ट्रक मालकांसाठीची योजना ३० सप्टेंबरपर्यंत
खाण व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगार बनलेल्यांसाठी राबविण्यात आलेली योजना आता ३१ डिसेंबरपर्यंत, तर ट्रक मालकांसाठीची पॅकेज ३० सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत या योजनेवर ९० कोटी रु. खर्च झाले आहेत.
गेले १८ महिने राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. त्यामुळे ट्रक मालक, मशिन मालक, बार्ज मालक तसेच कंपन्यांतील कामगारांसमोर संकट कोसळले आहे. डिसेंबरपर्यंत वरील योजना चालू ठेवण्याच्या निर्णयामुळे गोव्यातील खाण व्यवसाय डिसेंबरपर्यंत तरी चालू होणे अशक्य असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पर्रीकर सरकारने खाण व्यवसाय लवकर सुरू व्हावा म्हणून प्रयत्न चालविले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने या व्यवसायासाठी घातलेल्या निर्बंधांचा विचार केल्यास हा व्यवसाय कधी व कशा परिस्थितीत सुरू होईल हा प्रश्न आहे. त्यामुळे काही लोकांनी आपला व्यवसाय बदलण्याचा विचार केला आहे. काही जण शेतीकडे वळले आहेत. व्यवसाय बंद असल्याने काहीनी ट्रक विकल्याचे वृत्त आहे. तर घरांसमोर उभे करून ठेवलेले ट्रक गंजले आहेत. सर्वसामान्यांच्या करातून मिळणारा पैसा ट्रक मालकांना का द्यावा, अन्य कोणताही उद्योग बंद पडल्यास बेरोजगार बनणार्यांनाही सरकार पॅकेज देणार काय, असे प्रश्नही केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खाण अवलंबितांना सर्वसामान्य लोकांच्या करातून गोळा केलेला पैसा पॅकेज देण्यासाठी वापरला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खनिजाचा इ लिलावातून मिळालेला पैसाच खाण अवलंबिताना वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.