>> एकूण ११ पैकी ७ कंपन्या राज्याबाहेरील
खाण खात्याने राज्यातील चार खाणपट्ट्यांचा जो ई-लिलाव पुकारला होता त्यात राज्यातील केवळ ४ खाण कंपन्यांनी भाग घेतला. त्यात व्ही. एम्. साळगांवकर, फोमेंतो, साळगांवकर मायनिंग व राजाराम बांदेकर माईन्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. तर ११ पैकी ७ कंपन्या ह्या राज्याबाहेरील आहेत. या ११ कंपन्यांनी या चार खाणपट्ट्यांसाठी २८ बोली लावल्या आहेत.
गोवा सरकारच्या खाण खात्याने एसएसटीसीच्या ई कॉमर्सच्या साहाय्याने पुकारलेल्या या ई-लिलावाला देशभरातून ११ कंपन्यांनी आपल्या २८ तांत्रिक बोली लावल्या होत्या.
गोव्याबाहेरील कंपन्यांमध्ये वेदांता, श्री जगन्नाथ स्टील ऍण्ड पॉवर लिमिटेड, एमएसजी लिमिटेड, जेएसडब्ल्यू, आर्सेलर मित्तल इंडिया निपॉन लिमिटेड, काय इंटरनॅशनल, किर्लोस्कर या सात कंपन्यांचा समावेश आहे. या चार पट्ट्यांची तांत्रिक पात्रता प्रक्रिया १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्याचदिवशी पात्र बोलीधारक जाहीर करण्यात येणार आहेत. तद्नंतर १५ ते २१ डिसेंबरपर्यंत लिलावाची सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असे काल खाण खात्यातर्फे कळवण्यात आले. पहिल्या टप्प्यात डिचोली, शिगांव-मयें, मोंत द शिरगांव आणि काळे या चार पट्ट्यांचा ई-लिलाव जाहीर करण्यात आला आहे.
परराज्यातील खाण कंपन्यांना खाणी मिळाल्यास आपणाला खाणीवर नोकर्या मिळतील की नाही ही चिंता यापूर्वी खाणींवर काम केलेल्या खाण कामगारांना लागू राहिली आहे. काही खाण कामगारांनी याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले असता त्यांनी त्यांना घाबरण्याची गरज नसून गोमंतकीय खाण कामगारांना खाणींवर नोकर्या मिळतील, असे आश्वासन दिले होते.