>> साखळीतील प्रचारसभेत राहुल गांधींची घोषणा; कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन; केंद्रासह राज्यातील सरकारवर टीका
श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी मिटवण्यााठी कॉंग्रेस पक्ष ‘न्याय’ योजना लागू करणार असून, त्या अंतर्गत गोव्यातील दुर्बल व गरीब कुटुंबांना दर महिना ६ हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. कोणतीही आपत्ती येवो, ही आर्थिक मदत दरमहा थेट त्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल साखळीतील प्रचारसभेत केली. तसेच राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन कॉंग्रेस पक्ष सरकार चालवणार असून, सरकारचा प्रत्येक निर्णय जनताभिमुख असेल, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींनी काल साखळी मतदारसंघात बोडके मैदानावर धर्मेश सगलानी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कॉंग्रेसचे नेते वेणूगोपाल, गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, आमदार दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन, ऍड. रमाकांत खलप, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, धर्मेश सगलानी, प्रवीण ब्लेगन, सुनीता वेरेकर, प्रताप गावस व अन्य नेते उपस्थित होते. तत्पूर्वी, देसाईनगर-साखळी येथील गणेश मंदिरात राहुल गांधी यांनी श्रींचे दर्शन घेतले.
यावेळी राहुल गांधींनी भाजप आणि कॉंग्रेसच्या विचारधारेतील फरक समजावून सांगितला. त्यासाठी त्यांनी जनमत कौलाचे उदाहरण दिले. गोवा स्वतंत्र राहावा की महाराष्ट्रात विलीन करावा, याचा निर्णय तत्कालीन केंद्र सरकारने गोमंतकीय जनतेवर सोडला. त्यानंतर गोमंतकीयांनी गोवा स्वतंत्र राहावा, यासाठी जनमत कौल दिला, तो सरकारने मान्य केला, असे ते म्हणाले. यापुढे गोव्याच्या जनतेला काय अपेक्षित आहे, त्याचा विचार करूनच सरकार निर्णय घेणार आहे, असेही ते म्हणाले.
गोवा जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंद आहे. त्यामुळे हे राज्य अधिक सुंदर करण्यासाठी कॉंग्रेसलाच पूर्ण बहुमत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन की प्रदूषण याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गोव्याला कोळसा हब बनवल्यास पर्यटनावर विपरित परिणाम आहे. कॉंग्रेस गोव्याला कधीही कोळसा हब बनू देणार नाही, याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
केंद्र सरकारच्या एकाधिकारशाहीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, या देशात आता दोन भारत निर्माण झाले आहेत. एक श्रीमंतांचा, तर दुसरा गरिबांचा. ही दरी केंद्र सरकारने निर्माण केली आहे. या सरकारच्या कार्यकाळात श्रीमंतांना कोणताच कायदा लागत नाही आणि गरिबांना काहीच मिळत नाही. त्यामुळे आता भाजपला विसरा आणि कॉंग्रेसला साथ द्या. प्रत्येक गोमंतकीयाला आपलेसे वाटेल असे सरकार आम्ही देऊ. कॉंग्रेसने बंडखोरांना पक्षात न घेता नवे चेहरे दिले आहेत, त्याचे चांगले परिणाम दिसतील, असेही ते म्हणाले.
केंद्र व राज्यातील भाजप सरकार जनतेला विचारात न घेताच अनेक निर्णय लादत आहे, त्याचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी हे त्यातीलच काही अतार्किक निर्णय. राज्यातील भाजप सरकारही पूर्ण अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी दिगंबर कामत, फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली.
येत्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यात कॉंग्रेसचे नव्हे, तर जनतेचे सरकार बनेल. कोणताही निर्णय जनतेशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही. सर्वांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.
- राहुल गांधी,
कॉंग्रेसचे नेते.
लढत केवळ भाजप व कॉंग्रेसमध्येच
राज्याचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. या ठिकाणी केवळ भाजप व कॉंग्रेस या दोनच पक्षांत लढत आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मत द्या आणि अन्य पक्षांचा विचारही करू नका, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
प्रतिज्ञापत्रावर कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या सह्या
दोन दिवसांपूर्वीच ‘आप’च्या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या करत पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती, तोच कित्ता काल कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीच्या उमेदवारांनी गिरवला. दोनापावल येथे राहुल गांधींच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या करत पक्षांतर न करण्याची पुन्हा शपथ घेतली. यापूर्वी देखील कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर व चर्चमध्ये जाऊन देवासमोर शपथ घेतली होती. यावेळी राहुल गांधी यांनी काल आपल्या गोवा दौर्यात सर्व उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी पी. चिदंबरम, दिगंबर कामत, दिनेश गुंडू राव, गिरीश चोडणकर व विजय सरदेसाई उपस्थित होते.
मुरगाव मतदारसंघात घरोघरी प्रचार
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कालच्या गोवा दौर्याची सुरुवात मुरगाव मतदारसंघातील घरोघरी प्रचार मोहिमेने झाली. त्यांनी हेडलँड-सडा येथील जीआरबी कॉलनीत जाऊन तेथील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मुरगाव मतदारसंघातील लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला. यावेळी घरोघरी महिलांनी राहुल गांधींचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
कॉंग्रेसचे भाजपविरुद्ध आरोपपत्र
कॉंग्रेस पक्षाने काल राज्यातील सत्ताधारी भाजपविरुद्ध एक आरोपपत्र सादर केले. भाजप सरकारने गेल्या १० वर्षांच्या काळात भ्रष्टाचार करण्याबरोबरच लोकांचा विश्वासघात करत असंवेदनशीलतेचे दर्शन घडवल्याचा आरोप या आरोपपत्रातून करण्यात आला आहे.
कॉंग्रेस व मगो पक्षाच्या आमदारांना फोडून भाजपने लोकशाहीचा गळा घोटल्याचे या आरोपपत्रात कॉंग्रेसने म्हटले आहे. गोव्याचे रुपांतर कोळसा हबमध्ये करण्याची भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कोविड काळात आरोग्य सुविधा पूर्णपणे ढासळून पडल्याने कित्येक लोकांना प्राणांना मुकावे लागले, हे भाजप सरकारचे सर्वांत मोठे अपयश असल्याचे कॉंग्रेसने आरोपपत्रात नमूद केले आहे. भाजप राजवटीत राज्याची आर्थिक दिवाळखोरी झाली. कायदा व सुव्यवस्था ढासळली. प्रशासनात भ्रष्टाचार कधी नव्हे एवढा प्रचंड वाढला. जनतेला सामाजिक सुरक्षा पुरवण्यात सरकारला अपयश आले, तसेच युवकांना रोजगार आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्क पुरवण्यात सरकार कमी पडले. भाजपच्या काळात बेकायदेशीररित्या अनेक जमीन रुपांतरे झाली, असेही कॉंग्रेसने आरोपपत्रात म्हटले आहे.