राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाकडून खाणप्रश्नी दिलासा मिळू शकतो, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. सावंत व्यक्त करून खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील खाण बंदीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी खाण महामंडळ स्थापन केले जाऊ शकते, असे मत वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी मुक्तीदिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारले असता, खाणी सुरू करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. सर्वोच्च न्यायालयात खाणप्रश्नी याचिका ८ जानेवारीला सुनावणीला येण्याची शक्य्ता आहे. गोव्याची बाजू भक्कम बांधण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आलेली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी डिसेंबर २०१९ अखेर राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या काळात खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात यश प्राप्त झालेले नाही.
सर्वोच्च न्यायालयाने दुसर्या टप्प्यातील खाण लीज नूतनीकरण रद्द करून एका आदेशाद्वारे फेब्रुवारी २०१८ मध्ये खाण व्यवसाय बंद केला आहे. मागील २० महिने राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. राज्य सरकारने अठरा महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर केली आहे. ही याचिका सुनावणीसाठी आलेली नाही.
मंत्री गुदिन्होंपाठोपाठ मंत्री मायकल लोबो यांनी खनिज मंडळ स्थापन करण्याबाबत वक्तव्य केले आहे.