>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत जोरदार टीका
गोवा फॉरवर्डने राज्यातील जनतेचे पीडीए प्रश्नाकडील लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी खाण बंदीच्या प्रश्नावर नाटक सुरू केले आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी पत्रकार परिषदेत काल केला. खाणबंदी प्रश्न त्वरित न सोडविल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नुकताच दिला होता.
कॉंग्रेसचे प्रवक्ते बुयांव म्हणाले की, खाणबंदी प्रश्नावर गप्प असलेला गोवा फॉरवर्ड अचानक जागा झाला आहे. खाण बंदीचा प्रश्न केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दिल्लीला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात गोवा फॉरवर्डचे प्रतिनिधी सहभागी झाले नव्हते, असेही बुयांव यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाने खाण बंदीचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन सुरुवातीला दिलेले आहे. परंतु, भाजप खाण बंदीचा प्रश्न सोडविण्यासाठी गंभीर नाही. त्यामुळे मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर भाजपला इशारा देण्याची पाळी आली आहे. भाजपमध्ये खाणबंदी प्रश्न सोडविण्याबाबत एकवाक्यता नाही.
न्यायालयाच्या माध्यमातून खाण बंदीवर तोडगा काढण्याची घोषणा भाजपने केलेली आहे. परंतु, चार महिने उलटले तरी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात त्यांना यश प्राप्त झालेले नाही. न्यायालयातून खाण बंदीचा प्रश्न न सुटल्यास अध्यादेशाचा विचार केला जाईल, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे, असेही बुयांव यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाच्या ‘जन गण मन’ अभियानाचा भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळे भाजपने जनसंपर्क अभियान सुरू केले आहे, असा दावा बुयांव यांनी केला.