>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जमीन खरेदी आरोपांप्रकरणी संबंधितांना इशारा
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, शिवसेनेचे बाबूराव धुरी, कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग, पवन खेरा व इतरांनी दोडामार्ग तालुक्यातील जमीन खरेदीबाबत केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. आपण कायदेशीररीत्या ३३ हजार चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. आपल्या जमीन व्यवहारात पारदर्शकता आहे. यापुढे जमीन खरेदीबाबत खोटे, बिनबुडाचे आरोप करणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विजय सरदेसाई हे खोटारडे असून त्यानी बिनबुडाचे आरोप करणे बंद करावे. सरदेसाई यांच्या मालमत्तेत २००७ ते २०१२ या पाच वर्षाच्या काळात ५०० पट वाढ झाली आहे. पाच कोटीची असलेली मालमत्ता पाच वर्षात २५ कोटी २१ लाख रुपये झाली आहे. या मालमत्तेबाबत चौकशी करावी लागणार आहे, असा इशाराही मुख्यमंत्री सावंत यांनी दिला.
सरदेसाई यांनी वैयक्तिक आरोप करणे बंद करावे. त्यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी करण्याची सूचना केली जाणार आहे. सरदेसाई यांच्या २००७ आणि २०१२ या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केल्यास त्यांच्या उत्पन्नात ५०० पट वाढ झालेली दिसून येत आहे. त्यांनी पत्नीच्या नावे एकाच व्यावसायिक इमारतीमध्ये ९ फ्लॅट खरेदी केले आहेत. सरदेसाई यांनी ५०० पट वाढलेल्या उत्पन्नाबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. सरदेसाई यांनी २०१० मध्ये एक १२५० चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला. २०१२ च्या प्रतिज्ञापत्रात या भूखंडाबाबत माहिती देण्यात आली नाही. सदर भूखंडाची विक्री परराज्यातील व्यक्तीला करण्यात आली आहे. सरदेसाई यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
विरोधकांकडे मुद्दे नसल्याने
बदनामीचे प्रयत्न
मुख्यमंत्रीपदाचा कारभार यशस्वीपणे हाताळत असल्याने विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने वैयक्तिक पातळीवर टिका करून बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. आपण धंदा करण्यासाठी राजकारणात आलेले नाही. मनोहर पर्रीकर यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी सरदेसाई यांच्या सारख्या माणसाच्या सल्ल्याची गरज नाही, असेही सावंत यांनी सांगितले.
जनतेत संभ्रम निर्माण
करण्याचा प्रयत्न
आपली बदनामी करण्यासाठी ट्विटरवर रमेश गोवेकर याच्या नावे एक खाते उघडण्यात आले आहे. सदर व्यक्ती अस्तित्वात नाही. या व्यक्तीबाबत वैयक्तिक पातळीवर चौकशी केली. पोलीस यंत्रणेला चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या नावावर बदनामीकारक माहिती टाकली जाते. नंतर सदर ट्विट इतरांकडून पुढे पाठविले जात आहे. आरोप करणार्याविरोधात कारवाईसाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. खोटे, दिशाभूल करणारे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.