गर्भिणीमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण

0
79
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज, पणजी

प्रसूतीनंतर पुढील आयुष्यात वजन कमी ठेवल्यास, आहारावर नियंत्रण ठेवल्यास, कायमस्वरूपी आणि नियमित व्यायाम केल्यास मधुमेह हा आजार स्त्रियांना बर्‍याच अंशी टाळता येऊ शकतो.

‘मधुमेहाचे भारतातील वाढते प्रमाण’ हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने एक मोठे आव्हान ठरले आहे. भारतात ‘टाइप-२’ डायबिटिसचे प्रमाण अति वेगाने वाढत असल्यामुळे गरोदरपणातल्या मधुमेहाचे प्रमाणही वाढते आहे. हा मधुमेह आईसाठी आणि बाळासाठी धोक्याचा ठरू शकतो. आजकाल लग्नेही जरा उशीर वयात होतात. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी मूल होण्याची स्वप्ने पाहताना अगोदरपासूनच याची काळजी घेतली आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेतला तर असा मधुमेह काही प्रमाणात नक्कीच टाळता येऊ शकतो.

मधुमेह हा आजार आपल्या शरीरातील चयापचय क्रिया जर बिघडली तर होतो. पोटातील अग्नाशय (पॅन्क्रियाज) किंवा स्वादुपिंडनामक ग्रंथीमधून इन्सुलीन नावाच्या हार्मोन (संप्रेरक)चा स्त्राव होतो. हे इन्सुलीन रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते. या ग्रंथीमधून इन्सुलीन निघण्याची क्षमताच नसेल किंवा फार कमी प्रमाणात इन्सुलीनची निर्मिती होत असेल तर मधुमेह होतो.
गर्भवतींमध्ये मधुमेहाचे दोन गट दिसून येतात.
१) पहिला गट – ज्या स्त्रियांना गर्भवती होण्याआधीपासूनच मधुमेह आहे – इन्सुलीन डिपेन्डन्ट.
२) दुसरा गट – गर्भधारणेपूर्वी मधुमेह नव्हता. परंतु गर्भावस्थेत प्रथमतःच मधुमेह झालेला आहे. – गेस्टेशनल डायबिटीस – या स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर पुन्हा ग्लुकोजचे प्रमाण नॉर्मल होते. अशा स्त्रियांना नंतरच्या आयुष्यात मात्र मधुमेह होण्याचे प्रमाण ४०टक्के आहे.

हा डायबेटीस प्रकार फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो. गर्भवती स्त्रियांना होणार्‍या त्रासांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजे २१ ते २२ आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो.
गर्भवती स्त्रियांमध्ये वाढणार्‍या मधुमेहाची कारणे….

  • आपला आहार व बदललेली जीवनशैली.
  • व्यायामाचा अभाव
  • असमतोल आहार
  • सध्या जगण्यात असलेली प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानसिक ताण.
    वरील सर्व कारणांमुळे आज मधुमेहाचा आजार वाढलेला आहे.
    मधुमेहामुळे गर्भवती स्त्रीवर होणारे परिणाम…
  • – वेळेपूर्वीच प्रसूती
  • वाढलेल्या साखरेमुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.
  • गरोदरपणातील साखरेमुळे गर्भाचे वजन वाढते. त्यामुळे सिझेरीयन डिलिव्हरी होण्याची शक्यता असते.
  • अशा गर्भवती स्त्रीला पुढील आयुष्यात टाइप-२ प्रकारचा मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी योग्य काळजी न घेतल्यास त्यातून पुढे हृदयरोग, किडनीचा आजार हे मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम उद्भवतात.
    गरोदरपणात मधुमेह झाल्यास बाळावर होणारे परिणाम…..
  • बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाल्यास जन्मानंतर बाळाला श्‍वास घ्यायला त्रास होतो.
  • हायपोग्लायसेमियाची स्थिती बाळामध्ये निर्माण होऊ शकते. यात जन्मानंतर बाळाच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी असू शकते.
  • बाळाचे वजन जास्त राहते त्यामुळे मोठेपणी त्याला टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
  • गरोदरपणात फास्टिंग शुगरचे प्रमाण ९० पेक्षा कमी राखल्यास बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
    गरोदरपणात रक्तातील साखरेची चाचणी करून घ्यावी. कधी कधी दिवसातून चार- पाच वेळा साखर तपासणी आवश्यक असते. घरच्या घरी तपासणीसाठी ग्लुकोमीटरचा वापर करावा.
    मधुमेह उपचार –
    गरोदरपणात मधुमेह इन्सुलीनच्या साहाय्याने आटोक्यात ठेवता येतो. आधुनिक शास्त्राप्रमाणे तोंडाने घेता येणारी मधुमेहावरील औषधे वापरता येत नाहीत. कारण त्यांचा गर्भावर परिणाम होण्याची भीती असते. यासाठी गर्भारपणातील मधुमेहात सुरक्षित उपाय म्हणून इन्सुलीनच वापरले जाते. जसजसे दिवस वाढत जातात तसतसे इन्सुलीनचा डोस वाढवावा लागतो. यासाठी नियमितपणे ग्लुकोजची पातळी तपासणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे असते.
    इन्सुलीन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते.

