ख्रिस गेलचा झंझावात

0
84

– सुधाकर नाईक
कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर गेल्या मंगळवारी ख्रिस गेल नामक वादळ घोंगावले आणि झिम्बाब्वेची गोलंदाजी पाल्यापाचोळ्यासारखी उधळली! ‘खत्तरनाक’ गेलला लय गवसली तर तो काय प्रपात घडवू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे त्याची ही धुँवाधार तुफानी खेळी. विश्‍व चषकाच्या इतिहासात पहिले वहिले द्विशतक झळकविण्याचा पराक्रम या जमैकन पठ्‌ठ्याने केला.
२४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वाल्हेर येथे द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक नोंदवले होते आणि योगायोग म्हणजे पाच वर्षांनी याच दिवशी कॅनबेरात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने (१४७ चेंडूत १६ षटकार व १० चौकारांसह २१५) प्रतिष्ठेच्या विश्‍वचषकात पहिले द्विशतक ठोकीत नवा इतिहास रचला.१३८ चेंडूत ९ चौकार आणि तब्बल सोळा षटकारांसह ख्रिस गेलने ही भीम पराक्रम गाजविला. ‘वन-डे’ मधील जलद द्विशतक नोंदवित गेलने भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा १४० चेंडूचा विक्रम मोडला. पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये द्विशतके नोंदवणारा तो पहिला ‘अभारतीय’ क्रिकेटपटू ठरला. आतापर्यंत सचीन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा (२) या तीन भारतीयांच्या नावावर हा विक्रम होता. गेलची ही कामगिरी ‘वन-डे’ मधील पाचवे द्विशतक होय!
भारताबाहेर प्रथम द्विशतक नोंदवण्याची किमया साधलेल्या गेलची ही खेळी ‘वन-डे’ मधील तिसरी सर्वोत्तम धावसंख्या होय. रोहित शर्माने २६४ तर सेहवागने २१९ धावा केल्या होत्या. रोहितच्या १६ षटकारांची बरोबरी केलेल्या गेलने या सामन्यात मलॉन सॅम्युएल्सच्या सोबत ३७२ धावांची भागीदारी नोंदवित भारताचे सचिन-द्रविडचा ३३१ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.
विश्‍व चषकात विक्रमी द्विशतक नोंदलेला ख्रिस गेल ‘अभारतीय’ असला तरी त्याच्या या किमयेत भारतीय बॅटचाही वाटा आहे. गेलची ही हेवी बॅट जालंधर येथील पंजाबस स्पोटर्ंस गूडस हबने बनविली आहे.
१०३ कसोटीत १५ शतकांसह ७२१४ धावा नोंदवलेल्या गेलने दोन त्रिशतके (द. आफ्रिकेविरुद्ध ३१७ आणि श्रीलंके विरुद्ध ३१७) आणि एक द्विशतकही (न्युझीलंडविरुद्ध २०४) झळकाविले आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६६ सामन्यांत २२ शतकांसह ९१३६ (सर्वोच्च २१५) आणि ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका शतकासह (११७) १४०६ धावा केल्या होत्या. हरहुन्नरी गेल ‘ऑफ-ब्रेक’ गोलंदाजीता माहीर असून त्याने कसोटीत ७३ (सर्वोत्तम ५/३४), वन-डेत १६१ (सर्वोत्तम ५/४६) आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ बळी घेतले आहेत.
