खाण अवलंबितांचा आज पणजीत महामोर्चा

0
100

>> सकाळी १०.३० नंतर मोर्चा काढण्याचे सरकारचे आवाहन

>> सकाळी ६ ते १०.३० पर्यंत जमावबंदीचा आदेश

खाणपट्ट्यातील हजारो खाण अवलंबितांचा भव्य मोर्चा आज पणजीवर चाल करून येणार असून या मोर्चाचे नंतर येथील आझाद मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. न भूतो… असा हा मोर्चा असेल व या मोर्चामुळे राजधानीला जत्रेचे स्वरूप येईल, असे अखिल गोवा खनिजवाहू ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी काल सांगितले. दरम्यान, मोर्चामुळे बारावीचे विद्यार्थी व जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ६ ते १०.३० या काळात मांडवी पूल, कदंब बसस्थान परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर खाण अवलंबितांनी १०.३० नंतर शहरात प्रवेश करावा व मोर्चासाठी कांपाल मैदानाचा वापर करावा, असे आवाहन मंत्रिमंडळ सल्लागार समितीने काल संध्याकाळी तातडीच्या बैठकीनंतर केले आहे.

आमचा संयम तुटलेला असून मोर्चाशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नसल्याचे ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष श्री. गावस यांनी सांगितले. बंद पडलेला खाण व्यवसाय सरकारने लवकरात लवकर सुरू करावा व त्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करावेत, अशी खाण अवलंबितांची मागणी आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी राज्यभरातील खाण अवलंबितांनी ह्या मोर्चाचे आयोजन केले आहे असे ते म्हणाले.

केंपे, सांगे, सावर्डे, कुडचडे, डिचोली, सत्तरी अशा खाणपट्ट्यातील सर्व तालुक्यातील खाण अवलंबित हजारोंच्या संख्येने आजच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यात खनिजवाहू ट्रकांचे मालक, ड्रायव्हर, खाण कामगार, बार्ज मालक, मशिनरी मालक यांच्यासह खाण उद्योगावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेले लोक व त्यांचे कुटुंबीय हजारोंच्या संख्येने आज पणजीला धडक देणार आहेत. २०१२ साली जेव्हा गोव्यातील खाण व्यवसाय बंद पडला होता तेव्हा पणजी शहरात आलेल्या मोर्चापेक्षा हा मोर्चा मोठा असेल, असे सूत्रांनी सांगितले.

आमदारही सहभागी होणार
खाण अवलंबितांच्या आजच्या मोर्चात खाणपट्ट्यातील आमदारही सहभागी होणार आहेत. आमदार नीलेश काब्राल, दीपक पाऊसकर, प्रवीण झांट्ये, प्रमोद सावंत, बाबू कवळेकर आदी खाणपट्ट्यातील आमदारांबरोबरच विरोधी कॉंग्रेस पक्षातीलही काही आमदार खाण अवलंबितांना पाठिंबा व सहानुभूती दर्शविण्यासाठी आझाद मैदानावर हजर राहणार आहेत. दरम्यान, विनाविलंब खाणी सुरू करा एवढीच आमची मागणी आहे. खाणी बंद राहिल्या तर खाणपट्ट्यातील लोकांवर उपासमारीची पाळी येणार आहे, असे नीलकंठ गावस यांनी काल सांगितले.

मेगा ब्लॉकची शक्यता
खाणपट्ट्यातील हजारो खाण अवलंबित मोर्चा घेऊन आज पणजीत धडक देणार असल्याने आज सकाळी राजधानीत मेगा ब्लॉक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पणजी बसस्थानकाकडून सकाळी मोर्चा सुरू होईल. तेथून मोर्चा आझाद मैदानावर येईल. नंतर आझाद मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

मोर्चेकर्‍यांनी साडेदहानंतर
येण्याचे सरकारचे आवाहन

खाण अवलंबितांनी आज सकाळी ८.३० वाजता राजधानीमध्ये आयोजित महामोर्चामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणेने या महामोर्चाची गंभीर दखल घेतली आहे. बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थी, सरकारी व इतर आस्थापनांतील कर्मचार्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ६ ते सकाळी १०.३० या काळात मांडवी पूल, कदंब बसस्थानक परिसरात जमावबंदीचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी लागू केला आहे. दरम्यान, खाण अवलंबितांनी १०.३० नंतर शहरात प्रवेश करावा, महामोर्चासाठी कांपाल मैदानाचा वापर करावा, असे आवाहन मंत्रिमंडळ सल्लागार समितीने केले आहे,

महामोर्चाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सल्लागार समितीची तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात काल संध्याकाळी घेण्यात आली. खाण अवलंबितांच्या मोर्चाला आमचा विरोध नाही. परंतु, विद्यार्थी व इतरांची गैरसोय टाळण्यासाठी खाण अवलंबितांनी सकाळी १०.३० वाजल्यानंतर राजधानीमध्ये प्रवेश करावा. तसेच आझाद मैदानाऐवजी कांपाल मैदानावर आंदोलन करावे, असे आवाहन मंत्रिमंडळ सल्लागार समितीचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केले. यावेळी मंत्रिमंडळ सल्लागार समितीचे सदस्य नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, कायदा मंत्री फ्रान्सिस डिसोझा, मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर, जिल्हाधिकारी नीला मोहनन यांची उपस्थिती होती.

खाण अवलंबितांच्या नियोजित मोर्चावर विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळ सल्लागार समितीचे तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी घेण्यात आली. खाण अवलंबितांनी सकाळी ८.३० वाजता शहरात एकत्र होण्याचे जाहीर केले आहे. शहरात बारावीची परीक्षा, नियमित कामधंद्यांनिमित्त येणार्‍या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामोर्चासाठी येणार्‍यांना सकाळी १०.३० वाजल्यानंतर शहरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षांखालील मुलांना मोर्चासाठी आणू नये. मोर्चामध्ये सहभागी होणार्‍यांनी शिस्तीचे पालन करावे. वाहतूक व्यवस्थेत अडथळा आणू नये. लोकांना त्रास होणारी कोणतीही कृती करू नये. मोर्चेकर्‍यांनी आपली वाहने मेरशी जंक्शन किंवा कांपाल, पणजी येथे पार्क करावी. सरकार खाण बंदीच्या प्रश्‍नावर गंभीर आहे. मोर्चेकरांना सर्वप्रकारचे साहाय्य केले जाईल. शहरातून सकाळच्या वेळी बाहेर जाणार्‍या पर्यटकांनी १०.३० पूर्वी नियोजित स्थळी जाण्यासाठी प्रस्थान करावे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे खाणबंदी लागू झाली आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने खाणबंदी लागू केलेली नाही. सरकार खाण बंदीवर तोडगा काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करीत आहे. खाण अवलंबितांनी याचा विचार करण्याची गरज आहे, असे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.