- दत्ता भि. नाईक
भारताचे जागतिक राजकारणात जितके महत्त्व वाढत आहे, तितकीच देशांतर्गत व देशबाह्य भारतविरोधी शक्ती एकत्र येऊन या प्रक्रियेत खो घालण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत हल्ली मागे पडलेली ‘शिखांचे वेगळे राष्ट्र बनवावे’ यासाठी सुरू असलेली खलिस्तानवाद्यांची चळवळ पुन्हा डोके वर काढू लागलेली आहे.
भारत देशाचे जागतिक राजकारणात जितके महत्त्व वाढत आहे, तितकीच देशांतर्गत व देशबाह्य भारतविरोधी शक्ती एकत्र येऊन या प्रक्रियेत खो घालण्याचा प्रयत्न करत आहे. देशात सांस्कृतिक ऐक्याची भावना दिवसेंदिवस शक्तिशाली होत असताना तिच्या मुळावर घाव घालण्याचे प्रयत्न चहुबाजूंनी सुरू आहेत. भारत सरकारकडून नव्याने बनवलेल्या नागरी कायद्याचे निमित्त असो वा किसान बिलाचे; केंद्र सरकारला कमकुवत करण्याचे प्रयत्न सततपणे चालू असल्याचे लक्षात येते. भारतीय जनसंघाच्या काळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टी- अकाली दल ही युती यानिमित्ताने मोडीत काढण्यात आली. नेमके काय साधायचे आहे याची स्पष्टता नसलेल्या आम आदमी पार्टीच्या हातात सध्या पंजाबची धुरा आहे. अशा परिस्थितीत हल्ली मागे पडलेली ‘शिखांचे वेगळे राष्ट्र बनवावे’ यासाठी सुरू असलेली खलिस्तानवाद्यांची चळवळ पुन्हा डोके वर काढू लागलेली आहे.
‘वारिस पंजाब दे’चा हल्ला
भारतात उपलब्ध असलेल्या विचार व उच्चार स्वातंत्र्याचा कसा उपयोग करून घ्यावा हे देशविरोधी शक्तींना चांगल्या प्रकारे माहीत आहे. भारतीय संविधानाचा वापर करून संविधानाची पकड ढिली करण्यासाठी या शक्ती अतिशय कौशल्याने वावरतात. खलिस्तानचे भूत भिंद्रनवालेच्या नंतर ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग याच्या डोक्यावर स्वार झाले आहे. गेल्या महिन्यात अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांनी तलवारी परजून व बंदुका रोखून अमृतसर शहराजवळील अजनाला येथील पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या हल्ल्यात एक अधीक्षक पातळीवरील अधिकारी धरून सहा निरनिराळ्या पदांवरील पोलीस जखमी झाले. अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग ऊर्फ तुफान सिंग याची सुटका करा ही मागणी करत या आंदोलकांनी सभोवतालच्या अडथळ्यांची नासधूस करून पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केला होता. 24 फेब्रुवारी 2023 रोजी अजनाला पोलीस स्टेशनवर ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेविरुद्ध प्रथम सूचना प्रतिवेदन प्रस्तुत करण्यात आले असून या सर्व गैरकृत्यांचा या प्रतिवेदनात उल्लेख आहे.
ही घटना घडताच पंजाब राज्याचे भगवानसिंग मान यांच्या आम आदमी पार्टीच्या सरकारवर टीकेची झोड उठली. राज्य सरकार अतिरेक्यांवर कारवाई करण्याच्या बाबतीत कुचराई करत असल्याचे आरोप केले जाऊ लागले. दरम्यान, पंजाब पोलिसांनी जनतेला सामंजस्याने वागण्याचा सल्ला दिलेला आहे.
गेल्या महिन्यात एका व्यक्तीने अमृतपाल सिंग व त्याच्या टोळीने आपले अपहरण करून भरपूर चोप दिल्याची तक्रार अजनाला पोलीस स्टेशनवर दाखल केली होती. पोलिसांनी केलेल्या शोधाशोधीत लवप्रीत ऊर्फ तुफान सिंग हा त्यांच्या हाती लागला होता व त्याच्या सुटकेसाठी अमृतपाल सिंगने ‘पोलिसांनी तुफानला सोडून न दिल्यास त्याची सुटका करू’ अशी धमकी दिली होती. आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून पंजाब जणू स्वतंत्र झाल्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या मुख्यमंत्री भगवानसिंग मान यांनी ताबडतोब दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्याच्या सुरक्षेकरिता पाठवून दिल्या.
भिंद्रनवाले द्वितीय
अभिनेता व चळवळ्या असलेल्या दीप सिधू याने वारिस पंजाब दे या संघटनेची स्थापना केली होती. आता संस्थापक दीप सिधू हे हयात नाहीत. 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचे निधन झाले. संघटनेच्या नावात आक्षेपार्ह असे काहीच नाही. परंतु शीख युवकांना फुटीरतेचे शिक्षण देणे व पंजाब राज्य भारतापासून वेगळे करून खलिस्तानची स्थापना करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
दुबई येथे वास्तव्य केल्यानंतर हा अमृतपाल सिंग भारतात आल्यापासून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय.एस.आय.च्या तालावर नाचत आहे. वारिस पंजाब देचे नेतृत्व हातात येताच अमृतपालने स्वतःला भिंद्रनवाले द्वितीय असल्याचे घोषित केले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री भगवानसिंग मान यांच्यावरही जहरी टीका केली आहे. 26 जानेवारी रोजी तरनतारन येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात त्याने युवकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचे आवाहन केले. आपले ध्येय खलिस्तानची स्थापना करणे हेच होय असेही त्याने सांगितले.
