- – अंजली आमोणकर
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीगणेश हे आगळे दैवत आहे. मूळ, विकास, स्वरूप आणि कार्य या सर्वच बाबतीत गणेश हे वैशिष्ट्यपूर्ण दैवत असल्याचं दिसून येतं. गणपती ही विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे, तसेच सारस्वताचीही देवता आहे. अन् तोच ज्ञानदाता आहे.
महाकवी कालिदासानं म्हटलंय- ‘उत्सव प्रियः खलु मनुष्यः’ म्हणजे माणूस हा उत्सवप्रिय आहे. जगण्यासाठी जीवनव्यवहार नित्य चालूच आहे; पण माणसाला त्याच्या दैनंदिन व्यवहारातून, व्यवसायातून, चिंता-व्यथांतून बाजूला काढून, त्याला एक वेगळी ऊर्जा देऊन, जगण्यातला आनंद व समाधान मिळवून देण्यासाठी लोकजीवनाचं सांस्कृतिक रूप सण-उत्सवाच्या रूपानं उभं राहिलं.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीगणेश हे आगळे दैवत आहे. मूळ, विकास, स्वरूप आणि कार्य या सर्वच बाबतीत गणेश हे वैशिष्ट्यपूर्ण दैवत असल्याचं दिसून येतं. गणपती ही विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे, तसेच सारस्वताचीही देवता आहे. तोच ज्ञानदाता आहे. अथर्ववेदात गणपत्यथर्वशीर्ष नावाचं एक उपनिषद विद्यमान आहे. गणपतीचं समग्र रूप त्यात वर्णन केलं आहे. ऋग्वेदातलं ‘ब्राह्मणस्पती सूक्त’ हेही गणपती सूक्त आहे. ऋग्वेदापासून लोककलाकारांच्या गणापर्यंत सर्वत्र गणरायाचं रूप आणि स्वरूप लोकमानसांत उभं आहे.
हजारो वर्षांपासून गणेश ही आर्येतरांची एक ग्रामदेवता होती. तशा प्रकारच्या इतर देवतांबरोबरच ती एखाद्या झाडाखाली प्रतिष्ठापित असावी. तिचे पूजक तिच्यापुढे बळी देऊन, त्या बळीच्या रक्ताचा त्या देवतेवर अभिषेकही करत असावेत. आज आपल्यासमोर असलेल्या गणेशाचा रंगही लालच आहे. त्याला सिंदुरार्चन केले जाते. तसेच त्याचे रक्तवस्त्र, रक्तचंदनादी उटी, लाल फुले आणि दुर्वांचा पूजेत समावेश- या गोष्टी सरळ-सरळ त्याच्या आर्येतर मुळाकडे निर्देश करतात.
ही अनार्य देवता पुढे आर्य संस्कृतीत स्वीकारली गेली. ऋग्वेदात गणपतीचा उल्लेख नाही; परंतु तेथील ‘ब्रह्मणस्पती’ या देवतेशी या देवतेचे साम्य दिसून आले. गणेश हा आर्यसंस्कृतीत, लोकमानसांत स्थिर झाल्यानंतर तो ब्रह्मणस्पतीचा पूर्वावतार मानला गेला. गणपती ज्ञानदाता आहे, तसाच ब्रह्मणस्पतीही ज्ञानदाता आहे. गणपतीप्रमाणेच तो सुवर्णपरशू धारण करतो. ऋग्वेदातील ‘गणांना त्वा गणपतिं हवामहे…’ अशी सुरुवात असलेली ब्रह्मणस्पतीची ऋचा गणपतीच्या स्तवनासाठी वापरली जाऊ लागली. या पूजामंत्रातून जे मोठेपण