सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीसांचीही सज्जता
गोमंतकीयांचा अत्यंत महत्वाचा सण असलेला गणेश चतुर्थी उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असून या उत्सवाच्या तयारीचे काम सध्या जोरात सुरू आहे. शहरी भागातील अनेक कुटुंबे गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावाकडे जात असल्याने त्याचीही लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरांमधील बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत.
उत्सवाच्या खरेदीसाठी काल पासूनच पणजी राजधानीसह अन्य भागात चतुर्थीसाठी लागणार्या वस्तुंचे बाजार भरले असून खरेदीसाठी लोकांची कालपासूनच गर्दी सुरू आहे. परवापासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा खरेदीवर परिणाम झाला. दि. २९ रोजी गणेश चतुर्थी असली तरी या उत्सवाची खरी सुरुवात काही कुटुंबांमध्ये गुरुवार दि. २८ रोजी गौरीपूजनाने होते. त्यामुळे शहरी भागातील काही कुटुंबे आज रात्रीच गावांकडे निघतील.
चतुर्थीच्या काळात शहरीभागात सामसूम असते, त्यामुळे पोलिसांनी मौल्यवान वस्तू शहरातील निवासस्थानांमध्ये न ठेवण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्यावेळी गस्ती घालण्याचीही पोलिसांनी तयारी ठेवली आहे. पोलीस अधिक्षक प्रियंका कश्यप यांनी यासंदर्भात काल पोलीस मुख्यालयात अधिकार्यांना मार्गदर्शन केले. गणेश चतुर्थीच्या काळात शहरातील घरे बंद असल्याच्या संधीचा गैरफायदा घेऊन चोर्यांचे प्रकार वाढतात. गेल्या वर्षी पोलिसांनी अधिक काळजी घेतली होती. त्यामुळे चोर्यांच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना शक्य झाले होते.
गणेश चतुर्थीसाठी लागणारे धार्मिक साहित्य, फटाके, मिठाई तसेच भाज्या, फळफळावळ यांचे दर गगनाला भिडले असले तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून अनेकजण वाहनांचीही खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या संख्येने लोकांनी गणेशमूर्तींची खरेदीही करून ठेवल्याचे आढळून आले.