खोगीर नोकरभरती होणार म्हणून बंदी घातली : पार्सेकर

0
110

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी नोकरभरतीमध्ये खोगीरभरती झाली असती. तसेच योग्य उमेदवारांवर अन्याय झाला असता. त्यामुळे नोकर भरतीवर तात्पुरती बंद घालण्यात आली होती, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल केले.

सरकार ही निरंतन प्रक्रिया आहे. त्यामुळे मागील सरकारच्या काळातील नोकर भरतीची प्रक्रिया विद्यमान भाजप आघाडी सरकारने पुढे नेण्याची गरज आहे. परंतु प्रक्रिया पूर्ण झालेल्या पदांबाबत नियुक्तिपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नोकरभरतीची प्रक्रिया प्राथमिक पातळीवर असलेल्या पदाची भरती रद्द करणे अन्यायकारक आहे. तसेच अग्निशामक दलातील नोकर भरतीची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांवर अन्याय होणार आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.

आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात नाही. तर नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून हा विषय उपस्थित केला आहे. उमेदवारांना नोकरीसाठी पुन्हा अर्ज करायला सांगणे अन्यायकारक आहे, असेही पार्सेकर म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून विपर्यास माहिती दिली जात आहे. भाजप – मगोचे किमान २६ ते २७ आमदार निवडून येतील, अशी भविष्यवाणी मंत्री ढवळीकर यांनी कधी केल्याचे आठवत नाही. आपला केवळ नोकरभरती बंदीमुळे पराभव झालेला नाही असे ते म्हणाले. आपल्या काळात सुरू झालेली नोकर भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण व्हावी. आपल्या कारकिर्दीत नोकरभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी काही जणांकडून दबाव येत होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.