कायम असलेल्या सर्व शिक्षकांना सुविधा
राज्यातील कर्करोग किंवा अन्य दुर्धर तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी एक वर्षाची भरपगारी वैद्यकीय सुट्टी मिळणार आहे. शिक्षण खात्याचे संचालक शैलेंश झिंगडे यांनी काल यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. उपचारासाठी एक वर्षापेक्षा जास्त सुट्टीची गरज भासल्यास वैद्यकीय मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. सरकारी आणि अनुदानित शाळांत सेवेत कायम असलेल्या सर्व शिक्षकांना ही सवलत लागू होत आहे.
राज्यातील शिक्षकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी खास रजा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने या मागणीची गंभीर दखल घेतली आहे. यकृत, हदय, कर्करोग, मूत्रपिंड, ॲमिट्रोपिक लॅटरल सिलेसोसिस, प्रोग्रेसिव न्यूरो डिजनरेटिव्ह आदी गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मान्यताप्राप्त सरकारी वैद्यकीय प्राधिकरणाचा दाखला आवश्यक आहे. पात्र प्रकरणांमध्ये कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.
सेवेत कायम असलेल्या
शिक्षकांसाठी सुविधा
राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विशेष मुलांच्या शाळांतील शिक्षकांना ही सुट्टीची सुविधा प्राप्त होणार आहे. शिक्षण खात्याने राज्यातील सर्व शाळा प्रमुखांना या आदेशाची कार्यवाहीसाठी सूचना जारी करण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकाला वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज शाळा प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे. या अर्जासोबत गोवा वैद्यकीय महाविद्यालय किंवा अन्य मान्यताप्राप्त सरकारी वैद्यकीय संस्थेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शाळा प्रमुखाकडून शिक्षण संचालनालयाकडे अर्ज पाठविला जाणार आहे. शिक्षण खात्याकडून अर्जाची पडताळणी केल्यानंतर आवश्यक निर्णय घेतला जाणार आहे. गरज भासल्यास अर्ज सरकारी वैद्यकीय मंडळाकडे पाठविला जाणार आहे. या विशेष सुट्टीच्या कालावधीत शिक्षकाची सेवाज्येष्ठता कायम राहणार आहे. पेन्शन व अन्य सेवांचा लाभ मिळणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.