खायचे दात

0
144

जम्मूमधील नगरोटामधील बन टोल नाक्यावरील चकमकीत जैश ए महंमदचे चार दहशतवादी गेल्या गुरुवारी पहाटे मारले गेले. मात्र, त्यानंतरच्या तपासकामातून या दहशतवाद्यांसंबंधीचे जे वास्तव समोर आलेले आहे, ते सर्वथा पाकिस्तानकडेच बोटे दाखवते आहे. जे दहशतवादी मारले गेले, त्यांच्यापाशी सापडलेल्या वायरलेस सेटच्या तपासणीत ते काश्मीरमध्ये घुसखोरी करीत असताना पाकिस्तानातील हँडलर्स त्यांच्या थेट संपर्कात असल्याचे आढळून आलेले आहे. हा प्रकार अलीकडच्या काळात तरी पहिल्यांदाच घडला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी कराचीतून अशाच प्रकारे त्या हल्ल्याचे सूत्रधार मुंबईत उतरलेल्या दहशतवाद्यांच्या थेट संपर्कात होते. त्यामुळे २६/११ च्या स्मृतिदिनी पुन्हा काश्मीरमध्ये अशाच प्रकारचा भयावह हल्ला चढवण्याचा या दहशतवाद्यांचा बेत होता हे यातून स्पष्ट होते. त्यांच्यापाशी सापडलेली शस्त्रास्त्रे, औषधे इत्यादींवर पाकिस्तानी खुणा आढळून आलेल्या आहेत. म्हणजे हे सगळे पाकिस्तानच्या आयएसआयच्या नियोजनाखाली चालले होते याबाबत आता काही संशयच उरलेला नाही.
जम्मू काश्मीरमध्ये होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा विकास मंडळांच्या निवडणुका हाणून पाडण्यासाठीच या दहशतवादी हल्ल्याचा घाट पाकिस्तानने घातला असावा हे उघड आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला काश्मीर खोर्‍याचे विशेषाधिकार नरेंद्र मोदी सरकारने काढून घेतले आणि त्याला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे जोरदार प्रयत्न चालवलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काश्मिरी जनतेला सहभागी करून घेण्यासाठी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडणे साहजिकच म्हणावे लागेल, कारण काश्मिरी जनता अशा प्रकारे स्वयंनिर्णयाच्या प्रक्रियेत सामील होताना जगाला दिसली तर फुटिरतावादाचा साराच देखावा किती फसवा आहे हे जगाला कळेल हे पाकिस्तानला ठाऊक आहे. त्यामुळेच सशस्त्र दहशतवादी पाठवून काश्मीर खोर्‍यामध्ये हलकल्लोळ माजवण्याचा मोठा बेत त्याने आखला होता आणि त्याचाच भाग म्हणून हे घुसखोर सांबा सेक्टरमधून भारतात घुसखोरी करून जम्मूहून काश्मीर खोर्‍याकडे निघाले होते असे दिसते.
या हल्ल्यात चौघेही दहशतवादी मारले गेले, परंतु त्यांना घेऊन चाललेला ट्रकचालक फरार आहे. ट्रक अर्थातच स्थानिक आहे. त्याची नंबरप्लेट खोटी असून प्रत्यक्षात तो क्रमांक एका महिंद्रा जीपचा असल्याचे तपासात समोर आलेले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे लखीमपूर टोलनाक्यावर याच खोट्या क्रमांकाचा आणखी एक ट्रक तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याचे वृत्त आहे. ते खरे असेल तर अशाच प्रकारे आणखीही दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी ठरलेले असू शकतात. मारल्या गेलेल्या जैशच्या चार दहशतवाद्यांकडे अकरा एके ४७ रायफली, ३ पिस्तुले, डझनावारी हँड ग्रेनेड वगैरे आढळले. म्हणजे जय्यत तयारीनिशी एक फार मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या प्रयत्नात ही मंडळी होती. मोबाईलवरून दहशतवाद्यांशी संपर्क साधला असता तर ते संदेश गुप्तचर यंत्रणांनी पकडले असते, त्यामुळे त्याऐवजी वायरलेस सेटवरून टेक्स्ट संदेशांचा वापर यावेळी केला गेला. दहशतवादी हल्ला चढवताना गुप्तचर यंत्रणांना हुलकावणी देण्यासाठी त्यामध्ये नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्याचा दहशतवादी संघटनांचा नेहमीच प्रयत्न असतो. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमाने धडकावणे असो, मुंबईत समुद्रमार्गे दहशतवादी घुसणे असो किंवा भारत – पाक सीमेवर द्रोनमधून शस्त्रास्त्रे उतरवणे असो, वेगवेगळी नवी साधने वापरून सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असतो. यावेळी भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क होती. तिला अशा प्रकारे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत याची पक्की खबर मिळालेली होती. त्यामुळेच टोलनाक्यावर या ट्रकची तपासणी झाली आणि त्याची परिणती भीषण चकमकीत होऊन चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले. परंतु प्रत्येकवेळी आपण असे सुदैवीच असू असे नव्हे. त्यामुळे पुन्हा एकवार पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याची आता गरज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी अधिकार्‍याला पाचारण करून कानउघाडणी करण्याचा झालेला सोपस्कारही पुरेसा नाही. लातोंके भूत बातोंसे नही मानते हे पाकिस्तानच्या बाबतीत तर अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. बालाकोटच्या कारवाईनंतर काही काळ दातखीळ बसलेला पाकिस्तान पुन्हा एकवार वळवळू लागला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करून त्याने दिवाळीचा विचका केला. हाफीज सईदला तुरुंगवासात पाठवल्याचे देखावे करून आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंधांपासून सुटका करू घेऊ पाहणार्‍या ढोंगी पाकिस्तानचे खरे राक्षसी दात या हल्ल्याने पुन्हा एकवार जगासमोर आणले आहेत. आता ते पाडण्याची वेळ आली आहे!