बेकायदा खाण घोटाळा प्रकरणी एसआयटीने काल इम्रान खान यांच्या फातोर्डा येथील कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणी इम्रान खान याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले होते. एसआयटी पथकाचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. सकाळी ९ वाजता सुरू झालेले छापासत्र सायंकाळी सातपर्यंत चालू होते. पणजी येथून पाच अधिकार्यांच्या पथकाने इम्रान याच्या कार्यालयाची दहा तास झडती घेतली. या छाप्यातून आवश्यक कागदपत्रे व पुरावे मिळाल्याचा दावा पोलीस अधिकारी सावंत यांनी केला आहे.
फातोर्डा येथील श्री दामोदर लिंगासमोरील इमारतीत इम्रान खान यांचे इम्रान मिनरल प्रायव्हेट लिमिटेड आणि फिलिंग मिनरल प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाचे कार्यालय आहे. खाण घोटाळा प्रकरणात बड्या धेंड्यांचा सहभाग असल्याचा कयास आहे.