>> दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर
>> हिमाचल प्रदेशमध्ये ४० जागा जिंकत कॉंग्रेसकडून सत्ता काबीज
>> गुजरातमध्ये विक्रमी १५६ जागा जिंकत भाजप सातव्यांदा सत्तेत
>> कॉंग्रेसची गुजरातमध्ये, तर ‘आप’ची दोन्ही राज्यांमध्ये दाणादाण
बहुप्रतीक्षित गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. गुजरातमध्ये भाजपने मोठा विजय मिळवत सलग सातव्यांदा सत्ता काबीज केली. भाजपचा गड भेदण्यात कॉंग्रेस आणि ‘आप’ला अपयश आले. हिमाचलमध्ये सत्तापरिवर्तनाची परंपरा यावेळी देखील कायम राहिली. भाजपला सत्तेतून खाली खेचत कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला. गुजरातमध्ये भाजपने विक्रमी १५६ जागा जिंकत निर्विवाद विजय संपादित केला, तर कॉंग्रेसने हिमाचलमध्ये ४० जागा जिंकत सत्ता मिळवली. गुजरात आणि हिमाचलमध्ये प्रचारातून मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला दोन्ही ठिकाणी विशेष यश मिळू शकले नाही.
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाले होते, तर दुसर्या टप्प्यात ५९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला.
गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा अंदाज आधीपासूनच व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने मोठा विजय गुजरातमध्ये भाजपने मिळवला. कॉंग्रेसची या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली. गुजरातमध्ये आता भाजप सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. आम आदमी पक्ष पहिल्यांदा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. आपला देखील बर्यापैकी मते या निवडणुकीत मिळाली.
गेल्या वेळच्या निवडणुकीत केवळ ९९ जागा जिंकणार्या भाजपने यावेळेस सर्वाधिक १५६ जागांवर विजय प्राप्त केला. तसेच गेल्या वेळी ७७ जागा जिंकणार्या कॉंग्रेसची यावेळेस पुरती दाणादाण उडाली. कॉंग्रेसला केवळ १७ जागा जिंकता आल्या. आम आदमी पक्षाला ५, अपक्षांना ३ आणि समाजवादी पक्षाला १ जागेवर विजय मिळवता आला.
सत्तापरिवर्तनाची परंपरा हिमाचलमध्ये कायम
हिमाचलमध्ये गेल्या काही विधानसभा निवडणुकांत कोणत्याही पक्षाला आपली सलग दुसर्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप यांना आलटून पालटून सत्ता मिळत आलेली असून, तीच परंपरा यावेळी कायम राहिली. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे कल जाहीर होऊ लागल्यानंतर सुरुवातीपासून कॉंग्रेसने ४० जागांवर आघाडी घेतली होती. मतमोजणी अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत कॉंग्रेसने ४० जागा जिंकत सत्ता काबीज केली. गेल्या वेळी केवळ २१ जागा जिंकणार्या कॉंग्रेसने यावेळेस चांगली मुसंडी मारली. दुसर्या बाजूला भाजपची मात्र चांगलीच पिछेहाट झाली. गेल्या वेळेस ४४ जागा जिंकणार्या भाजपला यावेळेस केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. हिमाचलमधील ३ जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. हिमाचलमधील भाजप सरकारमधील ८ मंत्र्यांचा मात्र पराभव झाला, तर ज्या दोघांनी मंत्रिपद सोडले होते, त्यांचा विजय झाला.
दरम्यान, हिमाचलध्ये कॉंग्रेस आणि भाजपला जवळपास समसमान मते मिळाली, तरीही या ठिकाणी कॉंग्रेसने बाजी मारली. कॉंग्रेसला ४३.९ टक्के, तर भाजपला ४३ टक्के मिळाली; पण दोन्ही पक्षांना मिळालेल्या जागांमध्ये मोठा फरक आहे.
भाजपचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय
भाजपचा यावेळचा विजय गुजरात विधानसभा निवडणुकांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. त्याशिवाय, भाजपने २० वर्षांपूर्वीचा सर्वाधिक जागा जिंकण्याचा कॉंग्रेसचा ३७ वर्षे जुना विक्रम मोडला. माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्त्वात कॉंग्रेसने १९८५ मध्ये १४९ जागांवर विजय मिळवला होता. त्यापेक्षा जास्त जागा २०२२च्या निवडणुकीत भाजपने मिळवल्या. भाजपने तब्बल १५६ जागांवर विजय संपादित केला.
भाजपचा नवा विक्रम; ५२.५ टक्के मतांवर कब्जा
भाजपने यंदाच्या गुजरात निवडणुकीत या आधीचे सर्व जुने विक्रम मोडले आणि तब्बल ५२.५ मते मिळवली. २००२ सालच्या निवडणुकीत ४९.८५ टक्के, २००७ साली ४९.१२ टक्के, २०१२ साली ४७.८५ टक्के आणि २०१७ मध्ये ४९.१ टक्के मते भाजपने मिळवली होते. यंदा त्यापेक्षा अधिक मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपली मते टाकली. यावेळेस कॉंग्रेसला २७.३ टक्के, तर ‘आप’ला १२.९ टक्के मते मिळाली.
कॉंग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणेही कठीण
विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये कॉंग्रेसची पुरती दाणादाण उडाली आहे. गुजरात विधानसभेसाठी कॉंग्रेसने १७९ जागांवर उमेदवार दिले होते; पण कॉंग्रेसला एकूण जागांच्या १० टक्के जागा सुद्धा मिळवता आलेल्या नाहीत. दारूण पराभवामुळे आता कॉंग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळणे कठीण झाले आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागा आहेत. विरोधी पक्ष नेतेपदासाठी कमीतकमी १० टक्के जागा निवडून येणे अनिवार्य आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी गुजरातमध्ये कमीतकमी १८ जागा हव्या आहेत; पण कॉंग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत.
या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार. सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमची मेहनत आणि समर्पण यामुळे विजय साकार होऊ शकला. जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, याची आपण ग्वाही राहुल गांधी, नेते, कॉंग्रेस.
गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश भाजपला देऊन राज्यातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. गुजरातच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की विकसित भारताची आकांक्षा सर्वसामान्यांमध्ये किती प्रबळ नरेंद्र मोदी, पंतप्रधान.