पुन्हा नव्याने तपास

0
29

सोनाली फोगट मृत्यूप्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास गोवा सरकार खरे तर फारसे उत्सुक दिसत नव्हते. परंतु हरियाणात या मृत्यूचे उमटलेले तीव्र पडसाद, सोनालीच्या नातेवाईकांनी गोवा पोलिसांवर सतत व्यक्त केलेला अविश्‍वास व हे प्रकरण गोवा पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपविण्याची केलेली आग्रही मागणी, त्या मागणीस हिस्सारमधील प्रभावशाली खाप महापंचायतीने दिलेला पाठिंबा आणि त्या दबावामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केलेली मागणी ह्या सगळ्यामुळे गोवा सरकारला सीबीआय तपासाची शिफारस करणे भाग पडले आणि केंद्रीय गृहमंत्रालयानेही ही शिफारस लगोलग स्वीकारून हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले आहे.
हे प्रकरण गोवा पोलिसांकडून काढून घेतले जावे अशी मागणी सोनालीच्या नातलगांनी सतत लावून धरली होती, त्याला मुळात तिच्या मृत्यूच्या दिवसापासूनचा घटनाक्रम कारणीभूत आहे. कोणतीही खातरजमा न करता तिचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे सांगून राज्य सरकार मोकळे झाले होते. केवळ तिचा भाऊ तातडीने गोव्यात दाखल झाला आणि त्याने मागणी लावून धरल्यानेच हत्येच्या अंगाने चौकशी झाली आणि त्यात तथ्य आढळले. सोनाली मृत्यू प्रकरणाला बावीस दिवस उलटले असले आणि दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत असले तरी अद्याप गोवा पोलिसांना ह्या हत्येमागच्या कारणाचा शोध घेता आलेला नाही हे नामुष्कीजनक आहे. त्यामुळे तिच्या नातलगांच्या अविश्‍वासात भरच पडत गेली. गोवा पोलीस गुरुग्राममधील सोनालीच्या भाड्याच्या सदनिकेपासून हरियाणातील हिस्सारच्या फार्महाऊसपर्यंत जाऊन आले, परंतु तरी देखील ह्या हत्येचे नेमके कारण काय, त्यामागे कोणी बडी मंडळी आहेत का, मालमत्तेव्यतिरिक्त काही राजकीय कारणे आहेत काय या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गोवा पोलिसांना अपयशच आले होते. त्यामुळे आता सीबीआयकडून पुन्हा नव्याने ही चौकशी हाती घ्यावी लागणार आहे. सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणात सोनालीला जबरदस्तीने अमली पदार्थ पाजले गेल्याचे सर्वांत महत्त्वाचे पुरावे जेथे आढळले तो कर्लीज नाईटक्लब गोवा सरकारने राष्ट्रीय हरित लवादाच्या निवाड्यानंतर अर्धाअधिक पाडून टाकला आहे. यामुळे ह्या हत्या प्रकरणातले घटनास्थळच नाहीसे झाल्याने सीबीआयच्या तपासकामामध्ये त्रुटी राहणार नाहीत ना हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गोवा पोलीस तपासाच्या अंतिम टप्प्यात होते असे मुख्यमंत्री सांगत आहेत. ज्या निष्कर्षांप्रत गोवा पोलीस पोहोचले होते, ते जनतेसमोर मांडायला मग काय हरकत आहे? गेल्या २१ दिवसांत तपास यंत्रणा झोपलेली नव्हती हे तरी सर्वांना समजेल.
सोनाली आणि त्याच्या पी.ए.चे नेमके नाते काय होते यावर सीबीआयला तपास केंद्रित करावा लागणार आहे, कारण तिचे सर्व नियंत्रण त्याच्या हाती असल्याचे जे दिसते, त्यामागचे कारण शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिचे नातलग म्हणतात त्याप्रमाणे, लैंगिक शोषण करून नंतर तो तिला ब्लॅकमेल करीत होता का, याची कसून चौकशी झाली पाहिजे. प्रथमदर्शनी तरी सर्व घटनाक्रम त्याकडेच निर्देश करीत असला, तरी ह्यापेक्षाही काही अधिक खळबळजनक वास्तव असू शकते. तिच्या हरियाणातील फार्महाऊसमधील सीसीटीव्ही पुरावे नष्ट करण्याचा का प्रयत्न झाला, पी.ए.संदर्भात तिने कुटुंबीयांपाशी गंभीर तक्रारी केल्या होत्या, तरीही ती त्याच्यासोबत नृत्य करायला कर्लीजमध्ये कशी पोहोचली अशा अनेक प्रश्नांची उकल अद्याप बाकी आहे.
या हत्या प्रकरणात जरी प्रमुख संशयित पकडला गेला असला तरी जोवर हत्येचा उद्देश स्पष्ट होत नाही आणि तो बळकट पुराव्यांनिशी सिद्ध करता येत नाही तोवर या प्रकरणाची न्यायालयात तड लागणे कठीण आहे. सोनाली फोगट प्रकरणाची गत सुशांतसिंह राजपूत प्रकरणासारखीच तर होणार नाही ना ही चिंता त्यामुळेच सतावू लागली आहे. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणातही असेच अमली पदार्थांचे अंग समोर आलेले होते. जवळजवळ दोन महिन्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्याला आता दोन वर्षे उलटून गेली तरीही सुशांतसिंहच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही. बॉलिवूडमधील अनेक बडी बडी नावे त्या प्रकरणात समोर आली, त्यांची चौकशीही झाली, परंतु पुढे काहीच घडलेले नाही. सोनाली फोगट प्रकरणाचीही सीबीआय ही गत करणार नाही ना हाही प्रश्न त्यामुळे नक्कीच पडतो. सोनाली फोगट हत्या प्रकरण सीबीआयकडे गेले म्हणून गोवा पोलिसांनी स्वस्थ बसू नये. त्याला जोडूनच अमली पदार्थांचे जे गंभीर प्रकरण समोर आले आहे, त्याचा सोक्षमोक्ष लावावा.