मोगा जिल्ह्यातील रोडे या गावी त्याने असे वक्तव्य केले की, बिगर शीख व्यक्तीचे सरकार शिखांनी सहन करता कामा नये. पंजाबमधील जनतेवर (केंद्र धरून) शिखांचेच राज्य असले पाहिजे. इतके होऊनही पंजाब सरकारने त्याला अटक केली नाही व तो आता फरार आहे. कुठल्याही गुरुद्वारात तो दडून बसला तरी 1984 सालच्या जून महिन्यातील ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’सारखी कारवाई करण्याची परिस्थिती उद्भवेल अशी भीती वाटते. अमृतपाल सध्या वेगवेगळ्या दुचाक्या वापरून सर्वांना गुंगारा देत असल्याचे वृत्त आहे.
लंडन येथील उच्चायुक्तालयावर हल्ला
जगभरातील कित्येक देशांत भारतीय निरनिराळ्या उद्योग व व्यवसायाच्या निमित्ताने युरोप व अमेरिका खंडांत स्थलांतरित झालेले आहेत. त्यात शिखांची बऱ्यापैकी संख्या आहे. त्यांतील काही जणांची माथी भडकवून त्यांना स्वतंत्र खलिस्तानवादी बनवण्यात आले आहे. सोमवार, दि. 20 मार्च रोजी खलिस्तानवादी जमावाने युनायटेड किंगडमची राजधानी लंडन येथील भारतीय उच्चायुक्ताच्या कार्यालयावर हल्ला करून तेथील तिरंगा ध्वज काढून टाकला व त्याठिकाणी शिखांचा निशाण साहीब उभारला. शेतकरी आंदोलनाच्या वेळेसही लाल किल्ल्यावर असा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर तेथील पोलिसांनी एकाच व्यक्तीला अटक केली. परदेशांचे दूतावास किती सुरक्षित स्थानांवर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. इतके असूनही लंडनमधील पोलीस मामला गंभीर होईपर्यंत का थांबले हा प्रश्न अनुत्तरित आहे.
लगेच भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याने यूकेच्या भारतातील उच्चायुक्त कार्यालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याला बोलावून घेऊन त्यांच्या सरकारकडून सुरक्षेची काळजी नीटपणे न घेतल्याबद्दल खुलासा मागितला. केंद्र सरकारचे विदेश सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना सांगितले की, भारतीय राष्ट्रध्वज उतरवणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी यूकेच्या सरकारसमोर ठेवलेली असून भारताने या घटनेचा कडक शब्दांत निषेध केलेला आहे. निरनिराळ्या दृक्श्राव्य माध्यमांनी प्रस्तुत केलेल्या वृत्तांतावरून दगडफेक करून उच्चायुक्त कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेतील सान फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर जमावाने हल्ला केल्याचे वृत्त आहे.
गुरूग्रंथ साहीबची शिकवण कुठे?
यूके, यूएस, कॅनडा व ऑस्ट्रेलिया देशांतील शिखांमध्ये खलिस्तानवादी चळवळ रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. खलितानवाद्यांचा भारतातील पंजाबवर का डोळा आहे याचे उत्तर आहे की या देशात स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. पाकिस्तानमधील पंजाब वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कोणता प्रसंग ओढवेल याची त्यांना कल्पना आहे. ही चळवळ मुळातच शीख समाजाच्या हितासाठी राबवली जात नसून भारत जागतिक बनण्याच्या मार्गावर असल्यामुळे त्यात अडथळे आणावे असा यामागील मनसुबा आहे. श्री गुरू नानक यांनी मुसलमान आक्रमकांकडून सामान्य हिंदू जनतेवर होणारा अन्याय बघितला. मोगल आक्रमक बाबर याने माणसांच्या शिरांच्या मिनार बनवल्या होत्या याचा उल्लेख श्री गुरू नानकांनी आपल्या लिखाणात केलेला आहे. त्यांनी संगत, पंगत व लंगर या माध्यमांतून जनतेला एकत्र केले. हिंदुस्थानचे स्मशान बनले असे त्यांचे उद्गार आहेत. शिखांची शक्ती पूर्णपणे नष्ट करावी म्हणून औरंगजेबाने हर प्रयत्न केले आणि त्याच औरंगजेबाची परंपरा मानणाऱ्या पाकिस्तानकडून खलिस्तानवादी मदत घेत आहेत.
गुरूग्रंथ साहिबात रामायण, महाभारत, चंडीचरित्र आदी ग्रंथांचा अंतर्भाव आहे. यात जवळजवळ दहा हजार वेळा हरिनामाचा, चोवीसशे वेळा रामनामाचा, पाचशे पन्नास वेळेस परब्रह्म, चारशे वेळेस ओंकार व सुमारे साडेतीनशेदा वेदपुराणाचा उल्लेख आहे. परमेश्वराचा जगदिश, निरंकार, निरंजन, आत्मा, परमात्मा, परमेश्वर, अंतर्यामी, पुरुष व कर्तार या नावांनी उल्लेख ग्रंथ साहिबात आहे. याशिवाय सगुण ब्रह्माचा गोविंद, गोपाल, मुरारी, माधव, शालीग्राम, विष्णू, कृष्ण, केशव, मुकुंद, शारंगपाणी, ठाकूर, दामोदर, वासुदेव, मोहन, मधुसूदन अशाही नावांनी उल्लेख आहे. शीख मांसाहारी असले तरी गोमांस खात नाहीत. गोपूजक नसले तरीही ते स्वतःला गोरक्षक म्हणवतात. यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरूग्रंथ साहिब हा भारतातील एकमेव धर्मग्रंथ आहे, ज्यात हिंदुस्थान शब्दाचा उल्लेख आहे. म्हणूनच खलिस्तानवाद्यांचे देशविघातक षड्यंत्र वेळेतच हाणून पाडले पाहिजे.