ख्यातनाम पत्रकार व प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष माधव विठ्ठल कामत यांचे काल येथील खासगी इस्पितळात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. एम.व्ही.कामथ म्हणून ते प्रसिद्ध होते.
छातीत दुखू लागल्यानंतर परवा त्यांना इस्पितळात दाखल केले होते. काल सकाळी त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सध्या ते मणिपाल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्युनिकेशनचे संचालक होते. कामथ यांनी आपली कारकिर्द १९४६ साली मुंबईत ‘फ्री प्रेस जर्नल’चे वार्ताहर म्हणून सुरू केली. त्यापूर्वी ते केमिस्ट म्हणून एका फॅक्टरीत कामाला होते. पत्रकारितेत सहा दशकांच्या काळात त्यांनी ‘इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस बुलेटिन’, ‘भारत ज्योती’चे संपादक म्हणून तसेच १९५५ ते ५८ या काळात पीटीआयचे संयुक्त राष्ट्रसंघातील वार्ताहर म्हणून काम केले. टाइम्स ऑफ इंडियाचे युरोप व वॉशिंग्टन प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या चरित्रासह ४५ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय कोकणी भाषा परिषदेचेही ते अध्यक्ष होते. मंगळूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली होती. त्यांना सरकारने पद्मभुषण पुरस्काराने गौरविले होते.
मुख्यमंत्री पर्रीकर यांना दु:ख
गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनी ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण एम. व्ही. कामथ यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या दुखवटा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, एम. व्ही. कामथ हे निपुण पत्रकार होते. पत्रकारितेत त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.