खांडेपार येथील नवीन पुलावरून रविवारी सकाळी संजना संजीव गावडे (45, कुंकळये – वेलिंग) या महिलेने दूधसागर नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत जखमी संजना हिला पोलिसांनी पाण्याबाहेर काढून गोमेकॉमध्ये दाखल केले होते. पण दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
कुंकळये – वेलिंग परिसरात राहणारी संजना ही रविवारी सकाळी आपल्या मुलाच्या स्कूटरवरून माहेरी जात होती. खांडेपार येथील नवीन पुलावर पोचल्यानंतर अचानक तिने आपल्या मुलाला स्कूटर थांबविण्यात सांगितले. पुलाजवळ स्कूटर थांबविल्यानंतर मागे बसलेल्या संजनाने त्वरित पुलावरून नदीत उडी घेतली. आईने नदीत उडी घेतल्याचे दिसून आल्यानंतर स्कूटर पार्क करून तिच्या मुलाने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पुलावरून उडी घेतलेली संजना ही जखमी अवस्थेत पाण्यात अडकून राहिली. पोलिसांनी संजना हिला पाण्याबाहेर काढून त्वरित 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. संजनाच्या दोन्ही पायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले. पण दुपारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन वेळीप या प्रकरणी तपास करीत आहेत.