मधुमेहामुळे गर्भावस्थेत होणारे सर्व वाईट परिणाम टाळण्याकरिता अशा स्त्रियांनी गर्भवती होण्याआधीच मधुमेह नियंत्रित करावा. संपूर्ण गर्भावस्थेत मधुमेहाचे व्यवस्थित जय नियंत्रण केले तर सुरक्षित मातृत्व मिळणे सोपे आहे. अशा स्त्रियांनी नियमित तपासणी, उत्तम मधुमेहतज्ज्ञांचा व आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गर्भवतीने आपली फाईल व सर्व रिपोर्टस् नीट लावून तपासणीला जावे.

अशा स्त्रियांना सोनोग्राफीचीही गरज असते. बाळाची वाढ योग्य प्रकारे होते की नाही व प्रसूतिपूर्व तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून करून घ्यावी. अडतिसाव्या आठवड्यात प्रसूती करवून घेणे योग्य.
मधुमेही गर्भवतीचा आहार …
मधुमेही गर्भवतींना उपचाराबरोबर आहाराचे नियोजन तेवढेच महत्त्वाचे आहे. शरीराला साखरेची आवश्यकता असते. खाल्लेल्या अन्नाचे विघटन व अन्नपचन नीट झाले व स्वादुपिंडाचे काम व्यवस्थित चालले तरच शरीरात साखरेचे शोषण होते. अन्यथा न पचलेली साखर रक्तात साठत जाते किंवा लघवीतून बाहेर जाऊ लागते. रक्तात साठलेल्या साखरेची परस्पर विल्हेवाट लावल्याने हलके हलके साखर पचविण्याचे काम शरीर विसरून जाते व स्वादुपिंड अधिकच आळशी बनते. दूध, मिठाई, पक्वान्ने यांच्याबरोबर साखर शिजवल्यानंतर पचायला कठीण होते. परंतु चहा, सरबत, शिरा यात मिश्रण रूपात असलेली साखर पचावयास हलकी व गुणाने थंड असते. आहारात थोडीशी साखरही नेहमीच असावी. अर्थात मिठाई किंवा साखरेचे अतिसेवन करू नये.

  • वारंवार, वेळी-अवेळी खाल्ल्याने स्वादुपिंडावर ताण पडतो व हलके हलके ते काम करेनासे होते. योग्य अंतराने व नियमित आहार सेवन करावा.
  • लघवीतून साखर जाऊ लागली की मूत्रपिंडावर ताण वाढतो. त्यामुळे फ्लॉवर, कोबी, चवळी, राजमा, छोले, चीज इत्यादी खाऊ नये.
  • फळांपैकी चिक्कू, अननस, सीताफळ, रामफळ, फणस, आंबा, पपई अजिबात खाऊ नये. इतर फळे अत्यल्प प्रमाणात कधीतरी खाता येऊ शकतील.
  • पक्वान्नांपैकी खवा, चण्याचे पीठ वापरून केलेली पक्वान्ने, श्रीखंड खाऊ नये.
  • दूध, रव्याची खीर, रव्याचा शिरा, मुगाचा लाडू असे पदार्थ अल्प प्रमाणात खाता येतात.
  • योग्य प्रमाणात भात, बटाटे, साजूक तूप, ताजे दूध घेता येते.
  • योग्य प्रमाणात घेतलेला किंवा औषधाबरोबर घ्याव्या लागणार्‍या मधाचा त्रास मधुमेहींना होत नाही.
  • अंडे मात्र कधीच खाऊ नये.
  • कारल्याची, मेथीची भाजी भरपूर प्रमाणात खाऊ नये.
  • सातू, वरी, नाचणी, मूग, कुळीथ, हरभरा, जुने तांदूळ, ताक, दूध, पालेभाज्या हे सेवन करावे.
  • प्रामुख्याने आहारातील सिम्पल कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण कमी, फायबरचे जास्त, प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असावे. योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात आहार घ्यावा… याबाबतचा सल्ला प्रत्येक स्त्रीला वजन आणि साखरेच्या पातळीनुसार दिला जातो.
  • चालण्याचा व्यायाम करावा.
  • प्राणायाम नेहमी करावे.
  • बसून राहणे, दिवसा झोपणे, नवीन धान्य, दही, धूम्रपान, स्वेदन, मद्य, तेल, गूळ, साखर, क्षार, आंबट पदार्थ, पिठाचे पदार्थ, आनूप मांस वर्ज्य करावे.
  • आयुर्वेदिक औषधी कल्पांमध्ये आमलकी, हरिद्रा, मुस्ता, चंदन, अर्जुन, लोथ्र, खदीर, हरितकी, वड, उंबर, जांभूळ, बेल, लोह, शीलाजीत, वसंतकुसुमाकर, असनाद, लोध्रासव, लोहासव, जंब्वासव यांचा वापर करता येतो. ती चिकित्सा फक्त वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी.

प्रसूतीनंतर आईची काळजी
प्रसूतीनंतर पुढील आयुष्यात वजन कमी ठेवल्यास आहारावर नियंत्रण ठेवल्यास, कायमस्वरूपी आणि नियमित व्यायाम केल्यास मधुमेह हा आजार स्त्रियांना बर्‍याच अंशी टाळता येऊ शकतो. प्रसूतीनंतर दर तीन ते सहा महिन्यांनी पुढील आयुष्यभर तपासणी करणे आवश्यक आहे.