‘खाणमाती’स सरफोजीराजे बृहन्महाराष्ट्र पुरस्कार

0
2

>> गोमंतकीय साहित्यिक, कादंबरीकार विठ्ठल गावस यांचा होणार सन्मान

गोमंतकीय साहित्यिक विठ्ठल गावस यांच्या खाणमाती कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. खाणमाती कादंबरीस 1 लाख रुपयांचा सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार झाला आहे. काल या पुरस्काराची घोषणा झाली. हल्लीच काणकोण येथे झालेल्या 29व्या अखिल गोमंतकीय मराठी संमेलनात खाणमाती कादंबरीला सुवर्णपदक जाहीर झाले होते. त्यानंतर आता आणखी एका पुरस्कारावर या कादंबरीने आपली मोहोर उमटवली आहे.

विठ्ठल गावस यांची आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कॅथरिन, लवण, ओझे, क्षितीजरंग, कहत कबिरा आणि फिंगर बाऊल हे कथासंग्रह, तसेच खाणमाती ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या या कथा आणि कादंबरींना गोमंतक मराठी अकादमी, गोवा कला अकादमी, गोमंत विद्यानिकेतन, गोमंतक मराठी साहित्य परिषद यांचे विविध पुरस्कार लाभले आहेत. त्याशिवाय विठ्ठल गावस यांना 2022-23 साली राज्य सरकारकडून राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांची लवण, ओझे आणि फिंगर बाऊल या कथा गोवा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. याशिवाय विठ्ठल गावस यांनी विविध संस्था, संमेलनांमध्ये पदे भूषवली आहेत. गोमंतक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे उपाध्यक्ष, गोमंतक मराठी अकादमी आयोजित 11व्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रागतिक विचारमंच आयोजित 16व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.