>> मुख्यमंत्र्यांची माहिती, डीजी शिपिंगचे दिशानिर्देश
केंद्र सरकारच्या जहाजोद्योग महासंचालनालयाच्या (डीजी शिपिंग) दिशानिर्देशानंतर (प्रॉटोकोल) गोमंतकीय खलाशांना आणण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. दिशानिर्देश तयार करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
विदेशातून येणार्या खलाशांची पूर्ण चाचणी करून प्रवेश दिला जाणार आहे. खलाशांनी आपली माहिती जहाज मालक, एजन्सीला द्यावी. त्यांनी ही माहिती डीजी शिपिंगकडे सादर केल्यानंतर खलाशांची चाचणी केली जाणार आहे. ज्यांचा अहवाल नकारात्मक येईल त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जाजातून उतरल्यानंतर खलाशांची कोविड १९ अंतर्गत चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर १४ दिवस सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे. १४ दिवसानंतर पुन्हा एकदा चाचणी करून होम क्वारंटाईन केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने खलाशांना आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना मंगळवारी जाहीर केली. त्यात डीजी शिपिंग खलाशांचे आगमन आणि प्रस्थानासंदर्भात सविस्तर शिष्टाचाराची घोषणा करणार असल्याचे नमूद केले होते. गोवा सरकारने गोमंतकीय खलाशांना आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुरगाव बंदरात एमपीटीच्या सहकायातून खलाशांना आणण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. डीजी शिपिंगकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून खलाशांना मुंबई बंदरातील मारेला, कर्णिका व आणखी क्रूझ बोटीवरील खलाशांना उतरवून घेण्याचे काम केले जाणार आहे. भारतीय हद्द, खोल समुद्रात असलेल्या खलाशांना टप्प्याटप्प्याने आणले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मडगाव येथील हॉस्पिसोओ आणि चिखली वास्को येथील इस्पितळामध्ये कोविड १९ चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कोविड चाचणीसाठी गोव्यात रॅपिड टेस्टिंग किटचा वापर केला जात नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
छुप्या पद्धतीने आल्यास ताब्यात घेणार
राज्यातील लॉकडाऊनच्या काळात बळजबरीने किंवा छुप्या पद्धतीने गोव्यात प्रवेश करणार्याला व्यक्तींना ताब्यात घेऊन सरकारी क्वारंटाईन केंद्रात ठेवले जाणार असून क्वारंटाईऩचा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
खलाशी प्रश्नाचे राजकारण
विदेशात असलेल्या गोमंतकीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे. खलाशांना परत आणण्याच्या प्रश्नांचा काही जणांनी राजकारणासाठी वापर केला. खलाशांच्या नातेवाइकांना निदर्शने करण्याची सूचना काही राजकारण्यांनी केली. निदर्शने करणार्या व्यक्तींनी ही माहिती उघड केली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.