विशद केले आहे, ते वर्णन गणरायालाही लागू होते. ‘समुदायाचा प्रभू म्हणून तू गणपती. ज्ञानी जगात तू अत्यंत ज्ञानी, कीर्तिवंतांमध्ये तू वरिष्ठ. तू राजाधिराज. तुला आम्ही आदराने बोलावतो. तू आपल्या सर्व शक्तीसह ये आणि आसनावर विराजमान हो…’ असं आवाहन ऋग्वेदात आहे. श्रीगणेशाला वैदिक ऋचांकरवी जे रूप मिळालं आहे, त्याची उत्पत्ती अतिप्राचीन काळी कुलप्रतीक उपासनेतून झाली असे मानण्यात येते. त्याचे गणपती हे नाव ‘गणप्रमुख’ या अर्थी पुढे आले. यातील गण म्हणजे टोळी किंवा समूह आणि पती म्हणजे प्रमुख- पालनहार- राजा- धनी. प्राचीन काळी ‘हत्ती’ हे कुलप्रतीक/कुलचिन्ह असलेला एक गण (समूह) खूपच मातब्बर झाला. त्याने कित्येक गणांना (समूहांना) आपल्या आधिपत्याखाली घेतलं. या अधीन झालेल्या गणांनी हत्तीगणाचे वर्चस्व स्वीकारताना त्याचे कुलप्रतीकही स्वीकारले. किंबहुना त्यांना ते स्वीकारावे लागले. हेच कुलप्रतीक पुढे संस्कृतीच्या आणि कलेच्या विकासाबरोबर आजच्या गणपतीचे रूप धारण करू पावले. त्याचप्रमाणे असेही संदर्भ सापडतात की, चित्रांमध्ये गणपतीच्या पायाशी असलेला मूषक म्हणजे हत्तीगणाने पराजित करून दास्यत्व स्वीकारायला लावलेल्या- ‘मूषक’ कुलप्रतीक असलेल्या- समूहाचे (गणाचे) प्रतीकरूप. आजच्या पूज्य गणपतीचे संपूर्ण स्वरूप जरी अथर्वशीर्षात दिलेले असले तरी वेदवाङ्मयात अथर्ववेद हा अर्वाचित आहे. सर्वात प्राचीन तो ऋग्वेद. ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद या तीन वेदांना मान्यता मिळाल्यानंतर अथर्ववेदाला खूप उशिरा मान्यता मिळाली. त्यामुळे गणेशाचा शोध ऋग्वेदातच घेणे भाग पडले. ब्रह्मणस्पतीसूत्रदेखील सलग व स्वतंत्र असे सूक्त नाही. ऋग्वेदातील पहिल्या- दुसर्या- सातव्या आणि दहाव्या मंडळातील काही ऋचा एकत्र करून हे सूक्त केलेले आहे. अर्थात, या ऋचा ऋग्वेदातल्या असल्या तरी त्या एकत्र करून त्यांचा ब्रह्मणस्पती सूक्त म्हणून विनियोग करण्याचा उपक्रम हा मागाहून झालेला असला पाहिजे हे उघड आहे. अथर्ववेद बराचसा व्यावहारिकही आहे. स्थलदृष्ट्या तो ब्रह्मदेशाकडे झुकतो. भृगू, अंगिरा, बृहस्पती हे ब्रह्मदेशीय होत. या बर्मन लोकांच्या अनुयायांत भूतसंघ असत, त्यांना गण म्हणत. त्यांचा पती तो गणपती. बृहस्पती व गणपती हे देवेतर समुदायांपैकी भिन्न-भिन्न व्यक्तीविशेष होते. त्यांचा पक्ष एक होता. पण ती व्यक्ती एकच नव्हती. ब्रह्मदेशात ब्राह्मण ही आर्येतर जमात होती. देवांबरोबर या ब्राह्मणांचा प्राचीन वाङ्मयात निर्देश आहे.
