>> गेल्या वेळच्या तुलनेत मतदानात घट; ७८८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
ाल पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडले. त्यात सुमारे ६०.२० टक्के मतदान झाले. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार २०१७ च्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीत या ८९ जागांसाठी ६८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळेस मतदानात ८ टक्क्यांची घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील १९ जिल्ह्यांतील ८९ जागांवर मतदान झाले. गुजरातमधील दुसर्या टप्प्याचे मतदान आता ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
काल पहिल्या टप्प्यात राजकोट, सुरेंद्रनगर, कच्छ, मोरबी, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोताड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलासड या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. या जिल्ह्यांत २५ हजार ४३४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. काल सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. सकाळच्या सत्रात मतदार फार कमी संख्येने बाहेर पडल्याचे आकडेवारीतून दिसून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वच जिल्ह्यांत मिळून १८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रमाण ३४ टक्क्यांवर आणि त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत ४८ टक्क्यांवर पोहोचले. अखेर ५ वाजेपर्यंत केवळ ६०.२० टक्के मतदानाची नोंद झाली.
गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा काल शांततेत पार पडला असला, तरी नवसारीत मतदानापूर्वी भाजपच्या उमेदवारावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. वांसदा विधानसभेतील भाजपचे उमेदवार पियुष पटेल यांच्या वाहनावर लोकांनी हल्ला केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, गृहमंत्री हर्ष संघवी, दिवंगत नेते अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल, आप नेते गोपाल इटालिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आदींनीही आपापल्या केंद्रांवर मतदान केले.
मागील निवडणुकीत भाजपला ४८, तर कॉंग्रेसला मिळाल्या ४० जागा
२०१७ च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ८९ पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला ४० जागा मिळाल्या होत्या. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेससोबत आपचाही समावेश आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.