>> मंत्री नीलेश काब्राल यांची कारवाई; अन्य रस्त्यांच्या तपासणीचीही सूचना
सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी पणजी शहर आणि परिसरातील पहिल्याच पावसात खराब झालेल्या रस्त्यांची गंभीर दखल घेतली असून, सदर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम करणारा कंत्राटदार सी. ए. इब्राहिम यांचा परवाना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना काल दिला.
पणजी शहरातील तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता पहिल्याच पावसात खराब होऊन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणी जनतेची माफी मागून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची दक्षता खात्याकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.
पणजीतील दिवजा सर्कल ते मिरामार आणि दिवजा सर्कल ते कदंब बसस्थानक या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे कंत्राटदार इब्राहिम यांनी केली होती. इब्राहिम यांचा परवाना दोन वर्षांसाठी निलंबित करून त्याबाबतची माहिती ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी मंत्र्यांच्या कार्यालयात द्यावी. इब्राहिम यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी कारण दाखवा नोटीस पाठवावी, कंत्राटदाराला प्रलंबित असलेल्या बिलाची रक्कम देऊ नये, सदर कंत्राटदाराला अन्य कामाचे आदेश दिले असतील आणि कामाला सुरुवात केली नसेल, तर कामाबाबत दिलेले आदेश मागे घ्यावेत, असे आदेशही काब्राल यांनी दिले आहेत.
पणजी परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या नमुन्यांची फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर सेंट मायकल विद्यालय ताळगाव ते ओशेल येथील मुख्य जंक्शन, जुने हॉस्पिसिओ इस्पितळ मडगाव ते मडगाव नगरपालिका मंडळ इमारत, चिखली सर्कल ते कदंब बसस्थानक वास्कोपर्यंतच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नमुने घेऊन तपासणी करावी, असे आदेशही काब्राल यांनी दिले आहेत.
पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्ता डांबरीकरणाचे काम दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट होत आहे, असेही काब्राल यांनी म्हटले आहे.
पणजी परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाशी संबंधित सर्व अभियंते आणि अधिकार्यांच्या नावाची यादी बुधवार दि. ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.