खाणी सुरू करण्याची प्रक्रिया गतीमान : मुख्यमंत्री पार्सेकर

0
148

खाण व्यवसाय बंद झाल्याने त्रास झालेला असला तरी गोवा सरकारने लोकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी खंबीर पाऊल उचलले आहे. खाणी सुरू करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून लवकरच सर्व अडथळे पार करून खाण व्यवसाय पुन्हा सुरू होणार असून जनता व बँकांनाही होणारा त्रास कमी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे केले. डिचोली अर्बन को. ऑप. बँकेच्या नव्या पणजी शाखेच्या व एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्ळकर, आरबीआयचे अधिकारी जयकिश, चेअरमन उमेश झांटये, उपाध्यक्ष डॉ. शेखर साळकर, व्यवस्थापकीय संचालक सुरेश पर्रीकर उपस्थित होते. डिचोली अर्बन बँक ही गोव्यातील आदर्श सहकारी बँक असून सचोटी व विश्‍वासाची माणसे या बँकेची धुरा यशस्वीपणे हाताळत असल्याने बँकेने गगनभरारी मारलेली आहे, असे ते म्हणाले. खाण व्यवसायामुळे बँकांनाही त्रास झाला असला तरी राज्य सरकारने सर्वच घटकांची काळजी घेतलेली आहे, याकडे पार्सेकर यांनी लक्ष वेधले. पर्यावरणीय दाखल्याचा प्रश्‍न सुटताच लगेच खाणी सुरू होणार आहेत. विकासाच्या प्रक्रियेत सहकार क्षेत्राचे महत्वाचे योगदान असून सामान्याची स्थिती सुधारण्यासाठी सहकार समृध्दीची वाट दाखवणारे प्रभावी माध्यम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार सिध्दार्थ कुंकळ्ळकर यांनी सहकारचा खरा आदर्श डिचोली अर्बन बँकेने जोपासला असून पणजीत ग्राहकांसाठी ही बँक वरदान ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. आरबीआयचे अधिकारी जयकीश यांनी बँकेच्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले. चेअरमन उमेश झांट्ये यांनी सर्व प्रकारची स्पर्धा असूनही डिचोली अर्बन बँकेने नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगून सर्वांच्या सहकार्यामुळेच ही वाटचाल करणे शक्य झाल्याचे सांगितले.