ब्रह्मणस्पतीच्या निरनिराळ्या उपपतींचा साकल्याने विचार केला तर ब्रह्मणस्पती व गणपती यांचा संबंध मान्य करावा लागतो. इतिहासाच्या ओघात, अनेक जमातींच्या देवतांचे एकीकरण होत-होत अथर्वशीर्षोक्त गणपती देवता सिद्ध झाली. वेदकालीन ब्रह्मणस्पतीला गणपती म्हणत असत. त्यानंतर वैदिकांनी त्या आधारे गणपतीला ब्रह्मणस्पती म्हटले. तामिळनाडूमध्ये आजही ब्रह्मणस्पती असेच नाव प्रचलित आहे, इतकी ही दृढ परंपरा आहे.
कुलप्रतीक म्हणून उदय झालेला असो किंवा देव म्हणून- आज ‘गणपती’ या शक्तीने समाज पुरा भारून टाकलेला आहे. सृजन आणि रक्षण ही त्याची प्रमुख कार्ये आहेत. हिंदू समाजातले कोणतेही धार्मिक कार्य त्याच्या आवाहनाशिवाय पुरे होत नाही. नंतरच्या काळात या शक्तीने कलेची, साहित्याची आणि पराक्रमाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केली. ‘मंगलानाम- मंगलम्’- म्हणजेच मंगलावंदन करण्याची प्रथाच सुरू झाली. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी त्याला ‘आदिबीज’ म्हणून स्वीकारत ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात त्याचं रूपक मांडून तत्त्वरूप, नादरूप आणि ब्रह्मरूप अशा गणपतीला नमन केले ‘देवा तूचि गणेशु’ म्हणत. समर्थांनी त्याला ‘निर्गुण-मुळारंभ’ म्हटले.
उपनिषदातल्या ओंकार स्वरूपापासून लोककलांमधील गौरीनंदनापर्यंत व पुराणातल्या शिवसुतापासून तत्त्वेवेत्त्यांच्या ब्रह्मरूपापर्यंत लोकाभिमुख झालेलं गणपतीचं स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभं राहातं. रसिक आतुरतेनं वाट पाहतात. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि लोककला प्रकारात शाहिरी, तमाशा, लोकनाट्य, दशावतार, गोंधळ, जागरण, लळित या सर्व कलाप्रकारांच्या प्रारंभी गणरायाला नमन करणारा ‘गण’ सादर केला जातो. गणपतीचं वेदांती रूप जेव्हा लोकवाणीतून उभं राहतं तेव्हा लोककलेतही रंग भरतो. लक्षावधी लोकांचं मनोरंजन करणारी ‘तमाशा’ ही प्रभावी लोककला. इसवी सनाच्या पहिल्या शतकातलं रतिनाट्य, ज्ञानदेवांच्या काळी रूढ असणारा खेळ- तमाशा, उत्तर पेशवाईतला अस्सल तमाशा अशी अनेक वळणे घेत आजच्या लोकनाट्यापर्यंत येऊन पोचला. पण त्यातलं गणाचं स्वरूप आहे तसंच राहिलं.
‘आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना…’ असं पठ्ठेबापूरावांनी म्हणत, ‘गणापायी रंगमंचावरच्या कलेत रंग भरतो’ हे कबूलच केलं. श्रीगणेशाला वैदिक वाङ्मयात जेवढं स्थान मिळालं त्याहूनही अधिक मोठं स्थान लोकवाङ्मयात आणि लोकवाणीत मिळालं हे निश्चित!
