गजमुख-दर्शन

0
24

योगसाधना- ५६७, अंतरंगयोग- १५२

  • डॉ. सीताकांत घाणेकर

भगवंताने रचलेल्या या सृष्टीत- प्रत्येक राष्ट्रात अनेक नावाजलेले तत्त्ववेत्ते आहेत. तसेच या विश्‍वात अनेक गूढ गोष्टीदेखील आहेत. तत्त्ववेत्ते वेळोवेळी या गूढांचा शोध लावतात व मानवतेच्या कल्याणासाठी वापरतात. आपले भारतीय तत्त्ववेत्तेही याला अपवाद नाहीत. सूक्ष्म निरीक्षण केले तर अनेक क्षेत्रांत या भारतीयांनी पुष्कळ अभ्यास करून मनन-चिंतन-मंथन केले आहे असे दिसून येते. या तत्त्ववेत्त्यांच्या यादीमध्ये मोठमोठे ऋषीमहर्षी, संतमहात्मे, महापुरुष आहेत. हा त्यांचा अभ्यास अनादिकालापासून चालू आहे.

तसे पाहिले तर तत्त्वज्ञान हा शुष्क व कठीण विषय आहे- अनेकदा सामान्यांच्या बुद्धीपलीकडचा! म्हणून त्यांना सहज आकलन व्हावे याकरिता त्यांनी महाभारत, रामायण, भागवत यांसारखी महाकाव्ये व पुराणे लिहिली. पुराणांची भाषा भावगर्भित आहे. तशीच त्यात विविध रुपके असतात. छान छान छोट्यामोठ्या रूचकर मजेशीर गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक वयाच्या- बाल ते वृद्ध- व्यक्तींना त्याची मजा सहज चाखता येते. शुष्कता निघून जाते व गोडवा अनुभवाला येतो.

आपण ‘अंतरंगयोगा’मध्ये सध्या चातुर्मासाचा अभ्यास करत आहोत. यातील काही प्रमुख सणांचा विचार चालू आहे. आता आपण श्रीगणेश चतुर्थीबद्दल बघतो आहोत.

गणपतीचे मस्तक हत्तीचे व ते तसे का झाले याबद्दल एक गोष्ट शेकडो वर्षांपासून सांगितली जाते. गोष्टी-कथा लहान मुलांना बोध देण्यासाठी चांगल्या उपयोगी असतात. पण बुद्धिशाली व्यक्तीने स्वतःची बुद्धी वापरून, त्यावर चिंतन करून, त्यातील गाभितार्थ शोधून काढायचा असतो. कारण त्यानंतर त्यातील बहुमूल्य मुद्दे स्वतःच्या आचरणात, जीवनात आणायचे असतात. त्याचप्रमाणे इतर लोक जे एवढा विचार करत नाहीत त्यांनादेखील समजावून सांगायचे असते. असे केल्याने मानवाचा व समाजाचा जीवनविकास होईल. ज्या तत्त्ववेत्त्यांनी पुष्कळ कष्ट घेऊन ही अत्युच्च संस्कृती उभारली, सांभाळली त्यांच्या कष्टांना फळ मिळेल. समाज विकासाच्या दिशेने जाताना पाहून, आपले कष्ट सार्थकी लागल्याचे पाहून या श्रेष्ठांना आनंद मिळेल. सृष्टिकर्त्याला समाधान लाभेल. विश्‍वाला आशीर्वाद व समृद्धी प्राप्त होईल.

कर्मकांडांतच गुंतून राहून जर सण साजरे केले तर प्रत्येकाला त्यावेळी मजा येईल. पण चिरकाल परिणाम दिसणार नाहीत. आजच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर लक्षात येते की अगदी नगण्य लोक तसा अभ्यास करतात.

गणपतीच्या विविध पैलूंबद्दल विविध व्यक्ती समजावतात.
१) प्रथम नाव- गणपती= गण + पती- कुठल्याही समूहाचा पती म्हणजे नेता. कुठलाही नेता असला तर तो तत्त्ववेत्ता असायला हवा. तसेच त्याला विकासासाठी आवश्यक असलेले गुण असायला हवेत. विकास- स्वतःचा, त्याच्या अनुयायांचा, समाजाचा व विश्‍वाचा.
२) मस्तक हत्तीचे ः गणपती ही तत्त्वज्ञानाची देवता आहे, म्हणून त्याचे मस्तक हत्तीचेच योग्य वाटते. त्याची विविध कारणे आहेत.

