>> डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सोडले
गौतम गंभीर याने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या इंडियन प्रीमियर लीगमधील यंदाच्या मोसमातील खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारताना संघाचे कर्णधारपद सोडले आहे.
दिल्लीने २.८ कोटी रुपये मोजून गंभीरला लिलावात खरेदी केले होते. या पैशातील एक छदामही न घेता यंदाच्या मोसमात मोफत खेळणार असल्याचे गंभीरने काल जाहीर केले. कर्णधार या नात्याने खेळताना गंभीरला दिल्लीच्या सहा डावात केवळ ८५ धावा करता आल्या आहेत. यात पहिल्या सामन्यात लगावलेल्या अर्धशतकाचा समावेश आहे.
यंदा फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने १५३.५ ची स्ट्राईकरेट राखली असली तरी वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याला केवळ ७०च्या स्ट्राईकरेटने धावा जमवता आल्या आहेत. आयपीएलनंतर भविष्याबद्दल निर्णय घेणार असल्याचेदेखील गंभीरने म्हटले आहे. गंभीरने राजीनामा दिल्यानंतर दिल्लीने २३ वर्षीय श्रेयस अय्यर याची कर्णधारपदी निवड केली आहे. पंजाबविरुद्ध चार धावांनी झालेला निसटता पराभव गंभीरच्या जिव्हारी लागला असून विजयाच्या दारातून परत जावे लागल्याने गंभीरने मोठा पाऊल उचलल्याचे मानले जाते. गंभीर व डेअरडेव्हिल्स यांचे नाते कायम राहणार असून यापुढे गंभीर मार्गदर्शक खेळाडू म्हणून काम पाहणार असल्याचे फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुआ यांनी म्हटले आहे.