), ग्रीम स्मिथ (११०), ऍलन बॉर्डर (११६), स्टीफन फ्लेमिंग (१३०) हेदेखील या पंक्तीत आहेत.

बांगलादेश पहिला संघ
एकाच कसोटीत दोन कन्कशन सबस्टिट्यूट खेळविणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला. लिटन दास व नईम हसन यांच्या जागी बांगलादेशने मेहदी मिराझ व ताईजुल इस्लाम यांना उतरवले. बांगलादेशच्या डावातील २१व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर शमीच बाऊन्सर दास याच्या हेल्मेटला आदळला. यानंतर फिजियोने त्याची पाहणी केली. दासने पुढे खेळणे सुरू करत दोन चौकारही लगावले. परंतु, २७ चेंडूंत २४ धावांवर खेळत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने मैदान सोडतान पंचांनी पहिले सत्र संपल्याची वेळेची घोषणा केली. यावेळी बांगलादेशचा संघ ६ बाद ७३ अशा स्थितीत होता. ब्रेकनंतर बांगलादेशने मेहदी मिराझ कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून जाहीर केला. लिटन हा यष्टिरक्षक फलंदाज असल्याने मेहदी मिराझला दोन्ही डावांत गोलंदाजी करता येणार नाही. नईम हसनच्या बाबतीतही काहीसे असेच झाले. बाऊन्सर कानाजवळ आदळल्यानंतरही त्याने फिजियोंकडून काही प्रथमोपचार घेत फलंदाजी सुरूच ठेवली. इशांतच्या गोलंदाजीवर तो बाद देखील झाला. बांगलादेशने यानंतर त्याच्या जागी कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून ताईजुल इस्लामचे नाव जाहीर केले.

धावफलक
बांगलादेश पहिला डाव ः शदमन इस्लाम झे. साहा गो. उमेश २९, इमरूल कायेस पायचीत गो. इशांत ४, मोमिनूल हक झे. रोहित गो. उमेश ०, मोहम्मद मिथुन त्रि. गो. उमेश ०, मुश्फिकुर रहीम त्रि. गो. शमी ०, महमुदुल्ला रियाद झे. साहा गो. इशांत ६, लिटन दास जखमी निवृत्त २४, नईम हसन त्रि. गो. इशांत १९, इबादत हुसेन त्रि. गो. इशांत १, मेहदी हसन झे. पुजारा गो. इशांत ८, अल अमिन हुसेन नाबाद १, अबू जायेद झे. पुजारा गो. शमी ०, अवांतर १४, एकूण ३०.३ षटकांत सर्वबाद १०६
गोलंदाजी ः इशांत शर्मा १२-४-२२-५, उमेश यादव ७-२-२९-३, मोहम्मद शमी १०.३-२-३६-२, रवींद्र जडेजा १-०-५-०

भारत पहिला डाव ः मयंक अगरवाल झे. मेहदी गो. अल अमिन १४, रोहित शर्मा पायचीत गो. इबादत २१, चेतेश्‍वर पुजारा झे. शदमन गो. इबादत ५५, विराट कोहली नाबाद ५९, अजिंक्य रहाणे नाबाद २३, अवांतर २, एकूण ४६ षटकांत ३ बाद १७४
गोलंदाजी ः अल अमिन हुसेन १४-३-४९-१, अबू जायेद १२-३-४०-०, इबादत हुसेन १२-१-६१-२, ताईजुल इस्लाम ८-०-२३-०