खाकी वर्दीतले गुंड

0
16

माशेल येथील फास्टफूड चालकावर तीन पोलिसांनी अन्य साथीदारांसह केलेल्या रानटी हल्ल्याची घटना पोलीस दलाला लांच्छनास्पद आहे. खाकी वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते. आपले वैयक्तिक हेवेदावे निकाली काढण्यासाठी ती वापरायची नसते. त्यामुळे जे तीन पोलीस ह्या प्रकरणात गुंतले आहेत, त्यांचे केवळ निलंबन पुरेसे नाही. त्यांची तटस्थ यंत्रणेमार्फत खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास सेवेतून तात्काळ बडतर्फ केले गेले पाहिजे. तरच अशा प्रकारांची पुनरावृत्ती करण्यास कोणी पोलीस धजावणार नाही. पोलिसांकडून झालेल्या गैरवर्तनाचे हे काही पहिलेच उदाहरण नव्हे. सातत्याने असे गैरप्रकार होत आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यावर संबंधितांचे कानही उपटले आहेत. ‘एकदा खाकी वर्दी चढली की आपण पोलीस आहोत म्हणजे सामान्य जनतेपेक्षा कोणीतरी वेगळे आणि मोठे आहोत अशा भ्रमात अनेकजण राहतात आणि त्यांच्या एकूण बोलण्या – वागण्यातून ही गुर्मी मग आयुष्यभर डोकावत राहते. पोलिसांचा धाक आणि जरब गुन्हेगारांवर हवी. सर्वसामान्य जनतेवर नव्हे. परंतु याचेच विस्मरण काहींना झालेले असते.’ असे आम्ही या विषयावर म्हटले होते. गोव्याचे माजी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ह्या विषयात गांभीर्याने लक्ष घातले होते. त्यांनी पोलिसांसाठी एक कार्यशाळाही आयोजित केली होती आणि चित्रपटांमध्ये जरी तुमची प्रतिमा ‘सिंघम’ सारखी बनवली गेली असली, तरी तुम्ही सिंघम नव्हे याचे भान ठेवा अशी स्पष्ट समज दिली होती. पोलीस असलात म्हणून स्वतःला सिंघम समजू नका आणि दबंगगिरी करू नका अशी तंबी त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती. परंतु प्रत्यक्षात गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये एखादा तरुण मंत्र्यासंत्र्याच्या वशिल्याने किंवा अर्थपूर्ण रीतीने पोलीस दलात आपला शिरकाव करून घेतो आणि मग कनिष्ठ पदावर असला तरी साहेब असल्याच्या गुर्मीत आयुष्यभर वावरतो. अंगावर खाकी वर्दी असणे म्हणजे आपण कोणीतही विशेष असणे हा जो काही अशा लोकांचा भ्रम असतो तो उतरवला जाणे जरूरी आहे. ज्यांच्या नाकावर नेहमी राग असेल अशा पोलिसांना मानसोपचार घ्यायला पाठवा असे सांगताना जनतेशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही मुक्तेश चंदर यांनी तेव्हा दिलेला होता. आता विद्यमान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्याची निकड भासते आहे. पोलिसांच्या गैरवर्तनाच्या असंख्य घटना वेळोवेळी गोव्यात घडत आलेल्या आहेत. पोलीस जीपमध्ये महिलेशी अश्लील चाळे करण्यापासून ड्रग माफियांशी घनिष्ठ संबंधांपर्यंत, अपघात प्रकरणात गुन्हेगाराशी हातमिळवणीपासून घरफोड्या करणाऱ्या भुरट्या चोराशी संधान बांधण्यापर्यंत अनेक विक्रम गोवा पोलिसांच्या नावावर आहेत ह्याचे विस्मरण जनतेला झालेले नाही. वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परस्पर संगनमत असलेल्या टोळ्या राज्यात निर्माण झालेल्या आहेत, ज्या गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी फोडण्याची आवश्यकता आहे. काही अधिकाऱ्यांना आपल्या हाताखाली विशिष्ट कर्मचारीच हवे असतात. काहींची एका ठिकाणाहून दुसरीकडे बदली झाली तर आपला हा जनानखानाही सोबत नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेकांना बदली नको असते, कारण नातेसंबंध प्रस्थापित झालेले असतात. भ्रष्टाचाराच्या ह्या साखळ्या तोडण्याची आवश्यकता जशी आहे, तशीच पोलीस आणि जनता यामध्ये विश्वासाचे आणि परस्पर सहकार्याचे नाते निर्माण करण्याचीही नितांत आवश्यकता आहे. माशेल प्रकरणात ज्या प्रकारे फास्ट फूड स्टॉल चालकाला मारहाण झाली ते पाहता हे पोलीस की गुंड असा प्रश्न पडावा. संबंधित फास्टफूड स्टॉल चालक व संशयित पोलीस कर्मचारी यांच्यातील वैयक्तिक हेव्यादाव्यांतून ही मारहाण झाली आहे असे सांगितले जात आहे. सदर संशयिताने पूर्वी आपल्याच उपनिरीक्षकावरही हात उगारल्याची माहितीही आता पुढे आली आहे. असे हे कोण पोलीस महासंचालक होऊन गेले आहेत की ज्यांच्यावर असा गंभीर प्रकार होऊनही कारवाई होत नाही? आपण पोलिसांत सहावेळा तक्रार केली होती असे संबंधित फास्टफूड स्टॉल चालकाचे म्हणणे आहे. मग ह्या तक्रारींची गांभीर्याने दखल का घेतली गेली नाही? मारहाणीनंतर संबंधित पोलीस कर्मचारी फरार कसे काय होऊ शकले? त्यांचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आले की त्यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली जाते आहे? ह्या मारहाणीचे कारण काहीही असो, अगदी पराकोटीचे वैमनस्य का असेना, परंतु कायदा हातात घेऊन केली जाणारी अशा प्रकारची गुंडगिरी गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री महोदय कशी काय खपवून घेत आहेत? राज्यात काही कायद्याचे राज्य आहे की नाही?