सरदेसाईंसह ४ मंत्र्यांना डच्चू नवीन

0
122

>> मंत्र्यांचा आज शपथविधी

>> भाजप हायकमांडच्या सूचनेनुसार निर्णय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांच्यासह विनोद पालयेकर, जयेश साळगावकर आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना नवी दिल्लीतून काल केली. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाची फेररचना आज शनिवारी केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात भाजपच्या चार नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राजीनामा देण्याची सूचना केलेल्या चार मंत्र्यांना दिली आहे. भाजप श्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना राजीनामे देण्याची सूचना करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

राज्य मंत्रिमंडळात उपसभापती मायकल लोबो, कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले चंद्रकांत कवळेकर, बाबुश मोन्सेर्रात, फिलीप नेरी रॉड्रिग्स यांची वर्णी लावण्यात येणार आहे. तसेच आमदारांची महामंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

भाजप गाभा समितीची
हायकमांडबरोबर चर्चा
भाजपच्या गाभा समितीच्या सदस्यांनी केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांशी आघाडी सरकारबाबत चर्चा केली. राज्यातील आघाडी सरकार चालविताना घटक पक्षांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्याने भाजपच्या आणखीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कॉंग्रेस पक्षातील १० आमदारांनी वेगळा विधिमंडळ गट तयार करून भाजपमध्ये विलीन केल्याने भाजपच्या आमदारांची संख्या २७ झाली आहे. भाजपच्या आणखीन आमदारांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाने घेतला आहे. भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि एका अपक्ष मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा निर्णय केंद्रातील नेतृत्वाने घेतला आहे.
भाजपचे नवे आमदार परतले
दिल्लीला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गेलेले भाजपचे १० नवीन आमदार शुक्रवारी सकाळी गोव्यात परतले आहेत. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १० नवीन आमदारांना गुरुवारी भाजपमध्ये रीतसर प्रवेश दिला होता. त्यानंतर आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

वेलिंगकर यांचा टोला
भाजप नव्हे कॉंग्रेस
जनता पार्टी!
गोव्यातील भाजप आता कॉंग्रेस जनता पार्टी बनली आहे, अशी तोफ गोवा सुरक्षा मंचाचे पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत काल डागली. वेलिंगकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गोव्यातील भारतीय जनता पक्ष विचारधारा गमावून बसला आहे. भाजपने कॉंग्रेसमधील अनेक आमदारांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. भाजप वैचारिक आधार गमावून बसला आहे. विचारधारेचा सन्मान करणारा पक्ष राहिलेला नाही. भाजपच्या २७ आमदारांपैकी १८ आमदार मूळचे कॉंग्रेसचे आहेत. दोन वर्षांच्या भाजपच्या राजवटीत चारवेळा पक्षांतरे झालेली आहे. कॉंग्रेस, मगोपच्या आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आमदाराला मंत्री बनण्याची इच्छा झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडतात, असा टोलाही वेलिंगकर यांनी लगावला.

विल्फ्रेड डिसा यांची माहिती
सरदेसाईंना वगळण्याच्या
अटीवर भाजपमध्ये प्रवेश
चंद्रकांत कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाणार आहे. तर, बाबूश मोन्सेर्रात आणि फिलीप नेरी रॉड्रिग्स यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपमध्ये प्रवेश केलेले नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी काल दिली. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या अटीवर कॉंग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मंत्रिपदी वर्णी न लागणार्‍या आमदारांची सरकारच्या विविध महामंडळावर नियुक्ती केली जाणार आहे, असे डिसा यांनी सांगितले

ख् लोबोंचा सरदेसाईंवर हल्लाबोल
गोंयकारपणाच्या नावाखाली
मंत्र्यांकडून स्वार्थाचे राजकारण
काही अहंकारी मंत्र्यांकडून गोंयकारपणाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण करण्यात आले. आघाडी सरकार चालविताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मागील दोन वर्षांत लोकांच्या नावाने वैयक्तिक अजेंडा घेऊन काहींनी कामकाज करण्यात सुरुवात केली. मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्याकडून जाहीर केली जाणार आहेत. मंत्रिपदापेक्षा नियोजित कार्य पूर्ण झाल्याचे समाधान आहे, अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिल्लीतून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

बंडखोरांना जनतेने
उघडे पाडावे : कॉंग्रेस
कॉंग्रेस पक्षाच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून जनाधाराचा अवमान केला आहे. या आमदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जनतेने यापुढे वॉच डॉग होऊन या आमदारांचा भांडाफोड करावा, असे आवाहन गोवा प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत काल केले. कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली, तरीही कॉंग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्‍नावर आवाज उठविण्यास मागे राहणार नाही, असेही कुतिन्हो यांनी सांगितले.

ख् गोवा फॉरवर्ड
मंत्र्यांना डच्चूबाबत
पत्र मिळालेले नाही
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्य मंत्रिमंडळातून गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना वगळण्याबाबत अधिकृत पत्र मिळालेले नाही, असे गोवा फॉरवर्डने म्हटले आहे. मंत्रिमंडळातून वगळण्याच्या निर्णयाबाबत सर्वसमावेशक तोडगा काढण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत, असे गोवा फॉरवर्डने ट्विट संदेशात म्हटले आहे.