वेस्ट इंडिजतर्फे कसोटी, वन-डे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफानी शतके झळकविलेला गेल इंडियन प्रिमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधीत्व करतो. ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये सीडनी थंडर्स, बांगलादेश प्रीमीयर लिगमध्ये ढाका ग्लॅडिएटर्स. वॉर्सेॅस्टरशायर, वेस्टर्न वॉरियर्स, बॅरियल बर्नर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आदी संघातर्फे तो खेळला आहे. २१ सप्टेंबर १९७९ रोजी जन्मलेल्या ह्या जमैकन क्रिकेटपटूने १९ व्या वर्षी जमैकातर्फे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ११ महिन्यानंतर, ११ सप्टेंबर १९९९ रोजी भारताविरुद्ध त्याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि सहा महिन्यानंतर ,१६ मार्च २००० रोजी कसोटीत पदार्पण केले. जुलै २००१ मध्ये बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्टस् क्लब येथील झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटीत गेलने १७५ धावा चोपतानाच डॅरेन गंगाच्यासाथीत (८८) २१४ धावांची विक्रमी सलामी देत आपल्या आंतरराश्ट्रीय क्रिकेज क्षितिजावरील आगमनाची ग्वाही दिली. २००२मध्ये भारता विरुद्धच्या कसोटीत तीन शतके झळकावित गेलने ‘कॅलेंडर इयर’ मध्ये १ हजाराहून अधिक धावा नोंदवणारा व्हिब रिचर्डस आणि ब्रायन लारानंतरचा तिसरा वेस्ट इंडियन फलंदाज बनण्याचा मान मिळविला.
२००५मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध त्रिशतक नोंदण्याचा पराक्रमही त्याने केला. त्याचा द. आफ्रिकेविरुद्धचा ३१७ धावांचा विक्रम नंतर श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने मोडला. श्रीलंकाविरुद्ध त्याने ३३३ धावा ठोकीत आणखी एक त्रिशतक नोंदले. २००७ मधील ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिला सर्वोच्च धावसंख्या नोंदण्याचा पराक्रमही गेलच्या नावावर आहे. द. आफ्रिकेच्या रिचर्ड क्रूइने न्युझिलँडविरुद्ध नाबाद ११७ धावा नोंदवित त्याची बरोबरी केली.
वादग्रस्त गेल
क्रिकेट एकाग्रतेने खेळणारा गेल वेस्ट इंडिज क्रिकेटमंडळाबरोबरील वादंगामुळेही गाजला. २००५ मध्ये स्पॉन्सरशीप प्रकरणामुळे त्याला द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डावलण्यात आले. २००६ मध्ये न्युझालँडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही बेताल वागणुकीचा ठपका ठेवून वगळण्यात आले. नंतर ऑक्टोबर भारतात झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकल क्लार्क बरोबरील शाद्बिक चकमकीमुळे दंड ठोठावण्यात आला. २००७ मधील इंग्लंड दौर्‍यात वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाविरुद्ध जाहीर टिका केल्याने अधिकृत ताकीद आणि इशारा देण्यात आला. २००९ मध्ये इंग्लंड दौर्‍यात आपल्याला विंडिज संघाचे नेतृत्व करायचे नाहीच असे भाष्य केल्याने तो टीकाकारांचे लक्ष्य ठरला होता. २०११ मध्ये गेलने पुन्हा विंडिज क्रिकेट मंडळ आणि प्रशिक्षक गिव्सन यांच्यावर तोफ डागली आणि सुमारे वर्षभर राष्ट्रीय संघाबाहेर रहावे लागले. ६ एप्रिल २०१२ रोजी गेल आणि क्रिकेट मंडळात समझोता झाला आणि बेधडक फलंदाज राष्ट्रीय संघात परतला तरीही त्याने आपली ‘तोफ’ थांबविलेली नसून ब्रावो आणि किरॉन पोलार्ड याना विद्यमान विश्‍वचषकातून वगळल्याबद्दल निवड समितीवर टीकेची झोड उठविली होती. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचा रोष त्यावर असेलच पण या विक्रमी खेळीने त्याने सर्वांची मने पुन्हा एकदा जिंकली आहे. गोलंदाजांच्या या कर्दकाळाला लय गवसलेली असल्याने आता गोलंदाजाना या वादळाला रोखण्यासाठी कंबर कसावी लागेल.
कारकिर्दीचा आलेख
स्पर्धा कसोटी वन-डे ट्वेंटी-२०
सामने १०३ २६१ ४५
धावा ७२१४ ९१३६ १४०६
फलंदाजी सरासरी ४२.१८ ३७.४४ ३५.१५
शतके/अर्धशतके १५/३६ २२/४६ १/१२
सर्वोच्च धावा ३३३ २१५ ११७
बळी ७३ १५८ १५
डावात ५ बळी २ २