- डॉ. मनाली महेश पवार
भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपल्या जेवणात कर्बोदकं खूप जास्त आणि प्रथिनं कमी झाली आहेत. खाण्यावर संयम राहिलेला नाही. म्हणूनच भारतात जगाच्या तुलनेत सर्वात जास्त मधुमेही सापडतात.
सध्या गर्भारपणातील मधुमेहाचे (जेस्टेशनल डायबिटीज मेलिटस- ‘जीडीएम’) वाढते प्रमाण पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. या ‘जीडीएम’चा थेट परिणाम गर्भावर होतो व त्यामुळे अर्भकमृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वी या प्रकारचा मधुमेह फक्त उच्चभ्रू समाजातील स्त्रियांमध्ये आढळत होता; पण आता सर्व स्तरांतील स्त्रियांमध्ये हा मधुमेह आढळत आहे. याची कारणे- व्यायामाचा अभाव, अन्नपदार्थांची भरपूर रेलचेल तसेच उपलब्धता, संपूर्ण जीवनपद्धतीमध्ये लाक्षणिक बदल, आरोग्याबाबत अनास्था. भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपल्या जेवणात कर्बोदकं खूप जास्त आणि प्रथिनं कमी झाली आहेत. खाण्यावर संयम राहिलेला नाही. म्हणूनच भारतात जगाच्या तुलनेत सर्वात जास्त मधुमेही सापडतात.
कारण कामाचा, नोकरीचा महिलांच्या मनावर पडणारा अतिरिक्त ताण-तणाव. परिणामी उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि त्याचबरोबर मधुमेह! गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर स्त्रीने योग्य पोषक आहार न घेतल्यास लठ्ठपणा वाढतो व त्याचा परिणाम स्त्रीबरोबर गर्भावरही होतो. हे परिणाम त्याच्या जनुकीय रचनेवर झाल्यामुळे हे बाळ मोठे झाल्यावर त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता खूप जास्त वाढले. त्याचबरोबर आजची पिढी ज्या तणावाखाली आपल्या करिअरच्या मागे धावत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने मधुमेह त्याच्या मागे धावत आहे. हा मधुमेह जेव्हा तरुण वयातच जडतो तेव्हा पुढच्या येणाऱ्या पिढीला धोका निर्माण करतो.
गरोदरपणातील मधुमेहाचे प्रकार ः
- पहिला प्रकार म्हणजे गरोदर राहण्याच्या आधीच असलेला मधुमेह आणि दुसरा प्रकार म्हणजे साधारण सातव्या महिन्यात होणारा मधुमेह (जेस्टेशनल डायबिटीज). स्त्रियांमध्ये बहुतांशी दुसऱ्या प्रकारचा मधुमेह दिसून येतो.
‘आपल्या वेळेला ही ‘जीटीटी’सारखी (ग्लुकोज टेस्ट) टेस्ट केली जात नव्हती. ती उगीचच टेस्ट व सगळ्यांचीच करतात’ अशी विधाने आई, आजी, काकू, आत्या, मावशी इत्यादी सगळ्याच करतात किंवा करत असतील. काही तर ‘अशी शुगरबिगर काही नसते’ म्हणून औषधोपचारसुद्धा घेण्यास परावृत्त करतात. त्याचा परिणाम गर्भावर होतो व अकाली मृत्यू संभवतो.
प्रत्येक गर्भवतीची सातव्या महिन्यात ‘जीटीटी’ नावाची टेस्ट करण्यात येते. यामध्ये 75 ग्रॅम ग्लुकोज देऊन दोन तासांनी गर्भवतीची शुगर तपासतात. 75 ग्रॅम ग्लुकोज देऊनसुद्धा ज्या स्त्रियांची शुगर 140 पेक्षा कमी येते त्यांचे शरीर ग्लुकोजचे व्यवस्थित विघटन करू शकते असा अर्थ घेतला जातो. ज्या स्त्रियांचे शरीर हे करू शकत नाही त्यांची शुगर वाढते आणि मग मधुमेहाचे निदान केले जाते.
भात, बटाटा, साखर, मैदा व मीठ अशी कर्बोदके आहारातून वगळली आणि रोज एक तास चालण्याचा व्यायाम सुरू केला तर शुगर नियंत्रणात येऊ शकते. गरोदरपणात उपाशीपोटी शुगर 90 च्या खाली आणि जेवल्यानंतर 120 च्या खाली असावी लागते.
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात स्रवणारे सगळेच हॉर्मोन्स तिची शुगर वाढवण्याचे काम करतात. एरव्ही हे बाळाच्या पोषणासाठी गरजेचे असते. पण मधुमेही गर्भवतीच्या शरीरातील चयापचय वेगळे असल्यामुळे तिची शुगर प्रमाणापेक्षा जास्त वाढत जाते. आईची शुगर वाढल्यामुळे बाळावर हळूहळू विपरित परिणाम होऊ लागतात. बाळाचे वजन अनियंत्रित वाढू लागते. बाळामध्ये हृदय, किडनी, मेंदू, पाठीचा कणा, पचनसंस्था यांतील विकृती, तसेच दुभंगलेले टाळू, ओठ अशी वेगवेगळी व्यंगे निर्माण होऊ शकतात. अशी बाळं वजन जास्त असूनही तब्येतीने अतिशय नाजूक होतात. जन्मानंतर त्यांना शुगर कमी होणे, कावीळ यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.