उत्सव हाच लोकमताचा संवादक आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेचा जनक असू शकतो हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून खरा लोकसंवाद साधला. गणेशोत्सव हा केवळ ‘उत्सव’ म्हणून न ठेवता, त्याला लोकचळवळीचं रूप दिलं. लोकसंवाद, संघटन, प्रबोधन, जागृती आणि अस्मिता या सार्या भूमिकांतून संपन्न होणारा सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल करतो आहे. अनेक गणेशोत्सव मंडळं अथक प्रयत्न करून कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहेत. आपल्या शिक्षणक्षेत्रात कुठेही ‘कार्यकर्ता’ कसा घडवावा याचं शिक्षण देणारा अभ्यासक्रम नाही. पण गणेशोत्सव हा कार्यकर्ता निर्माण करणारं एक लोकविद्यापीठ आहे. मोठं विधायक कार्य त्यातून उभं राहू शकतं. पण…
पण या उत्सवानं एका शतकानंतर आपलं रूप बदललं आहे. गावागावांत, शहराशहरांत त्याच्या आयोजकांची दहशत असते. तिथं होणारा गोंगाट असह्य होतो. स्पीकर्सचा आवाज आजारी, वृद्ध, बालकं, विद्यार्थी यांना दृष्टीआड करत घरं हादरवून टाकत असतो. यातून नुसतं ध्वनिप्रदूषणच नव्हे तर हवा, पाणी व समाजप्रदूषणही होतंय. अशा स्वरूपाचे गणेशोत्सव लोकमान्यांना अभिप्रेत होते का? रोषणाईकरिता विजेचा केलेला भरमसाठ गैरवापर, प्रचंड मूर्ती, उदंड खर्च व अखंड गर्दी- महामारी- प्रदूषण- महागाई यांना रोखेल काय? हा संकटमोचन देव मात्र अविरतपणे भक्तांना मदतच करत आलेला आहे व अजूनही करतो आहे. ‘अजूनही’ या शब्दाचा अर्थ, या तांत्रिक युगातदेखील मदतीला धावलेला आहे. कसा, हे कळल्यावर समस्त भक्तगण नक्कीच तोंडात बोटे घालतील.
गणेश प्रतिमेची- भाषा व लिपी पातळीवर- झालेली मदत ही त्याच्या ‘संकटमोचन स्वरुपाचे’ एक उदाहरण आहे. लिपीकार एल. एस. वाकणकर यांनी डॉ. मुदूर यांच्या सहकार्याने टी.आय.एफ.आर.मध्ये १९७८ साली संगणकावर देवनागरी लिपीचं यशस्वीपणे आरोहण केलं. त्याला प्रेरणादायक ठरली ती गणेशविद्या. हा चमत्कार नव्हे काय? गणेशविद्या म्हणजे ध्वन्यात्मक लेखनाची वैदिक परंपरा. ती वाकणकरांना गणपती अथर्वशीर्षात सूत्ररूपाने सापडली. ही लेखनव्यवस्था एवढी अचूक होती की तिचाच वापर करून संगणकावर सर्व भारती भाषांमधील लिप्यांचे आरोहण करण्यात आले. या सर्वावर गणेशप्रतिमेचं शास्त्रीय रूपही दिसून येतं.
खरं तर ‘माझ्या मनाचा, मी-तूपणाचा, जाळुन केला चुना-चुना… नाहीतर रंग पुन्हा सुना-सुना…’ हे सामर्थ्य असणार्या गणपतीबाप्पाचा हा शोध कधी पूर्ण होणार नाही… आपण फक्त सजग मनाने, उघड्या डोळ्याने, नतमस्तकाने शक्य तितके समाजाभिमुख राहून भक्ती करायची. श्रीगणेशाने अनेक धर्म व्यापले, अनेक देश पादाक्रांत केले. त्याची ही क्रीडा अनेक सहस्रं वर्षे चालू असेल. त्यामुळे हा गणेश अनेक भक्तांच्या अंतःकरणात अनेक प्रकारे अवतीर्ण झाला. ज्यांच्या चित्रात तो जसा साकार झाला, तसे त्याचे वर्णन त्यांनी केले. चित्रकारांनी त्याची अनेक चित्रे काढली आणि रंगविली. मूर्तीकारांनी त्याला अनेक प्रकारच्या मूर्तीत साकार केले. गणेशमूर्तीची विविधता महागणपतीच्या वैभवाला साजेशीच आहे.
