>> क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विधानसभेत माहिती
कांपाल-पणजी येथील खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सिलेन्स येथे विविध क्रीडा प्रकारांसाठीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 30 टक्के गोमंतकीय, तर सुमारे 70 टक्के प्रशिक्षणार्थी हे अन्य राज्यांतील आहेत, अशी माहिती काल क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना काल क्रीडामंत्र्यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या सेंटरमध्ये एकूण 73 प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यापैकी 22 हे गोमंतकीय, तर 51 हे बिगर गोमंतकीय असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
याला आक्षेप घेताना आमदार कार्लुस फेरेरा यांनी खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सिलन्स हे गोमंतकीयांसाठी आहे की बिगर गोमंतकीयांसाठी असा सवाल केला. यावर उत्तर देताना, जेवढे गोमंतकीय आले होते, त्या सगळ्यांना आम्ही प्रवेश दिला आहे. मात्र, गोमंतकीयांकडून या केंद्राला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही, असे गावडे यांनी सांगितले. क्रीडा खात्याने जास्तीत जास्त गोमंतकीयांना या केंद्रात प्रवेशासाठी आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी करावी, अशी सूचना फेरेरा यांनी केली. त्यावर पुढील वेळी जेव्हा ही निवड करण्यात येणार आहे त्यावेळी तशी जाहिरात करण्याचे आश्वासन गावडे यांनी दिले.
17 जणांनी प्रशिक्षण सोडले
या सेंटरमध्ये प्रवेश घेतलेल्या गोमंतकीयांपैकी 17 गोमंतकीय प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण सोडून गेलेले असून, त्यामुळे आता फक्त 22 गोमंतकीय शिल्लक राहिले असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. या सेंटरसाठी केंद्र सरकारकडून 14 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
अधिवेशनाचा समारोप
गोवा विधानसभेच्या 18 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. त्यानंतर सभापती रमेश तवडकर यांनी विधानसभेत अनिश्चित काळासाठी स्थगित केली. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प आणि अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या 18 दिवसांमध्ये सुमारे 120 तासांचे कामकाज झाले. या अधिवेशनासाठी आमदारांनी 930 तारांकित प्रश्न आणि 1953 अतारांकित प्रश्न सादर केले होते. तारांकित 840 प्रश्न आणि अतारांकित 1953 प्रश्नांची उत्तरे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. या अधिवेशनात विनियोग विधेयक, अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.