गरोदरपणातील मधुमेहामुळे बाळाचे वजन वाढते, तसेच प्रसूतीच्या कळा सहन करण्याची ताकद खूपच कमी होते. त्यामुळे सिझरियनची शक्यता वाढते. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास बाळाचे डोके किंवा खांदे अडकून बसल्याने फार मोठा धोका उद्भवू शकतो.
हा मधुमेह अनुवांशिकसुद्धा असू शकतो. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह होतो त्यांना नंतरच्या काळात मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच वयात आल्यानंतर पीसीओडी असणाऱ्या मुलींमध्ये याचे प्रमाण जास्त असते. म्हणून वयात येणाऱ्या मुलींची नीट काळजी घेतली पाहिजे. या मुलींना नियमित व्यायाम आणि योग्य आहार याची सवय लहानपणापासूनच लावली तर त्यांचे वजन नियंत्रणात राहायला मदत होते. पाळी सुरू होऊन दोन ते तीन वर्षांत नियमित झाली नाही तर स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊन पाळी नियमित होईल अशी चिकित्सा घ्यावी.
- जेस्टेशनल डायबिटीज असलेल्या बहुतेक स्त्रिया निरोगी बाळाला जन्म देतात. मात्र त्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक केले पाहिजे.
- या स्त्रियांनी वारंवार रक्तातील साखर तपासणे आवश्यक असते.
- रक्तातील साखरेवर गरोदरपणाचा परिणाम होतोच. गरोदर स्त्री काय खाते-पिते, ती किती व्यायाम करते यावर पातळी अवलंबून असते. तिच्या आहारात बदल सुचवले जाऊ शकतात किंवा आणखी क्रियाशील राहण्याचा सल्ला दिला जातो. तिला इन्शुलिन किंवा औषधेही दिली जाऊ शकतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण
- फास्टिंग ब्लड शुगर
- उत्तम 890 एमजी/डीएल
- चांगली 895 एमजी/डीएल
- ठीक 8100 एमजी/डीएल
- पोस्ट प्रॅण्डियल ब्लड शुगर
- उत्तम 8120 एमजी/डीएल
- चांगली 8130 एमजी/डीएल
- ठीक 8100 एमजी/डीएल
- एचबीएवनसी (तीन महिन्यांतील सरासरी पातळी)
- उत्तम 85.8 टक्के
- चांगली 86.0 टक्के
- ठीक 86.4 टक्के
जेस्टेशनल डायबिटीस बहुतेकदा निरोगी आहार व नियमित शारीरिक व्यायामाच्या मदतीने आटोक्यात राखता येते. पण काही स्त्रियांना इन्शुलिन इंजेक्शन व गोळ्या घ्याव्याच लागतात.
- मधुमेही गर्भवतीने दररोज तीन वेळा नियमित जेवण घ्यावे, तर दोन ते तीन वेळा हलका आहार घ्यावा.
- रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा आणखी एक मंत्र म्हणजे व्यायाम. गरोदरपणात सुरक्षित असलेल्या व्यायामाबद्दल डॉक्टरांशी बोला. चालणे, योगासने व अन्य शारीरिक व्यायाम त्यांना विचारूनच करा.
- आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी संपूर्ण शरीराची पंचकर्माद्वारे शुद्धी सांगितली आहे. शरीर शुद्ध झाल्यावर उत्तम बीजनिर्मितीसाठी रसायन द्रव्याचे सेवन सांगितले आहे. त्याचबरोबर लठ्ठपणासारखी व्याधी असल्यास त्यावर औषधोपचार घेऊन नंतरच प्रेगन्नसी प्लॅन करावी.
- प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी आपले वजन योग्य आहे की नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण वजन जास्त असल्यास मधुमेहासारख्या समस्या पुढे गर्भारपणात त्रास करतात. गर्भपात होण्याचे प्रमाणही या गर्भवतींमध्ये जास्त असते.
- कर्बोदकं कमी आणि प्रथिनं जास्त हा नियम पाळला पाहिजे आणि अति खाण्यापासून धोके लक्षात घ्यायला हवे. म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये जो गर्भिणीला आहार सांगितला आहे तो म्हणजे- दूध, तूप, लोणी, फळांचे रस, सूप व लघु आहार.
मधुमेही असलेल्या गर्भवतीच्या बाळाकडेही खूप लक्ष ठेवावे लागते. यासाठी सोनोग्राफी जास्त वेळा केली जाते. त्याचबरोबर ‘डॉपलर स्टडी’ ही तपासणीसुद्धा केली जाते. यामध्ये बाळाला आईकडून होणारा रक्तपुरवठा तपासून बघितला जातो. त्याचे वजन व वाढ पाहिली जाते.
गर्भवतीचे दिवस जसजसे भरत येतात तसतसे शुगर आणि रक्तदाब हळूहळू वाढायला लागतो. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी. मधुमेह नियंत्रणात असेल तर दिवस भरेपर्यंत वाट पाहावी, नाहीतर प्रसूती आधी करण्याचा निर्णय घ्यावा. प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या तब्येतीकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यांना रक्तातील साखर कमी होणे, कावीळ अशासारख्या धोक्यांचा सामना करावा लागतो.
असा हा त्रासदायक आजार आपण टाळू शकतो किंवा आटोक्यात आणू शकतो. प्रसूतीपश्चात या मधुमेहाचा त्रास कमी होतो. बऱ्याच जणींना कोणत्याही औषधोपचारांची गरज उरत नाही, कारण हा मधुमेह प्रसूतीपश्चात आटोक्यात येतो.