गणेशाला प्रायः एकच गजवदन असते; पण पाच मुखांच्या गणेशमूर्तीही आहेत. काशीला धुंडीराज गणपतीच्या नजीक पंचमुखी गणेशाचे छोटे मंदिर आहे. जी गोष्ट मुखांची तीच गोष्ट हातांची. गणेशाला चार हात असतात. पण दोन हातांच्या, आठ हातांच्या, सोळा हातांच्या मूर्तीही सापडतात. तीन शिरांच्या गणेशमूर्ती जपानमध्ये, तर चार मुखांच्या कंबोडियात सापडतात. तसाच रंग. गणपतीचा रक्तवर्ण आणि सिंदूरवर्ण प्रसिद्ध आहे. हरिद्रा गणपती पिवळा असतो. पिंगट वर्णही सांगितलेला आहे. पांढर्या व काळ्या रंगाचे गणेशही सांगितले आहेत. गणपतीला कधी दोन डोळे दाखवतात तर बहुधा त्याला तीनच डोळे असतात. त्याच्या गळ्यात कधी यज्ञोपवीतासारखा सर्प घातलेला असतो. कित्येकदा हा सर्प कमरेभोवती गुंडाळलेला असतो. हातात लाडू, मोदक, लिंबू, डाळिंब यांपैकी काहीही असते. त्याची शास्त्रास्त्रेही विविध आहेत. त्रिशूल, पाश, परशू, अंकुश, खेटके, खट्वांग, मुद्गल अशी त्याची आयुधे आहेत.
बौद्ध धर्माबरोबर गणेश भारताबाहेर अनेक देशांत गेला. तेथे गणेश देवतेच्या अनेक मूर्ती सापडतात. तशाच काही विचित्र मूर्तीही आहेत. तिबेट, तुर्कस्तानमध्ये गणेशमूर्ती मठाच्या द्वारावर रक्षक म्हणून बसवलेली आहे. चीन व जपानमध्ये गणेशाला ‘कांगी तेन’ म्हणतात. गजमुख असलेल्या स्त्री-पुरुष प्रतिमा एकमेकांना दृढालिंगन देत आहेत असे या मूर्तीचे स्वरूप आहे. ही मूर्ती म्हणजे तंत्रशास्त्रात गणेश आणि त्याची शक्ती यांची जी ध्याने वर्णन केली आहेत, त्यांचेच एक रूप आहे.
मलय द्वीपात अनेक गणेशमूर्ती आहेत. तेथे पाषाणांच्या तसेच धातूंच्याही मूर्ती सापडतात. सध्याच्या इंडोनेशियामधील जावा बेटातही अनेक गणेशमूर्ती आहेत. एक मूर्ती तर इतकी सुंदर आहे की तशी मूर्ती भारतातही नाही म्हणतात. जावामध्ये अनेक गणेशमूर्ती नदीच्या घाटावर आणि अन्य भयाण जागी आहेत. इंडोनेशियाचे दुसरे बेट बाली. इथले लोक आजही हिंदुधर्माचे अनुयायी आहेत. बालीमध्ये राजाराणीचा मृत्यू झाला की त्यांच्या मूर्ती बनवून त्या गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूस स्थापन करतात. बोर्नियोमध्येही गणेशमूर्ती अगणित आहेत.
कंबोडियाचे पूर्वीचे नाव कंबुज असे होते. या देशात मूर्ती विपूल आहेत. या देशाची प्राचीन राजधानी अंकुरवट येथे तर अतोनात मूर्ती आहेत. सयाममधील लोक मंगोल वंशाचे आहेत. इथे सुंदर गणेशमूर्ती आहेत. सयामच्या पूर्वीच्या राजधानीचे नाव अयूविया म्हणजे अयोध्या असे होते. त्यामुळे या मूर्तीच्या शिल्पपद्धतीला ‘अयूबियन’ असे म्हणतात. ब्रह्मदेश हा भारताचा निकटचा शेजारी, त्यामुळे तिथेही गणेशमूर्ती विपूल प्रमाणात सापडतात.
उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन. पण त्याची इतरही वाहने आहेत. हेरंब गणपतीचे वाहन सिंह आहे, मयुरेश्वराचे मयूर आहे. गणेश कधी सममुद्रा धारण करतो, कधी पद्मासन स्थित असतो, तर कधी तांडवनृत्यही करीत असतो. उंदरावर उभा राहून नृत्य करीत असलेल्या गणपतीची मूर्ती नेपाळमध्ये सापडली आहे. त्या उंदराच्या तोंडात चिंतामणी आहे. तंत्रशास्त्रातील शाक्त पंथात पाच शक्ती गणपतीचे पूजन करतात. उच्छिष्ट गणपती चतुर्भुज आणि रक्तवर्ण असतो. महागणपतीची मूर्ती दशभुज आणि रक्तवर्णी असते. उर्ध्व गणपती सहा हातांचा व पिवळ्या रंगाचा असतो. पिंगल गणपती सहा हातांचा व पिंगट रंगाचा असतो. लक्ष्मी-गणपती शुभ्र वर्णाचा असून त्याला चार किंवा आठ हात असतात. मलाया आणि जावामध्ये नरमुंडमाला धारण केलेल्या गणेशमूर्ती आहेत. त्यांच्या सिंहासनावर नरमुंडे खोदलेली आहेत. बाली बेटात जमबरन येथील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या मूर्तीच्या सिंहासनाच्या चारी बाजूंनी दीपज्योती निघालेल्या दाखवलेल्या आहेत. या गणेशमूर्तीच्या हातात मशाल आहे.
जगातील सर्वात विलक्षण मूर्ती मात्र भारतातच आहे. ही मूर्ती म्हणजे हिमालयातील ‘मुंडकटा गणेश.’ या मूर्तीला शिर नाही. पूजा करतेवेळी तिच्या छातीला गंध लावतात. पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून बनविलेल्या पुत्राचा शंकराने शिरच्छेद केला, या कथेतील ही मूर्ती आहे. गणेशाच्या मातीच्या, शिळेच्या व धातूच्या मूर्तींबरोबरच गणेशाचे आणखीन एका स्वरूपात पूजन होते. दक्षिण भारतात गणेशाची ‘पिल्ल्यार’ म्हणून पूजा करतात. पिल्ल्यार हे एक यज्ञकुंड असून त्याचे त्रिकाल पूजन केले जाते. श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी शिव, विष्णू, सूर्य, देवी आणि गणेश अशा पाचही देवतांचे एकीकरण करण्यासाठी पंचायतन पूजा रूढ केली. गणेश हा मध्यभागी स्थापून विष्णू-शिव-सूर्य आणि शक्ती या क्रमाने चार कोनात चार मूर्ती स्थापल्या म्हणजे ते गणेश पंचायतन. गणेशाची धातूची मूर्ती ठेवतात किंवा नर्मदा-गणपती ठेवतात. नर्मदा-गणपती हा तांबड्या रंगाचा गोटा असतो.
शिवशंकराप्रमाणे गणेशाच्याही लिंगमूर्तीचे पूजन करतात. स्वयंभू आणि गाणपत्य लिंग असे दोन प्रकार आहेत. स्वयंभूलिंग आपोआप निर्माण झालेले असते आणि महासिद्धीदायक म्हणून त्याचे माहात्म्यही विशेष असते. या स्वयंभू लिंगाला शेंदूर फासलेला असतो. या स्वयंभू मूर्ती साहजिकच डोंगर पर्वतावर, माळरानात, नदीकिनारी उघड्यावर असतात. क्वचित कोणी मागाहून त्या मूर्तीवर मंदिरही बांधलेले असते. अशी प्रसिद्ध स्वयंभू लिंगे काश्मीरमध्ये विशेष आहेत आणि तेथे प्राचीन काळापासून यात्रा भरतात.