  • सर्व प्राण्यांमध्ये हत्ती सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे.
  • हत्तीच्या जीवनात तेजस्वितेचे दर्शन होते.
    असे म्हणतात की हत्ती कुत्र्याप्रमाणे शेपटी हालवीत लाचार बनून येत नाही. त्याला लाडाने खाऊ घातले पाहिजे. खाऊ घालताना जर माहुत जरा रागाने बोलला तरी तो खात नाही.
  • हत्ती स्वतः खाण्यापूर्वी दोन-तीन घास फुंकर मारून इकडे-तिकडे उडवून लावतो. कारण त्यामुळे त्याला काही नुकसान होत नाही, उलट अनेक जीवजंतू, किडे-मुंग्या यांना भरपूर खायला मिळते. ही गोष्ट त्याची उदारता दाखवते.
    ३) कान ः सुपासारखे मोठे असतात. सूप फोलकटे बाहेर फेकून देऊन स्वच्छ धान्यच आत ठेवते. इथे अशी अपेक्षा आहे की बोलणे सर्वांचे जरूर ऐकावे, पण त्यातील सार ग्रहण करून इतर तत्त्वहीन, निरुपयोगी गोष्टी फेकून द्याव्यात.
    तसेच मोठे कान श्रवणशक्तीचे प्रतीक आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ‘बहुश्रुत’ व्यक्तीला जास्त मूल्य असते.
    ४) डोळे ः मोठ्या शरीराच्या मानाने हत्तीचे डोळे बारीक वाटतात. पण ते सूक्ष्मदृष्टीचे प्रतीक आहे. जाणकार सांगतात की हत्ती बारीक सुईदेखील जमिनीवरून सहज उचलू शकतो. दर सुज्ञ व्यक्तीने स्वतःची नजर सूक्ष्म ठेवून कळत-नकळत विकार-वासना, विविध दोष, अहंकार यांना मनात व बुद्धीत घुसण्यापासून अडवायला हवे.
    बालपणात आम्हाला एक गोष्ट सांगितली जात असे. जुन्या काळात जर कोणी बेवारस राजा मेला तर हत्तिणीच्या सोंडेत माळ देऊन तिला गावात सगळीकडे फिरवीत असत. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याला राजा बनविले जात असे. नेत्याला भविष्याकडे पाहण्याची दीर्घदृष्टी असणे अत्यंत आवश्यक असते.
    ५) सोंड ः सोंड म्हणजे हत्तीचे नाक. सोंड एवढी लांब असते की दूरपर्यंत काय चालले आहे ते हुंगायला ते समर्थ असते. तसेच नेत्याने आपल्या राज्यात व शेजारच्या राज्यात काय शिजते आहे याचा शोध घ्यायला हवा. शत्रूंपासून राज्याचे संरक्षण करणे जरुरी आहे. हे शत्रू नातेवाईक, राजवाड्यातील अधिकारी, समाजात अथवा शत्रुराष्ट्रांत असू शकतात.

यासंदर्भात आम्हाला वयस्क सांगत असत. राजा शिकारीला जंगलात जाताना हत्तीवर स्वार होऊन जात असे. त्याचे एक कारण म्हणजे उंचीवरून दूरची शिकार दिसत असे. पण त्याशिवाय हत्तीला सिंहाचा कळप पुढे असल्याची जाणीव होत असे. त्यामुळे तो पुढे न जाता मागे फिरत असे. असे सांगतात की सिंह हत्तीची शिकार कळपाने करतात. कारण एकट्या सिंहाला हत्ती लाथ मारून अथवा सोंडेत पकडून दूर फेकू शकतो. चारी बाजूंनी सिंह आले तर स्वरक्षण करण्यास तो असमर्थ ठरतो.

इथे आणखी एक आश्‍चर्यजनक गोष्ट म्हणजे हत्तीचे शरीर एवढे मोठे-अवाढव्य आणि तोंड एवढीशी. याचा विविध अर्थ घेतला जातो. तोंड लहान असावे म्हणजे आपण बोलणे कमी करावे. अगदी आवश्यक तेच बोलावे. उगाच बडबड करू नये. तसेच तोंड लहान म्हणजे कमी खावे. इथेदेखील गरज आहे ते अवश्य खावे. पोट फुटेपर्यंत खाऊ नये.

आजच्या शिक्षणपद्धतीत दृक्-श्राव्य पद्धत वापरली जाते. ही पद्धत भारतात अनेक वर्षांपासून आहे. हत्तीच्या रचनेकडे बघून बारीक विचार केला तर एका तत्त्ववेत्त्याचे, नेत्याचे विचार व वागणूक कशी असावी, त्याचे गुण कसे असावेत, तो गणपती, गुणपतीदेखील असावा. हे सर्व मुद्दे तरुण मूलदेखील पटापट सहज सांगेल.
योगसाधक अनेक वर्षे भारतीय प्रतीकांचा, सणांचा, उत्सवांचा नियमित अभ्यास करतात. आपणही हे सर्व गुण आत्मसात करूया. कारण आपणातील प्रत्येकजण एक नेताच आहे- कुटुंबाचा, समाजाचा, संस्थेचा, राष्ट्राचा, विश्‍वाचा. प्रत्येक नेत्यात हे गुण आले तर विश्‍वाचे नंदनवन होईल.