खाणप्रश्‍नी पुन:परीक्षण अहवाल सादर करा

0
120

>> अमित शहांची सूचना

>> आठ दिवसांत पुन्हा बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील खाण प्रश्‍नाचे पुनःपरीक्षण करून अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय खाण मंत्रालयाला नवी दिल्ली येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत काल केली. येत्या आठ दिवसात पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

केंद्रीय मंत्री शहा यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील खाण प्रश्‍नावर घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला.

या उच्चस्तरीय बैठकीत गोव्यातील खाण प्रश्‍न सविस्तरपणे मांडण्यात आला. तसेच या बैठकीत खाणी संदर्भात न्यायालयाच्या विविध निवाड्यांवर चर्चा करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या खाण प्रकरणी एका निवाड्यामुळे मार्च २०१८ पासून गोव्यातील खाण व्यवसाय ठप्प झाला आहे. खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी मागील वर्षभर प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाण प्रश्‍नी न्यायिक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाण प्रश्‍नी याचिका प्रलंबित आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने ही याचिका लवकर सुनावणीला घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. सदर याचिका काही दिवसांपूर्वी सुनावणीस आली होती. तथापि, सदर याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.