- अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
गांधीजींच्या शिकवणीचा अर्थ आम्ही असा आमच्या फायद्याप्रमाणे लावलाय.
खरं म्हणजे आमच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि कानांवर हात दुसर्याच कोणीतरी ठेवलेत. शिवाय आम्ही आमच्या तोंडावरचा हात काढला तर दुसर्या कुणाचातरी हात आमच्या गळ्याभोवती आवळला जाईल ही भीती आहेच.
लहानपणापासून ऐकत आलोय. म. गांधीजींची तीन माकडं फार प्रसिद्ध आहेत. एकाचे हात कानांवर – वाईट ऐकू नये म्हणून; एकाचे हात डोळ्यांवर – वाईट बघू नये म्हणून आणि एकाचे हात तोंडावर – वाईट बोलू नये म्हणून. वाईट ऐकू नये, वाईट पाहू नये, वाईट बोलू नये… हा संदेश गांधीजींनी सार्या भारतवासियांना दिला होता. तीन माकडं त्याचेच प्रतीक!
हळूहळू काळ बदलला. माणसं आपमतलबी झाली. माणसांची मानसिकता बदलली आणि प्रत्येक माणसाने त्या संदेशाचा अर्थ वेगळा वेगळा आपल्या सोयीनुसार फिरवून घेतला. माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. समाजातली अनेक उदाहरणं खूप बोलकी आहेत. भरलेल्या बसमध्ये एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो. बाकीचे लोक तोंडावर हातच काय, पट्टीच बांधून बसले होते. कोणीही त्यावर आवाज उठवला नाही. डोळ्यांवरही पट्टी म्हणजे जसं काही आम्ही काही बघितलंय नाही. त्या मुलीच्या करुण किंकाळीचा आवाज कान बंद केल्यामुळे आम्हाला ऐकू आला नाही. अशा अनेक घटना समाजामध्ये दररोज घडत असतात. हे आजच असं नाही तर महाभारत काळापासून घडत आले आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना पितामह भीष्म, कुलगुरू द्रोणाचार्य, विदुर कोणालाच हे दिसलं नाही. कोणालाही द्रौपदीची किंकाळी ऐकू आली नाही. त्याविरुद्ध कोणीही ब्र काढला नाही. या सगळ्यांनी, तमाम सभेने डोळे, कान आणि तोंड बंद करून घेतले होते का असा प्रश्न पडतो. दिसले फक्त श्रीकृष्णाला. त्याने तिची अब्रू राखली पण त्याचबरोबर कोणालाही शासन केले नाही. यावरून हातिमताईची गोष्ट आठवली. एका राजाला लोकांवर केलेले अत्याचार दिसत नव्हते. म्हणून त्याने त्याची दृष्टी काढून टाकली. अत्याचार झालेल्या लोकांच्या भेदक किंकाळ्या त्याला ऐकू आल्या नाहीत म्हणून त्याला बहिरे केले. कोणाच्या अत्याचाराविरुद्ध राजाने आवाज काढला नाही त्याची जीभ छाटून टाकली. लोकांच्या मदतीसाठी त्याचे हात-पाय पोचले नाहीत म्हणून त्याचे हात-पाय काढून टाकले आणि लोकांच्या रक्षणाचा विचारसुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही म्हणून त्याचा मेंदू निकामी केला आणि त्याला गलीत-गात्र करून टाकले. आमच्या डोळे, तोंड आणि कान यांवरचे हाता काढायला असाच कोणीतरी दरवेश आला पाहिजे.
सध्याच्या काळात माणसावर या तीन माकडांसारखीच परिस्थिती आलीय. समाजात असंख्य घटना घडताहेत. संपत्तीसाठी एकमेकांचे खून होताहेत. स्त्रियांवर राजरोसपणे बलात्कार होताहेत. साधुसंतांवर हल्ले होताहेत. दहशतवादानं कळस गाठलाय आणि आम्ही मात्र षंढासारखे हे सगळं गुपचूप सहन करतोय. कारण आमचे डोळे बंद केल्यामुळे असून नसल्यासारखे. कान असून नसल्यासारखे, तोंड असून मौन. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. गांधीजींच्या शिकवणीचा अर्थ आम्ही असा आमच्या फायद्याप्रमाणे लावलाय.
खरं म्हणजे आमच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि कानांवर हात दुसर्याच कोणीतरी ठेवलेत. कारण आम्ही बघू नये, ऐकू नये आणि त्याबद्दल कुठे वाच्यताही करू नये आणि असंही आम्ही बघून ऐकून आवाज उठवला तर तो ऐकून तरी कोण घेणार? आम्ही आमच्या तोंडावरचा हात काढला तर दुसर्या कुणाचातरी हात आमच्या गळ्याभोवती आवळला जाईल ही भीती आहेच. तेव्हा आपण माकडंच बनलेलं बरं अशीच धारणा झालेली आहे.
त्याचीच आम्हाला इतकी सवय झालीय की जगात काही बघण्यासारखं, ऐकण्यासारखं आणि बोलण्यासारखं चांगलं असू शकतं हेच आम्ही विसरून गेलोय. डोळे, तोंड आणि कानावरचे हात काढायची आम्हाला भीती वाटू लागलीय. आज गांधीजी असते तर त्यांना त्याचं वैषम्यच वाटलं असतं. त्यांनी आपला संदेश मागे घेतला असता. आमचे डोळे, तोंड आणि कानावर असलेले हात मागे झटकून ओढले असते आणि म्हणाले असते, ‘‘अरे षंढांनो, जागे व्हा. समाजात बघा काय चाललंय ते, ऐका ते आवाज. अशा वेळी तुम्ही निष्क्रिय झालात, तर तुमच्या आयाबहिणींची अब्रू कोण वाचवणार? त्यांचं रक्षण कोण करणार? आज तुम्हांलाच श्रीकृष्ण व्हायचे आहे हे लक्षात ठेवा’’.