>> आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचा आरोप
राज्यात खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्राथमिक शाळांच्या विलीनीकरणाचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. अमित पालेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीतील आप सरकारच्या शाळांची चिंता करण्याची गरज नाही. दिल्लीतील सरकारी शाळांची स्थिती चांगली आहे. नवी दिल्लीतील आप सरकारच्या शाळांची पाहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आम्ही निमंत्रण देत आहोत, असेही ऍड. पालेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आम आदमी पक्षाने दिलेल्या सूचनांवर सकारात्मक विचार करण्याची गरज होती. तथापि, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या सल्ल्याची गरज नसल्याचे केलेल्या विधान योग्य नाही. राज्यातील मागील दहा वर्षांत सरकारी शाळांच्या संख्येत घट होत आहे; मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चालविण्यात येत असलेल्या खासगी शाळा भरभराटीला आल्या आहेत, अशी टीका ऍड. पालेकर यांनी केली.
दिल्लीतील सरकारी शाळा आणि साधनसुविधा पाहण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण खात्याचे अधिकारी, मंत्र्यांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीला नेण्याची आमची तयारी आहे. त्यांचा संपूर्ण खर्च आपकडून केला जाईल, असेही अमित पालेकर यांनी सांगितले.