काश्मीरमधील लिदर नदीच्या काठी गणेशबल नावाचे खेडे आहे. ते मोठे यात्रेचे ठिकाण आहे. तेथे प्रचंड स्वयंभू लिंग असून ते शेंदूर चर्चित असते. चौदाव्या शतकात काश्मीरचा बादशहा शिकंदर बुतशिक याने अनेक हिंदू मंदिरांचा विद्ध्वंस केला. गणेशबल येथील स्वयंभू लिंग भ्रष्ट करावे असे त्याला वाटले. आपली फौज घेऊन तो तेथे आला. पण या स्वयंभू लिंगातून मधमाशांची प्रचंड सेना बाहेर पडली आणि तिने सिकंदर बुतशिकच्या फौजेला मारून टाकले. श्रीनगरजवळ हरिपर्वत येथे असेच एक दुसरे स्वयंभू लिंग आहे. त्याला भीमस्वामी असे म्हणतात. या स्वयंभू लिंगाचे स्वरूप गजवदनाशी मिळते-जुळते आहे. काश्मीरचा राजा प्रवरसेन याने प्रवरपूर नावाचे शहर वसविले. हा राजा मोठा भाविक होता. त्यामुळे त्याचे हे प्रवरपूर पाहण्यासाठी भीमस्वामीने आपले मुख शहराकडे वळविले. काश्मीरमध्येच किशनगंगेच्या काठी आणखी एक प्रसिद्ध स्वयंभू लिंग आहे. हे लिंग पन्नासफूट उंचीचे असून ते थेट गजशुंडेसारखे दिसते. या डोंगराला ‘गणेशघाटी’ म्हणतात.
दुसर्या प्रकारच्या लिंगांना ‘गाणपत्य लिंगे’ म्हणतात. ही लिंगे बीजपुरांच्या म्हणजेच डाळिंबांच्या आकाराची असतात. तेथे स्वयंभू लिंग गर्भगृहात असते. येथे गणेशाची अनेक पवित्र स्थाने आहेत. स्थानमहात्म्य म्हणून या गणेशाचे दर्शन अधिक पुण्यप्रद आणि सिद्धीदायक मानले जाते. येथील लोक ‘कलौ चंडी विनायकी’ असे म्हणतात. म्हणजे कलियुगात चंडी व गणेश या देवतांचे विशेष महात्म्य आहे. काशीक्षेत्रात दुंढी विनायक आहे. काशी विश्वेश्वरासमोर आठ भोवर्यात छप्पन विनायक असून ते केवळ स्मरणानेच सर्व सिद्धी देतात. गणेश पुराणात या छप्पन विनायकांची नावे दिली आहेत.
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत षड्भुज गणेशाचे स्तवन केले आहे. हे ध्यान केवळ काल्पनिक नसून ते त्रेता युगातील गणेश अवताराचे स्वरूप आहे असे गणे पुराणावरून दिसून येते. त्याचा शुभ्रवर्ण होता. कांगडा जिल्ह्यात वैजनाथ गावी वैद्यनाथाचे एक मंदिर आहे. १९०५ सालच्या धरणीकंपात इथल्या वस्तू नामशेष झाल्या, पण मंदिर बचावले. या मंदिरात सहा भुजांचा गणपती आहे. हे मंदिर प्रत्यक्ष पाहून त्याचे वर्णन भारताचार्य वैद्यांनी- ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या त्रैमासिकात केले आहे. त्यानंतर षड्भुज मूर्तीचा शोध इतरत्रही लागला.
तामिळनाडूमध्ये गणपतीला ‘तुबकाई अनवर’ म्हणजे बुद्धिमान गणेश म्हणतात. त्रिचनोपल्ली येथे ‘अच्छे पिल्लेयार’ नावाचे कोरीव लेण्यात गणेश मंदिर आहे. गणेश पुराणातील कथांवरून अष्टविनायकाची स्थापना महाराष्ट्रात झाली.
अशा या गणरायाची दरवर्षी मनोभावे वाट पाहाणे, त्याच्या पूजा-अर्चेत गुंंग होणे व पाणावल्या डोळ्यांनी त्याला ‘पुढच्या वर्षी लवकर ये’चे जिव्हाळ्याचे बोलावणे करणे, यातच आपलं त्याच्यावरचं प्रेम दिसून येतं नाही का? मग बोला- ‘गणपती बाप्पाऽऽ मोरया…’