राज्य सरकारने गणेशचतुर्थी सणासाठी एसओपी तयार केलेली आहे. त्या एसओपीनुसार जे कोण गणेश मूर्ती आणण्यासाठी (स्वतःसाठी अथवा विक्रीस) राज्याबाहेर जातील त्यांना एक तर स्वतःची कोरोना चाचणी करावी लागेल अथवा १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. जे गोमंतकीय गोव्याबाहेर राहत आहेत व सणानिमित्त राज्यात येणार आहेत, त्यांना येताना कोविडसाठीचे निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्र (आयसीएमआरची परवानगी असलेल्या लॅबचे) आणावे लागेल, अथवा गोव्यात आल्यानंतर चाचणी करून घ्यावी लागणार असून अहवाल येईपर्यंत १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.
उत्तर गोवा जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नसेल. स्थानिक संस्था गणेश विसर्जनासाठी वॉर्डनिहाय एक वेळापत्रक तासाच्या हिशोबाने करील. सामाजिक अंतराच्या तत्वांचे उल्लंघन होणार नाही, याकडे पोलीस व संस्थांना लक्ष द्यावे लागेल.
गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे काम संध्याकाळी ५ ते मध्यरात्रौ या दरम्यान केले जावे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणार्या लोकांपैकी एका कुटुंबातील केवळ दोघांनाच विसर्जनासाठी जाता येईल, अशा सूचना केल्या आहेत.