आपल्या शेजारचे महाराष्ट्र राज्य हे नेहमीच स्वतःला पुरोगामी म्हणवत असते. तशी त्याची परंपरा देखील आहे. ‘शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र’ अशी बिरुदावली लावणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या मात्र जे चालले आहे ते अतिशय खालच्या दर्जाचे आणि लांच्छनास्पद आहे असे खेदाने नमूद करावे लागते आहे. त्याला कारण अर्थातच तेथील जनता नव्हे, तर तेथील नेतेमंडळी आहेत. विधिमंडळामध्ये बसून सत्ता चालवणाऱ्या मंडळींनीच महाराष्ट्राच्या जनतेची मान सध्या शरमेने खाली घालायला लावली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राजकीय नेत्यांनी एकमेकांविरुद्ध अत्यंत अशोभनीय अपशब्द वापरण्यापासून खालच्या स्तरावरील आरोप – प्रत्यारोपांपर्यंत आणि मंत्र्यांने सभागृहात मोबाईलवर रमी खेळण्यापर्यंत साधनशुचितेचा सगळा चोळामोळा करून झाला. हे कमी म्हणून की काय विधिमंडळाच्या आवारामध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली. सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ह्यामध्ये सामील आहेत, त्यामुळे कोणी कोणाकडे बोट दाखवण्याची संधीही कोणाला उरलेली नाही. महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद सध्या जाण्याच्या वाटेवर आहे, कारण सभागृहामध्ये चक्क मोबाईलवर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला. आपण रमी खेळत नव्हतो, तर आपल्या मोबाईलवर रमीची जाहिरात आली होती अशी सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु आधी त्यांचा अठरा सेकंदांचा व्हिडिओ आला होता, त्यानंतर अधिक कालावधीचा व्हिडिओही समोर आला, त्यामध्ये ते स्पष्टपणे ऑनलाइन पत्ते खेळताना दिसत आहेत. हे कमी झाले म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले. एक रुपयाचा पीकविमान घ्यायला तयार नसलेल्या शेतकऱ्यांची तुलना आधी एक रुपया न स्वीकारणाऱ्या भिकाऱ्यांशी करून सारवासारव करताना शेतकरी नव्हे, तर सरकार भिकारी असल्याचे ते म्हणाले आणि आपल्याच सरकारला त्यांनी अडचणीत आणले. कोकाटे यांचे मंत्रिपद त्यामुळे धोक्यात आले आहे. मात्र त्यांचे मंत्रिपद काढून घेताना नुकतीच एका प्रकरणात न्यायालयाची क्लीन चीट मिळालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या हालचाली नवा वाद निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक मंत्री, आमदार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सध्या ‘हनी ट्रॅप’च्या प्रकरणात असल्याची चर्चा आहे आणि त्यासंबंंधीची संपूर्ण माहिती जरी उघड झालेली नसली, तरी आताच अनेकांची झोप उडालेली आहे. त्यामुळे हा बॉम्ब फुटला तर अनेकांना पळताभुई थोडी होईल. सध्या प्रफुल्ल लोढा नामक एका व्यक्तीकडे ह्या प्रकरणात निर्देश होत आहे, परंतु योग्य दिशेने चौकशी झाली तर अनेक गौप्यस्फोट होऊ शकतात. त्यामुळे नेत्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप विरोधी आमदार रोहित पवारांनी केला आहे. मंत्र्यांप्रमाणेच सत्ताधारी आमदारही वादंगांमध्ये काही कमी नाहीत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी पंगा घेतला आणि दोघांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळाच्या इमारतीतच तुंबळ हाणामारी झाली. राजकारणाचा एक अत्यंत खालचा स्तर गाठला गेला. दुसरीकडे, माणिकराव कोकाटेंच्या सभागृहात रमी खेळण्याच्या प्रकाराचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकून करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना कॅमेऱ्यासमक्ष जबर मारहाण झाली. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे प्रवक्तेच त्यात छावाच्या कार्यकर्त्यांना कोपराने ढोसून मारताना दिसले. आता त्यांची लोकलाजेस्तव पदावरून हकालपट्टी झालेली आहे. एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही तऱ्हा, तर दुसरीकडे सत्तेतील दुसरा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तरी मागे कसे राहतील? शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेमध्ये नोटांची बंडले असल्याचे दर्शवणारा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला. बॅगेत नोटा नसून कपडे आहेत असे शिरसाट म्हणत असले तरी विरोधकांना त्यांना अडचणीत आणणारा एक मुद्दा मिळाला आहे. शिंदेसेनेचेच एक आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओही अलीकडेच व्हायरल झाला. एकूण एकामागून एक सत्ताधारी नेत्यांना अडचणीत आणणारे व्हिडिओ येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. सरकारची ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली प्रतिमा सावरायची कशी हे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.