सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी एससी ईस्ट बंगालची वास्को येथील टिळक मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. अद्याप गुणांचे खाते रिक्त असले तरी जमशेदपूरला हरवून दैव पालटण्याचा निर्धार रॉबी फाऊलर यांच्या संघाने केला आहे. ईस्ट बंगालची मोसमाची सुरवात निराशाजनक झाली आहे. त्यांना गुण मिळवण्याची गरज आहे. इंग्लंडच्या फाऊलर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या या संघाला आता सलग चौथा पराभव टाळायचा असेल तर त्यांना चुका करून चालणार नाही. फाऊलर यांनी सांगितले की, आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. जमशेदपूरविरुद्धचा सामना खडतर आहे. या सामन्यात आम्ही मैदानावर उतरून कामगिरीत सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न करू शकतो. कामगिरीच्या बाबतीत आमचा खेळ अगदीच खराब झालेला नाही, पण निकाल आमच्यासाठी प्रतिकूल लागले आहेत.
गोलच्या संधी निर्माण करूनही ईस्ट बंगालला यंदा अद्याप गोल करता आलेला नाही. शॉटमधील कमी अचूकतेच्या यादीत २०.५१ अशा टक्केवारीमुळे त्यांचा संयुक्त दुसरा क्रमांक आहे. त्यांना गोलक्षेत्रात केवळ १७ शॉट नोंदवता आले असून हे प्रमाणही खराब कामगिरीत दुसर्या क्रमांकाचे आहे. झगडत असलेल्या आघाडी फळीतील खेळाडूंचे फाऊलर यांनी ठामपणे समर्थन केले. ते म्हणाले की, हा मुद्दा नेहमी स्ट्रायकर्सशी संबंधित नसतो. इतरांनी सुद्धा गोल करणे आपल्यासाठी गरजेचे असते. खेळाडूंनी संधीच निर्माण केल्या नसत्या तर मला चिंता वाटली असती, पण आम्ही त्या निर्माण करीत आहोत.
तीन सामन्यांत सात गोल पत्करलेल्या संघासाठी मात्र जमशेदपूरचा स्टार स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याला रोखणे गरजेचे असेल. वॅल्सकीसने चार सामन्यांत पाच गोल केले आहेत. फाऊलर यांनी सांगितले की, प्रत्येक सामन्यासाठी असते तशी योजना आमच्याकडे असेल. जमशेदपूरला गोल करण्यापासून रोखण्यावर आमचा भर असेल. दुसरीकडे एटीके मोहन बागानवरील २-१ अशा विजयामुळे जमशेदपूरच्या संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. एटीकेएमबीने आधीच्या तीन सामन्यांत क्लीन शीट राखल्या होत्या. जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांना फाऊलर यांची कार्यपद्धती परिचयाची आहे. त्यामुळे ईस्ट बंगालविरुद्ध खेळमे सोपे नसल्याची त्यांना जाणीव आहे. कॉयल यांनी सांगितले की, एटीकेएमबीविरुद्धच्या लढतीप्रमाणेच हा सामना खडतर असेल. त्यासाठी सज्ज असल्याची खात्री करणे आम्हाला गरजेचे आहे. जमशेदपूरचा संघ फार धोकादायक प्रतिस्पर्धी आहे.
कॉयल यांच्या संघाचा १५ दिवसांमधील हा पाचवा सामना असेल. बचावाच्या संदर्भात एटीकेएमबीविरुद्धचा सामना त्यांचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याच्या उदयामुळे उल्लेखनीय ठरला. आक्रमणाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गेल्या चार सामन्यांत जमशेदपूरने सहा गोल केले आहेत. यातील पाच वॅल्सकीसचे आहेत. ईस्ट बंगालला मोसमात पहिला निर्णायक विजय मिळवायचा असेल तर परिपूर्ण कामगिरी करावी लागेल.